
मोरजी: चोपडे-शिवोली पूल ते चोपडे सर्कलपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुशोभीकरण करत असतानाच चोपडे सर्कलवर परशुरामाचा भव्य पूर्णकृती पुतळा उभारला जाईल. तसेच पेडणे तालुक्यातील पारंपरिक व्यवसायाची रेखाचित्रे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भिंतीवर रेखाटली जातील, असे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते विभागाचे अधिकारी व आगरवाडा पंचायत मंडळासोबत चोपडे–शिवोली पूलपर्यंतच्या रस्त्याची पाहणी केल्यानंतर आरोलकर बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाचे पेडणेचे अधिकारी शिवनाथ गावस, आगरवाडा प्रभारी सरपंच शिल्पा नाईक, माजी सरपंच सचिन राऊत, पंच संगीता नाईक, पंच लिंगुडकर आदी उपस्थित होते.
चोपडे सर्कलवर ज्या ठिकाणी पाण्याचे कारंजे आहेत आणि तीन दगड बसवलेले होते, त्या ठिकाणी परशुराम यांचा भव्य पूर्णकृती पुतळा उभारला जाईल, असे आरोलकर यांनी सांगितले.
आरोलकर म्हणाले की, सरकारला वेगवेगळ्या प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे सरकारवर भार न टाकता मांदे उदर्गत संस्थेमार्फत हे सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात येईल.
या प्रकल्पासाठी संबंधित खात्यांकडून ना-हरकत दाखला घेऊनच काम केले जाईल. डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करून नवीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प आहे.
केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत चोपडे पूल ते खिंड मोर्जीपर्यंतच्या रस्त्याचे सुशोभीकरण माजी आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या कार्यकाळात झाले आहे. या प्रकल्पाला कोणत्याही प्रकारची इजा न करता सुशोभीकरण केले जाईल, असे आरोलकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.