
पणजी : कला अकादमीत आज ‘पुरुष’ या नाटकाच्या पहिल्या अंकात सदोष प्रकाश योजनेमुळे रंगमंचावर ‘फ्लिकर’ सुरू झाल्यामुळे दहा मिनिटे नाटक थांबवावे लागले. नाट्यप्रयोग संपल्यानंतर घडलेल्या प्रकारावर नाटकातील प्रमुख अभिनेते शरद पोंक्षे यांनी कला अकादमीच्या निष्क्रिय व्यवस्थापनावर सडकून टीका केली.
कला अकादमीमध्ये रविवारी दुपारी ‘पुरुष’ या नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. नेहमीप्रमाणे रसिकांनी नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिला प्रयोग सुरू झाल्यानंतर अकादमीच्या नाट्यगृहामधील प्रकाश योजनेतील सदोषपणा चव्हाट्यावर आला. नाटकाच्या सादरीकरणावेळीच ‘फ्लिकर’ सुरू झाला. त्यामुळे नाटक दहा मिनिटे बंद ठेवावे लागले. यावेळी रंगमंचावरूनच पोंक्षे यांना रसिकांची जाहीरपणे माफी मागावी लागली.
नाट्यप्रयोग झाल्यानंतर ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधीने पोंक्षे यांच्याशी वार्तालाप केला, त्यावेळी ते म्हणाले, आम्हाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोवेकरांनी नेहमीच माझ्या प्रत्येक नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. गोव्यात येऊन प्रयोग करायला आवडते. येथील वातावरण, गोवेकर आवडतात, असे ते म्हणाले.
कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामातील सदोषपणा वारंवार उघड झाला आहे. विशेष बाब म्हणजे, चोहोबाजूंनी अकादमीच्या कामांवर टीका होऊ लागली असून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे बोटे दाखविली जाऊ लागली आहेत.
काय म्हणाले शरद पोंक्षे?
आम्ही चार तासांसाठी मुंबईवरून येतो, नाट्यप्रयोग करतो आणि निघून जातो. परंतु येथील व्यवस्थापनाने दररोज जातीने लक्ष घातले पाहिजे. नाटक करून गेल्यानंतर आणि करण्यापूर्वीची व्यवस्था पाहिली पाहिजे.
वाहन सर्व्हिसिंगला देताना ज्याप्रकारे वाहनावरील स्क्रॅच दाखविले जातात, तसे नाट्यगृहाचे झाले पाहिजे. नाट्यगृहाला व्यवस्थापक हवा आहे. रसिक चांगले आहेत, म्हणून ते हे सर्व सहन करतात. काही रसिकांनी चिडून पैसे परत मागितले असते.
पोंक्षेंनी मागितली रसिकांची माफी
शरद पोंक्षे रसिकांना म्हणाले, की ‘हे सर्व पूर्ववत करण्यासाठी दहा मिनिटे लागणार आहेत, आम्हाला क्षमा करा. असेच बसण्यापेक्षा पडदा टाकतो. दहा मिनिटांनी पुन्हा पूर्ववत सुरू करतो. तुमचा अजिबात रसभंग होणार नाही, याची खात्री देतो’, अशी त्यांनी हात जोडून विनवणी केली. त्यांना रसिकांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
इतर असुविधांवरही ठेवले बोट
नाट्यगृहात ज्या सुविधा हव्या, त्यावरही पोंक्षे यांनी नेमकेपणाने बोट ठेवले. कलाकारांचे कपडे अडकवण्यासाठी व्यवस्था नसणे, वातानुकूलीत यंत्रणेतून गळत असलेले पाणी, बंद असलेली वातानुकूलन यंत्रणा (एसी), नाट्यप्रयोगावेळी व्यवस्थापन विभागातील कोणीही हजर नसणे, या महत्त्वपूर्ण बाबींचा पोंक्षे यांनी उल्लेख केला.
‘साबांखा’ अभियंत्यांसमोरच ‘तमाशा’
कला अकादमीचे नूतनीकरणाचे काम सुरू असताना त्यातील कामांची जबाबदारी घेणारे सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे अभियंते होते, त्यापैकी काही अभियंते आजच्या या नाटकासाठी उपस्थित होते, अशी माहिती मिळाली. नवीन बसविलेल्या प्रकाश योजनेतील त्रुटींमुळे हे नाटक काही काळ बंद ठेवावे लागल्याचे त्यांना ‘याची देही याची डोळा’ पाहावे लागले.
केंकरेंना मिळेना मुख्यमंत्र्यांची भेट
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कला अकादमीच्या नूतनीकरण कामाच्या तपासणीसाठी प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक तथा निर्माते विजय केंकरे यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्स समिती नेमली. या समितीने सरकारला अहवालही सुपूर्द केला आहे. केंकरे यांना ज्या उणिवा आढळल्या, त्या दूर करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे निश्चित केले होते; परंतु अद्याप केंकरे यांना त्यांची भेट मिळालेली नाही.
देखभालीवर हवा भर
शरद पोंक्षे म्हणाले, की ‘कला अकादमीसारखे सुंदर नाट्यगृह आहे, त्याची योग्यरित्या देखभाल केली जात नाही. त्याची देखभाल-दुरुस्ती झाली पाहिजे, तरच रसिक-प्रेक्षक येत राहतील, चांगली नाटके होत राहतील; पण असेच जर घाणेरडं राहिले तर रसिक हळूहळू येण्याचे बंद होतील!’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.