
Panaji Smart City Work No Sign Notice Board
पणजी: पणजीत सध्या स्मार्ट सिटीची कामे पुन्हा जोमाने सुरू झाली आहेत. रस्त्याच्या बाजूच्या गटारांचे व पदपथांचे काम सुरू आहे. या कामानिमित्त खोदकाम सुरू आहे, परंतु काम सुरू असल्याचे सूचित करणारे फलक स्मार्ट सिटी किंवा संबंधित कंत्राटदाराने उभारलेले नाहीत. त्यामुळे हे खोदकाम दुचाकीस्वारांना रात्रीचे धोकादायक ठरू शकते.
गतवर्षी २०२३ च्या शेवटच्या दिवशी मध्यरात्री मळ्यातील खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. मलनिस्सारण चेंबरसाठी खोदकाम करण्यात आलेल्या ठिकाणी सभोवताली बॅरिकेडस् किंवा दिव्यांची सोय करण्यात आली नव्हती. त्यामुळे मध्यरात्री या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने रायबंदर येथील युवकाची दुचाकी खड्डयात पडली होती आणि त्यात त्या युवकाचा अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेच्याविरोधात संबंधित यंत्रणेविरोधात युवकाच्या पालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
मळ्यातील घटना घडल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने सर्व ठिकाणी फलक आणि त्यावर लाल रंगाचे रेडियम, तसेच रात्रीचे लुकलुकणारे लाल दिवेही लावले होते. या घटनेविषयी माहिती असतनाही रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीने वाहनधारकांना काम सुरू असल्याचे दिसेल, असे फलक लावलेले नाहीत.
खरेतर यापूर्वी कामे सुरू असताना महापौर सतत पाहणी करीत असत, परंतु अद्यापी महापौर रोहित मोन्सेरात सुरू असलेल्या कामांकडे फिरकलेच नाहीत. कामे करणाऱ्या यंत्रणेला किंवा कंत्राटदार कंपनीला फलक लावणे गरजेचे असल्याचे महापौरांनी यापूर्वी सांगितले होते, पण तसे काही होताना दिसत नाही.
खोदकाम करून झाल्यानंतर तात्काळ मातीचे ढिगारे हटविणे आवश्यक आहे. परंतु ते हटविले जात नाहीत, त्यामुळे बाजूच्या दुकांनांमध्ये हवेमुळे उडालेली धूळ येत असल्याच्या तक्रारी आहेत. सध्या काँग्रेस हाऊसजवळील, डॉन बॉस्को विद्यालयासमोरील रस्त्याच्या बाजूच्या गटाराचे आणि पदपथांचे काम सुरू आहे. त्यासाठी खडी, वाळू आणि पेव्हर्स आणून ठेवण्यात आले आहेत, त्याशिवाय मातीचे ढिगारे हटविणे गरजेचे असूनही यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.