Crime Against Women In Goa 7 murders 100 assault cases in 7 months
मडगाव: आपला गोवा अवघ्या १२ तालुक्यांचा असूनही येथे महिलांवरील अत्याचारात मात्र दिवसेंदिवस वाढ होत आहे. १ जानेवारी ते २५ नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात तब्बल सात महिलांचे खून झाले असून बलात्कारांची ४७ प्रकरणे तर विनयभंगाची ५२ प्रकरणे नोंद झाली आहेत. यामुळे गोव्यातील महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
गोव्यातील महिलांची सुरक्षाही धोक्यात असल्याचे दिसून आले. याचे उदाहरण देताना, गोवा कॅनच्या महिला आघाडीच्या निमंत्रक लॉर्ना फर्नांडिस यांनी चार दिवसांपूर्वी पारोडा-केपे येथे दिवसाढवळ्या उबाल्दिना ब्रागांझा या ५५ वर्षीय महिलेच्या झालेल्या खुनाचे उदाहरण दिले. या महिलेचा खून चोरीच्या उद्देशाने करण्यात आला होता. सदर महिला युकेत कामाला होती. आपल्या घराची डागडुजी करण्यासाठी ती परत गोव्यात आली होती. या महिलेकडे भरपूर पैसे आहेत, याची जाणीव संशयिताला असल्यानेच त्याने तिचा खून केला असे सांगण्यात येते.
२१ एप्रिल रोजी अशा प्रकारचा आणखी एक खून खारेवाडे-वास्को येथे झाला होता. आपल्या घरात एकटीच राहणाऱ्या गायत्री मराठे या ८३ वर्षीय वृद्धेचा अशा प्रकारे एका संशयिताने खून केला होता. तर बऱ्याच कालावधीने हा संशयित पोलिसांना सापडला होता.
घरगुती भांडण, बाहेरख्याली वृत्ती आणि पत्नीवर असलेला अविश्वास यामुळेही गोव्यात तीन महिलांचे खून झाले. यातील पहिला खून ९ जानेवारी रोजी नेसाय येथे झाला होता. घरगुती भांडणांतून मारियो ओलिव्हेरा या संशयिताने आपली मावशी फ्लोरेन्तिना फर्नांडिस (५३) हिचा गळा चिरून खून केला होता. १९ जानेवारी रोजी गौरव कटियार या मध्यप्रदेश येथील युवकाने आपली २७ वर्षीय पत्नी दीक्षा गंगवार हिचा ‘काब द राम’ येथे पाण्यात बुडवून खून केला होता. तर पत्नीवरील संशयावरून २४ मे रोजी वास्को येथील वैशाली केसरकर या ४२ वर्षीय महिलेचा तिच्याच पतीकडून खून झाला होता. या व्यतिरिक्त अन्य दोन महिलांचे गोव्यात खून झाले आहेत.
या ११ महिन्यांच्या कालावधीत एका युवतीचा तर एका लहान मुलीचा खुनाचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न झाला होता. यातील एक प्रयत्न उसगाव येथे एका संशयिताने आपल्या प्रेमिकेवर केला होता. आपल्या प्रेमाला नाकारत असल्याने त्या संशयिताने त्या युवतीवर फुटलेल्या बियरच्या बाटलीने हल्ला केला होता. तर दुसरा प्रयत्न सत्तरी येथे एका पाच वर्षीय मुलीवर दगड घालून तिचा खून करण्याचा प्रयत्न झाला.
गोवा वुमन्स फोरम या संघटनेच्या निमंत्रक लॉर्ना फर्नांडिस यांनी आज दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांना निवेदन सादर करून गोव्यातील महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी दहा उपायांची शिफारस केली आहे.
- पणजीत असलेले महिला पोलिस स्टेशन सुसज्ज अशा जागेत स्थापन करा आणि त्यांना आणखी कर्मचारी द्या.
- पोलिस स्थानकात ज्या महिला पोलिस उपनिरीक्षक आणि महिला शिपाई आहेत त्यांची माहिती प्रसिद्ध करा.
- तालुका स्तरावर महिला पोलिस आणि नागरिक यांच्यात संवाद सुरू करा.
- गुन्हेगारी कशी रोखावी या संदर्भात महिला शिक्षकांना प्रशिक्षण द्या.
- महिलांवर आणि मुलींवर जे अत्याचार होतात त्या संशयितांना न्यायालयात शिक्षा व्हावी यासाठी महिला पंच साक्षीदार तयार करा.
- उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनीसाठी जागृती शिबिरे आयोजीत करा
- परप्रांतीय कामगार आणि भाडेकरूंची नोंदणी अग्रक्रमाने हाती घ्या.
- महिला अत्याचारा संदर्भांतील प्रकरणांची न्यायालयीन माहिती देण्यासाठी वेबसाईट सुरू करा.
- वेश्या व्यवसाय, महिलांची तस्करी आणि एस्कोर्ट सेवा यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या साहाय्याने विशेष मोहीम सुरू करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.