खरी कुजबुज: नगरसेवकांवर टांगती तलवार

Khari Kujbuj Political Satire: रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन जनतेच्या कराच्या पैशातून राज्यभरात करण्यात येत आहे. काही ठिकाणी वाहतूक पोलिस फुले देऊन हेल्मेट वापराचा संदेश देत आहेत तर काही ठिकाणी सवयीनुसार दंडात्मक कारवाई करत आहेत.
Khari Kujbuj
Khari Kujbuj Dainik Gomantak
Published on
Updated on

नगरसेवकांवर टांगती तलवार

पणजी महापालिकेची २०२६ मध्ये पंचवार्षिक निवडणूक होणार आहे, तोपर्यंतच अनेक इच्छुक कामाला लागले आहेत. महानगरपालिकेत बाबूश मोन्सेरात यांचा वरचष्मा राहिला आहे, पण २०२६ मध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमागे २०२७ च्या विधानसभेची तयारी असणार आहे. त्यादृष्टीनेच काही इच्छुकांनी जनसंपर्क सुरू केला आहे.

अत्यंत सावधपणे या बैठका सुरू आहेत आणि त्याची कानोकान कोणालाही खबर लागणार नाही, एवढी गुप्तता पाळली जात आहे. सध्याच्या नगरसेवकांकडून कामेच होत नसल्याचा सूर काही प्रभागांमधून येऊ लागला आहे. किरकोळ कामांसाठी आमदारांकडे जावे लागत असल्यानेही नागरिकांत नाराजी आहे. काही नगरसेवक नाराजी उघडपणे व्यक्त करीत नसले तरी त्यांनी आमदारांपासून काही अंतर ठेवून राहणेच पसंत केले आहे. त्यामुळे बाबूशकडून २०२६ मध्ये नगरसेवकांपैकी अनेकांचा पत्ता कट होण्याची शक्यता दिसतेय आहे. ∙∙∙

वाहतूकमंत्र्यांची ‘गांधीगिरी’

रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन जनतेच्या कराच्या पैशातून राज्यभरात करण्यात येत आहे. काही ठिकाणी वाहतूक पोलिस फुले देऊन हेल्मेट वापराचा संदेश देत आहेत तर काही ठिकाणी सवयीनुसार दंडात्मक कारवाई करत आहेत. यापुढे पाऊल टाकत वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो जरा पुढे सरकले आहेत.

या सप्ताहाच्या उद्‍घाटन सोहळ्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना डोस पाजल्यानंतर ते आता ‘गांधीगिरी’कडे वळले आहेत. त्यांनी गुरूवारी त्यांनी विना हेल्मेटधारी दुचाकीस्वारांना चिखली येथे हेल्मेट वाटले. याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकार हेल्मेट देणार असेल तर आम्हीही विना हेल्मेट रस्त्यावर आलो असतो, अशा प्रतिक्रीया दुचाकीस्वारांतून उमटल्या नाही तर नवल. गुदिन्हो यांच्या म्हणण्यानुसार लाखभर रुपयांची दुचाकी घेऊ शकणाऱ्या दुचाकीस्वारांकडे हेल्मेट घेण्यासाठी पैसे नसतात,आता बोला. ∙∙∙

अस्मानी संकटापुढे शेतकरी हतबल

अस्मानी संकटापुढे शेतकरी आणि बागायतदार पुन्हा एकदा हतबल ठरला आहे. पावसाळ्याच्या सुरवातीलाच धुवांधार पाऊस कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती आणि बागायतीची हानी झाली. त्यावेळेला सरकार शेतकरी आणि बागायतदारांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली.

कृषीमंत्री रवी नाईक यांनी नुकसानग्रस्त शेतकरी आणि बागायतदारांना भरपाई मिळावी म्हणून प्रश्‍न लावून धरला आणि चतुर्थीलाच शेतकरी आणि बागायतदारांना ही नुकसान भरपाई मिळालीही. पण आता परतीच्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार दणका दिल्याने उरली सुरली शेतीही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेवटी सरकार म्हणून किती वेळा आणि किती म्हणून भरपाई देईल. बरोबर ना...! ∙∙∙

निवडणूक आयुक्तांचा दौरा

हरवळे पंचायतीच्या निवडणूक तयारीचा आढावा राज्य निवडणूक आयुक्त दौलत हवालदार यांनी गुरुवारी घेतला. एखाद्या पंचायत निवडणूक तयारीचा आढावा थेट आयुक्तांनी तेथे जाऊन घेण्याची ही बाब विरळच. हवालदार यांना थेट पाहणी करून समजून घेणे नेहमीच आवडते.

वित्त आयोगाचे अध्यक्ष असताना त्यांनी पंचायती, पालिकांना तर भेटी दिल्या होत्याच त्याशिवाय महत्वाच्या बिगर सरकारी संस्थांनाही त्यांनी भेटी दिल्या होत्‍या. ते हरवळेला गेले म्हणजे ते धबधबा पाहण्यास जाण्याशिवाय कसे राहतील. साहित्याचा गाढा व्यासंग असणारे हवालदार तसे रसिक मनाचे. त्यामुळे धबधबा डोळ्यात साठवण्यासाठी ते जाणे क्रमप्राप्त होते. त्यांनी त्याचा एक छोटा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला आणि धबधब्याची माहिती सर्वांना समजली. ∙∙∙

बैठकीची गरज

कळंगुट परिसरात प्रत्येक हॉटेलची आपली सुरक्षा व्यवस्था आहे. या यंत्रणेतील बाऊन्सर्स कसे वागतात याच्या सुरस कहाण्या अनेकदा पर्यटकांना चोप बसल्यावर ऐकायला मिळतात. आता या बाऊन्सर्सनी स्थानिकांवर हात उगारल्यानंतर तो मोठा प्रश्न झाला आहे. यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कळंगुटला धाव घ्यावी लागली. त्यांनी हॉटेल प्रतिनिधींची बैठक घेत सुरक्षा हा पोलिसांचा विषय असल्याचे समजावून सांगितले.

यासाठी गुरुवारी एका बैठकीचे आयोजनही केले. आता पोलिसांची हद्द हॉटेलबाहेर आणि आतील सुरक्षा ही खासगी असा हॉटेलवाल्यांचा जो समज आहे, त्याला तडा या बैठकीतून गेला की नाही हे लवकरच समजेल. पर्यटकांवर काबू ठेवण्यासाठी अशी यंत्रणा हवी,असा हॉटेल वाल्यांचा अनुभव आहे. याला तूर्त पोलिसांकडे उत्तर नाही. कायदा हाती घेऊ नका, असे सांगून बैठक गुंडाळण्याची वेळ त्‍यांच्यावर आल्याची वदंता आहे. ∙∙∙

आलेक्सबाब करणार काय?

प्रदूषण नियंत्रण मंडळाने कुंकळ्ळी आयडीसीतील सील केलेल्या फिश मील प्लांटना जबर दंड ठोठावून व काही अटी घालून ते सुरू करण्याचे परवाने देऊन आठवडा उलटतो तोच त्या प्रकल्पांतून प्रचंड दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांना तेथील वाहने अडवावी लागली. यावरून तिथे आलबेल नाही, हेच सिध्द झालेय.

यातून पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा स्थिती पूर्वपदावर आल्याचा जो दावा करत होते, तो फोल असल्याचेच यातून उघड झाल्याचे रहिवासी म्हणताहेत. तसे असेल तर त्या प्रकल्पांचे सील नेमके कुणाच्या सांगण्यावरून काढले गेले, असा प्रश्न आता येत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विश्वासार्हतेचा प्रश्नही पुढे आलाय. या प्लांट मधील वाहनांतील दुर्गंधी म्हणे तेथून पाच कि.मी. पर्यंत पसरली होती. तसे असेल तर ती प्लांटमधील उत्सर्जनाची की, फीश प्रक्रिया उद्योगातील याचा शोधही घ्यावा लागणार आहे. ∙∙∙

हम करे सो कायदा!

भंडारी समाजाच्या आमसभेत केंद्रीय समिती विरोधात युवकांनी आक्रमक भूमिका उघड केल्यानंतर सभा झालीच नाही. भंडारी समाजाच्या घटनेत म्हणे आपल्या सोयीनुसार बदल केल्यावरून हा वाद झाला. समाजातील विविध पदांसाठी निवडणूक लढवायची असेल, तर काही नवीन नियम बनवण्यात आले आहेत. त्यात भंडारी समाजा बाहेर लग्न केलेल्या सदस्याला निवडणूक लढवता येणार नाही.

भारतीय संविधानात सर्व नागरिकांना समान हक्क देण्यात आले. आत्ता भंडारी समाजाच्या केंद्रीय समितीने ते हक्कच समाजाच्या घटनेत असा बदल केल्याने भंडारी समाजाचा नवा देश निर्माण करण्याची तयारी त्यांनी केल्याचे दिसते. कारण संविधानात नागरिकाला आपल्या मर्जीनुसार धर्म, जाती, रंग याची फिकीर न करता लग्न करण्याचा हक्क दिलाय. पण, सत्तेत राहण्याच्या महत्वाकांक्षेमुळे येत्या काळात समाजात नवे नेतृत्व घडणार नाही आणि याचे हानिकारक परिणाम समाजावर होणार, हे नक्की. त्यामुळे ‘हम करे सो कायदा’ या केंद्रीय समितीने केल्याचा विषय सध्या समाजात गाजतो आहे. ∙∙∙

Khari Kujbuj
खरी कुजबुज: ‘शॅक’धारकांना सुखद धक्का!

कुडचड्याचे कमळ सिद्धार्थच्या हाती?

‘स्लो अँड स्टेडी विनस् दी रेस’ अशी इंग्रजीत एक म्हण आहे. उगाच रिकाम्या भांड्यासारखा आवाज केला म्हणून राजकारणात यश मिळत नाही, हे हुशार राजकारणी जाणतात. कुडचडे मतदार संघातील सिद्धार्थ गावस देसाई हा असाच भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता ज्याचे नेतृत्व गुण हेरून भाजपने त्यांना प्रोजेक्ट करायला सरावात केली आहे, अशी चर्चा कुडचडे मतदारसंघात रंगत आहे.

नीलेश काब्राल यांना पर्याय म्हणून भाजपने सिद्धार्थ यांच्या हातात कमळ देण्याचा प्लॅन तयार ठेवल्याची दबक्या आवाजातली चर्चा आहे. सिद्धार्थ यांच्या गळ्यात पक्षाने दक्षिण गोवा जिल्हा पंचायत उपाध्यक्षपदाची माळ टाकली आहे. अजातशत्रू असलेले सिद्धार्थ पुढे आमदारकीच्या रेसमध्येही असू शकतात. सिद्धार्थ यांचे नीलेश काब्राल यांच्याशी चांगले नाते असले तरी राजकारणात इतरांच्या सावलीत राहून स्वतःची वाढ होणे अशक्य आहे, हे सिद्धार्थही जाणतात. सिद्धार्थ कुडचडे मतदार संघात भाजपचा चेहरा बनल्यास आश्चर्य वाटू नये. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com