
पेडणे: गोवा आणि महाराष्ट्र सीमेवरील पेडणे येथील पोरसकाडे-नायबाग जंक्शन येथे शनिवारी (दि.१८) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात नवरा-बायको गंभीर जखमी झाले. त्यांची महिंद्रा कार (HR-29-AP-9787) दुभाजकाजवळच्या खांबावर जोरदार आदळल्याने हा अपघात झाला.
पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चंद्रशेखर आनंद (३०) आणि त्यांच्या पत्नी पिंकी कुमारी (२९) हे त्यांच्या कुटुंबासह पेडणेमार्गे बांदा येथे जात होते, तेव्हा ही दुर्घटना घडली. अपघाताच्या वेळी गाडीत एकूण चार व्यक्ती प्रवास करत होत्या.
प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट दुभाजकाजवळील खांबावर आदळली. अपघाताचा परिणाम इतका भीषण होता की, गाडीचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. चंद्रशेखर आनंद यांना गंभीर दुखापत झाली आहे, तर पत्नी पिंकी यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. धडकेमुळे पती-पत्नी गाडीत अडकले होते.
अपघाताची माहिती मिळताच पेडणे अग्निशमन दलाचे अधिकारी नामदेव परवार आणि त्यांच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गाडीचे पत्रे कापून आणि अन्य साधनांचा वापर करून अडकलेल्या पती-पत्नीला बाहेर काढले. सध्या गोवा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. जखमींना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढल्यानंतर तातडीने उपचारासाठी तुये रुग्णालयात पाठवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.