Goa Politics: खरी कुजबुज; पणजीत काय घडणार...

Goa Latest Political News: आजवर दुर्लक्षीत राहिलेल्या पर्यटन स्थळांत रस्ते, निवास, स्वच्छतागृहे, चेंजींग रुम सारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या, तर त्याचा लाभ पर्यटकांना तरी होईल.
Khari Kujbuj
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

पणजीत काय घडणार...

याच आठवड्यात राजधानी पणजी महापालिकेची निवडणूक होणार असून कधी नव्हे, ते या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष वेधून राहिलेले आहे. आजवर म्हणजे महापालिका अस्तित्वात आल्यापासून आजवर कधीच तिच्या निवडणुकीला इतके महत्त्व आले नव्हते. जरी ही निवडणूक पक्षीय पातळीवर होत नसली, तरी सगळ्या राजकीय पक्षाचे नेते सध्या पणजीत घाम गाळताना दिसत नाहीत. भाजप म्हणजेच बाबूश पॅनलाविरुध्द तेथे सगळ्या विरोधी पक्षांनी पॅनेल उभे केलेले असून त्याचे नेतृत्व मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल हे करत असल्याने सगळ्यांना पणजीत काय घडणार? अशी उत्कंठा लागून राहिली आहे. काहींनी तर ही निवडणूक गोव्यातील राजकारणाची पुढील दिशा ठरविणारी ठरेल असे भाकीत केले आहे. काहींनी या निवडणुकीच्या निकालावर म्हणे पैजाही लावल्या आहेत. ही निवडणूक काही नेत्यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करेल, काही नेते उदयाला येतील, काही संपणार आहेत, असेही म्हटले आहे खरे. ∙∙∙

पाटकरांची वाटचाल

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा आज वाढदिवस. विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली, त्यानंतर त्यांच्याविरोधात गटबाजीही करण्यात आली, पण त्यातून ते तावून सुखावून निघाले. पडत्या काळात पक्षाची धुरा खांद्यावर घेत पक्ष राज्यात टिकवून ठेवण्याचे काम त्यांनी केले. लोकसभेला दक्षिण गोव्याची जागा जिंकणे, दिल्लीतून येणाऱ्या नेत्यांची उठबस करणे, त्याशिवाय पक्षाचे इतर उपक्रम राबविणे, मेळावे घेणे यासाठी त्यांनी पदरमोडही केलेली आहे, हे कोणी विसरणार नाही. कधी-कधी ते आपल्या मनातील सल बोलून दाखवतात. मात्र, मनात एक आणि ओठावर दुसरे, हे त्यांनी कधी केले नाही त्यामुळेच ते मजबूतपणे अजूनही टिकून आहेत. ∙∙∙

पर्यटनासाठी सुविधा पुरवा!

अर्थसंकल्पात पर्यटन खात्यासाठी म्हणजेच या क्षेत्रासाठी भरीव तरतूद केली आहे, पण हा निधी नेमका कोणत्या कामासाठी खर्च केला जाईल, अशी विचारणा या क्षेत्रांतील व्यावसायिक करू लागले आहेत. कारण आजवरचा अनुभव असा की खात्याचा बहुतेक निधी विदेशांत पर्यटनाच्या जाहिरातीच्या नावावर आयोजित कार्यक्रमावरच खर्च होतो. या जाहिरातीच्या नावाखाली ठरावीक मंडळी विदेशवारी मात्र करतात. प्रत्यक्षात त्याचा काहीच लाभ होत नाही. त्या ऐवजी आजवर दुर्लक्षीत राहिलेल्या पर्यटन स्थळांत रस्ते, निवास, स्वच्छतागृहे, चेंजींग रुम सारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या, तर त्याचा लाभ पर्यटकांना तरी होईल. आगोंद, काबो द राम सारखी ठिकाणे आता देश विदेशी पर्यटकांची केंद्रे बनत आहेत, पण तेथे जायला प्रशस्त रस्ते व पार्किंग सुविधा नाहीत. पर्यटन विकासाच्या नावाखाली त्या सुविधा तेथे का उपलब्ध करू नयेत, असे प्रश्न पर्यटकांकडून केले जातात. ∙∙∙

युरी समर्थक मस्त, भाजप समर्थक सुस्त!

भाजपाच्या डबल इंजिन सरकारचा धमाका कुंकळ्ळीत पहायला मिळत नाही, अशी भावना कुंकळ्ळीतील भाजपा समर्थकांची झाली आहे का? असा प्रश्न पडतो. पालिकेच्या निवडणूक जवळ आली, तरी भाजपात काहीच हालचाल दिसत नाही. भाजपकडे असलेल्या विद्यमान चार नगरसेवकांपैकी एक नगरसेविका युरी आलेमाव यांच्या कळपात गेली आहे. भाजपकडे आता फक्त तीन नगरसेवक आहेत. मात्र पुढील निवडणुकीत कुंकळ्ळी पालिका जिंकण्याची भाजपाला इच्छा नाही का? असा प्रश्न भाजपा समर्थक विचारीत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते व नगरसेवक विशाल देसाई हेही सुस्त असल्यामुळे भाजपा कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत. भाजपकडे स्थानिक नेतृत्वच नसल्याची भावना कार्यकर्त्यात झाली आहे. काही नगरसेवक भाजपाच्या उमेदवारीवर विधानसभा लढविण्याची स्वप्ने पाहत आहेत. दहा वर्षे नगरसेवक असून एक पैशाचे काम केले नाही, त्यांना जनता आमदार म्हणून निवडून देण्यात काय मूर्ख आहे? भाजपची पालिका निवडणूक लढविण्याची तयारी नसल्याचे कार्यकर्ते सरळ सांगतात. मंडळ ही सुस्त असून भाजपा थंड पाहून भाजपातील काही इच्छुक युरी आलेमाव यांच्या संपर्कात गेल्याचे कळते. एकूण काय पुढील पालिका युरी आलेमाव यांच्याकडे जाण्याची तयारी खुद्द भाजपच करीत असल्याचा दावा भाजप कार्यकर्ते करीत आहेत. ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: खरी कुजबुज; रिबेलो होणार अधिकच आक्रमक

आंदोलनांचे दिवस!

महिलादिनी गॅस दरवाढीचा ‘उपहार’ मिळाल्याची टीका करत महिला काँग्रेस रस्त्यावर उतरली. डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन केलेला प्रतीकात्मक निषेध अनेकांचे लक्ष वेधून गेला. मात्र शहरात आता दुसरीच चर्चा सुरू आहे. महागाईचा मुद्दा खरंच जनतेसाठी उचलला जातोय, की आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापवण्याची ही सुरुवात आहे. आता हे निषेध आंदोलन राजकीय रंग घेणार का? इतर पक्षाच्या महिलाही रस्त्यांवर आंदोलन करणार का? कारण यापूर्वी महागाई वाढली म्हणून नारळ, कांदे विकणारे सध्या गायब आहेत. ते कधी सक्रिय होणार? याबाबत चर्चा रंगत आहे. कदाचित उद्या ‘आप’, ‘गोवा फारवर्ड’चे कार्यकर्तेही अफलातून आंदोलन करणार की काय, अशी चर्चा होत आहे.. ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: खरी कुजबुज; ...तर बिबटे गावात येतील

...आमदारांनी दाखवला उत्‍साह!

जागतिक महिला दिनाचे औचित्‍य साधून राज्‍यातील अनेक आमदारांनी रविवारी आपापल्‍या मतदारसंघांमध्‍ये महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले. सरकारनेही ४० वर्षांवरील महिलांची ३१ मार्चपर्यंत सरकारी इस्‍पितळांत मोफत तपासणी करण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे महिलांमध्‍येही आनंद आणि समाधानाचे वातावरण पसरले आहे. परंतु, यंदाच्‍या जागतिक महिला दिनानिमित्त आमदारांनी दाखवलेला उत्‍साह हा विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच आहे. कारण निवडणुकीत महिला मतदारांचेच मतदान निर्णायक ठरत असते, अशा चर्चा काही मतदारसंघांत झडत आहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com