Goa Police: पर्वरी पोलिस स्थानकात रविवार, 15 रोजी नोंद झालेल्या चोरी प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दोन संशयितांना मुद्देमालासह पकडल्याची माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.
बांबोळी येथील साठ वर्षीय रहिवासी सुमन पुंडलिक राव यांनी 15 तारखेस आपली चैन व मंगळसूत्र जीवोत्तम मठासमोर मोटरसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी चोरल्याची तक्रार दिली होती.
पर्वरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक अनंत गावकर यांनी आपल्या पथकासह सभोवतालच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पाहून या दोन्ही संशयितांना पकडले. राजू सेल्वराज तंगराज (37, हुबळी-कर्नाटक) व भीमगौडा मारुती पाटील (30, गडहिंग्लज-कर्नाटक) यांना पिळर्णा येथून ताब्यात घेण्यात आले.
चौकशी केली असता त्यांच्याकडून 1 लाख 93 हजारांची रोख रक्कम, सोन्याचे दागिने, आरटीओकडे रजिस्टर नसलेली, खोटा नंबर प्लेट असलेली केटीएम ड्युक मोटरसायकल, बनावट आधार कार्ड, वॉक्सवॅगन जेटा कार (क्र. एचआर-26-सीएफ-7871) व इतर आक्षेपार्ह वस्तू मिळून जवळपास दहा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
अजून एका संशयिताचा या गुन्ह्यात हात असल्याचा व त्याचा शोध चालू असल्याची माहिती निरीक्षक गावकर यांनी दिली. हे तपास काम उत्तर गोवा अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या देखरेख व मार्गदर्शनाखाली झाले.
संशयितांची गुन्हेगारी पार्श्र्वभूमी
अटक केलेल्या संशयितांना यापूर्वीही आम्स एक्ट केसमध्ये 2020 साली वाळपई पोलिसांनी पकडले होते. या युवकांचा कर्नाटक व महाराष्ट्रातील इतर सोनसाखळी हिसकावण्याची प्रकरणे व घरफोडीच्या प्रकरणांमध्ये सहभाग असल्याने इतर राज्यांत त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.