Goa Politics: खरी कुजबुज; कहाणी पेद्रूची... गोमले न्हूं ?

Khari Kujbuj Political Satire: स्वच्छ सर्वेक्षणात पणजी महानगरपालिकेला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. त्यामुळे महानगरपालिकेची जबाबदारी अधिक वाढली.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

पार्टी तीही दुपारी, नगरसेवकांचा हिरमोड

स्वच्छ सर्वेक्षणात पणजी महानगरपालिकेला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. त्यामुळे महानगरपालिकेची जबाबदारी अधिक वाढली. त्यामुळे अलिकडे महानगरपालिकेचे कंत्राटी कामगार स्वच्छता करताना अधिक दिसतात. आता राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याने त्याचा आनंद तर साजरा करायलाच हवा, त्यासाठी महानगरपालिकेने मळ्यातील कम्युनिटी सेंटरमध्ये पार्टी ठेवली होती. या पार्टीला हॉटेल मालक, मोठे व्यवसायिक प्रतिष्ठीत नागरिक, महानगरपालिकेचे नगरसेवक आणि कर्मचारी उपस्थित होते. ही पार्टी दुपारी ठेवल्याने अनेकांचा हिरमोड झाला. बरे ऐन श्रावणात शाकाहारीचे बंधन असल्याने अनेकांना त्याचावरच समाधान मानावे लागले. विशेष बाब म्हणजे या पार्टीसाठी सत्ताधारी नगरसेवकांनाच निमंत्रण होते, विरोधातील नगरसेवकांना त्याचे निमंत्रण दिले गेले नाही. परंतु निमंत्रण दिले नाही, तेच बरे असा त्यांचा कल दिसून आला. काही झाले तरी या पार्टीची सध्या नगरसेवकांमध्ये विविध कारणांमुळे चर्चा सुरू आहे, हे विशेष. ∙∙∙

कहाणी पेद्रूची... गोमले न्हूं ?

गोवा विधासभेत जमीन हडप प्रकरणातील चर्चा बरीज रंगली. अनेकजण खोटी कागदपत्रे करून विदेशी असणाऱ्या गोमंतकीयांची मालमत्ता हडपण्याचे प्रकार कसे करतात याची अतिशय मार्मिक माहिती पेंद्रू या काल्पनिक पात्राच्या कहाणीतून आमदार रूदाल्फ फर्नांडिस यांनी विधानसभेत मांडली. पेंद्रू हा विदेशात कामानिमित्त गेलेला असतो, परंतु कागदोपत्री अफरातफर करून नवा पेंद्रू गोव्यात तयार होतो. तो खऱ्या पेंद्रूची मालमत्ता बळकावतो आणि कामासाठी गेलेला पेंद्रू जेव्हा गोव्यात परततो त्यावेळी खोटा पेंद्रू ती मालमत्ता आपली कशी आहे दाखवून देतो... या कहाणीच्या माध्यमातून सध्यस्थिती अतिशय अचूकपणे पटवून दिल्याने अनेकांना रूदाल्फ यांच्या शैलीचे हसू येत होते परंतु... आपण बोललोय ते खरोखरच समजले आहे की नाही हे पडताळून पाहण्यासाठी ...मध्ये-मध्ये गोमले न्हूं? म्हणत विचारणाही करत होते. ∙∙∙

‘सोशा’ची करामत

काेंकणीत सशाला ‘सोसो’ असे म्‍हणतात. ससा हा तसा भित्रा प्राणी. मात्र मडगाव पोलिसात असाच एक ‘सोसो’ आहे. मात्र ताे भित्रा नसून बराच बलवान असल्‍याचे सांगितले जाते. उदाहरण द्यायचे झाल्‍यास केपेतील त्‍या पॉवरफूल साहेबाच्‍या सुरू झालेल्‍या चौकशीची त्‍याने केलेली रदबदली. असे म्‍हणतात, १ मे रोजी पहाटे केपेतील एका पोलिस शिपायाला एका युवकाने मारहाण केली. त्‍यामुळे सर्व पोलिस तणावात असतानाच दुसऱ्या दिवसी लईराई देवस्‍थानात चेंगराचेंगरी होऊन सहाजणांचा जीव गेला. लईराईच्‍या या घटनेमुळे सर्व राज्‍य शोक करत असताना केपेतील हा पॉवरफूल साहेब मात्र शिरवई येथील एसव्‍हीआर फार्ममध्‍ये आपल्‍या अन्‍य पोलिस मित्रांबरोबर स्‍वीमिंग पूलची मजा लुटत पा‍र्टी साजरी करत होता. एकूणच हा प्रकार रोम जळत असताना फिडल वाजवत बसणाऱ्या त्‍या निरोसारखा होता. या पार्टीचा व्‍हिडिओ व्‍हायरल झाल्‍यानंतर साहेबाने म्‍हणे तो व्‍हिडिओ काढणाऱ्या इसमाला धमकावत तो डिलिट करायला लावला. मात्र तोपर्यंत याची माहिती दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांपर्यंत पोचल्‍याने त्‍यांनी चौकशी सुरू केली. असे म्‍हणतात, केपेच्‍या त्‍या पॉवरफूल साहेबाने मडगावातील या ‘सोशा’ला पकडून (अर्थातच हात ओले करून) मांडवली करण्‍यास सांगितले आणि आश्‍चर्याची गोष्‍ट म्‍हणजे, ही चौकशीही बंद झाली. आहे की नाही ‘सोशा’ची करामत. ∙∙∙

फाईल नेमकी कुणाची?

आमदार विजय सरदेसाईंनी गुरुवारी शून्‍य प्रहरात बोलताना भाजपचे माजी उपाध्‍यक्ष शेख जीना यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्‍या आरोपांचा दाखल देत, भाजपच्‍या एका मुस्‍लिम नेत्‍यावर टीकास्र सोडले. या नेत्‍याने आयएएस वंदना राव शिक्षण संचालक असताना दोन मुस्‍लिम शिक्षण संस्‍थांमध्‍ये बोगस प्रमाणपत्रे देऊन काही जणांना नोकऱ्या लावल्‍याचा दावा विजय यांनी केला. अशा बोगस व्‍यक्तीला हज कमिटीच्‍या अध्‍यक्षपदावरून हटवा, अशी मागणी करीत त्‍यांनी भलीमोठी फाईल उचलली. पण, गुरुवारी पुरवण्‍या मागण्‍यांवरील चर्चा विश्‍वजीत राणेंच्‍या टीसीपी खात्‍यावर होत्‍या, हे इतरांना कळायला थोडा वेळ लागला. ∙∙∙

दिगंबरबाबाचे मोठे पद

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांची जागतिक जलतरण महासंघाच्या ब्युरो सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे, ही गोमंतकीयांसाठी अभिमानास्पद बाब. त्यासाठी कामतबाब अभिनंदनास पात्र आहेतच. त्यांच्याकडे क्रीडा क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे, हे निश्चित. कॉंग्रेसमधून भाजपात प्रवेश केल्यास दोन वर्षे झाली. अजूनही ते मंत्रिपदापासून वंचित आहेत. आता ते आशिया खंडाचे जागतिक क्रीडा संस्थेवर प्रतिनिधित्व करतात ही सुद्धा प्रतिष्ठेची बाब. मंत्रिपद मिळाले नाही, तरी जागतिक क्रीडा संघटनेमध्ये मिळालेले स्थान सुद्धा तेवढ्याच तोडीचे आहे, नाही का? ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; युरींना मिळणार मर्जीतले पोलिस

जीतच्‍या मनात काय?

राज्‍यात धीरयो कायदेशीर करण्‍यात यावा, अशी मागणी करणारी लक्षवेधी सूचना चक्‍क मगोचे आमदार जीत आरोलकर यांनी गुरुवारी विधानसभा सभागृहात केली, त्‍यावेळी ‘मगो’चे नेते तथा मंत्री सुदिन ढवळीकर मात्र शांत राहिले. ‘मगो’ पक्षाचा पाठिंबा असल्‍यामुळेच आपण ही लक्षवेधी सूचना मांडल्‍याचा दावा जीत यांनी केला, तरीही सुदिन गप्‍पच बसले. बाहेर आल्‍यानंतर मात्र धीरयो हा प्रकार हिंदू धर्माच्‍या विरोधात कसा आहे हे सांगत त्‍यांनी पक्षाचा धीरयोला पाठिंबा नसल्‍याची भूमिका घेतली. एकाच पक्षाच्‍या दोन आमदारांच्‍या परस्‍परविरोधी भूमिकांमुळे खरेच ‘मगो’त सगळे आलबेल आहे का? आणि जीतच्‍या मनात नेमके काय चाललेय? असे प्रश्‍न पडले नसतील तर नवल. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: सरकार गोवेकरांचे की दिल्लीकरांचे? आमदार वीरेश यांचा सवाल, 'सडेतोड नायक'मध्ये मांडली भूमिका

‘गोंधळात गोंधळ’

‘गोंधळात गोंधळ’ या नावाचा एक मराठी चित्रपट काही वर्षांपूर्वी बराच गाजला होता, नव्हे त्याने धुमाकूळ माजला होता. गोव्यात सध्या बेकायदा बांधकामे कायदेशीर करण्यासाठी सरकारकडून जी वेगवेगळी निवेदने केली जात आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांच्या असाच गोंधळ चालू आहे. मुख्यमंत्री एक सांगतात, महसूलमंत्री दुसरेच तर पंचायतमंत्री तर तिसरेच बोलतात त्यामुळे या बांधकामासाठी सरकार नेमके किती कायदे करणार व ते केल्यानंतर तरी त्या बांधकामांना वैधरूप मिळेल का, असा संभ्रम लोकांमध्ये तयार होऊ लागला आहे. बेकायदा बांधकामांचा हा प्रश्न गेली तीस-चाळीस वर्षे अधून मधून वर येतो. राज्यकर्त्यांच्या प्रोत्साहनानेच ती उभी राहिली आहेत व त्यामुळे असे कायदे झाल्यावर तरी त्यांच्यावरील टांगती तलवार खरेच दूर होणार का, अशी शंकाही काहीजण व्यक्त करतात तर संपूर्ण गोंधळ दूर करण्यासाठी सध्या असलेली सर्व बांधकामे कायदेशीर असे जाहीर करणारा कायदा का करू नये, असेही अनेकजण म्हणू लागले आहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com