

पणजी: राजधानी पणजीतील दयानंद बांदोडकर मार्ग (डी. बी. रोड), जुने सचिवालय आणि कॅसिनो जेटी परिसरातील बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. पर्यटक आणि कॅसिनो कर्मचाऱ्यांकडून रस्त्यांवर वाहने उभी केली जात असल्याने स्थानिक रहिवासी आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
या समस्येची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने वाहतूक पोलिसांना संबंधित भागासाठी सविस्तर कृती आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे. या प्रकरणाची न्यायालयाने स्वेच्छा दखल घेतली आहे. जुन्या सचिवालयापासून जुन्या न्यायालय परिसरापर्यंत रस्त्यांवर पर्यटकांची तसेच कॅसिनो कर्मचाऱ्यांची वाहने बेशिस्तपणे उभी केली जात असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
त्यामुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागत असून, पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणेही कठीण होत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. दरम्यान, कॅसिनो व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी स्वतंत्र शटल सेवा सुरू करावी, अशी सूचनाही सुनावणीदरम्यान मांडण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांची खासगी वाहने रस्त्यांवर आणि जेटी परिसरात उभी करण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.
झेब्रा क्रॉसिंग, बॅरिकेट्सवर चर्चा
पणजीतील कॅसिनो जेटी परिसरासह प्रमुख जंक्शनवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समस्यांवर तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती महाधिवक्ता देविदास पांगम यांनी दिली. या बैठकीत झेब्रा क्रॉसिंग, खराब झालेले बॅरिकेट्स आणि वाहतुकीशी संबंधित इतर समस्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. संध्याकाळच्या वेळी कॅसिनोंमध्ये येणाऱ्या पर्यटकांची आणि कर्मचाऱ्यांची गर्दी यामुळे प्रमुख जंक्शनवर वाहतुकीचा ताण वाढत असल्याचा मुद्दा न्यायालयीन मित्राने मांडला. वाहतूक सेलच्या सूचनांनुसार कृती आराखडा तयार करून तो न्यायालयात सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
नो पार्किंग क्षेत्र निश्चित करण्याचेही आदेश
डी. बी. रोड आणि कॅसिनो जेटी परिसरातील वाहनांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज सुनावणीदरम्यान अधोरेखित करण्यात आली. विशेषतः संध्याकाळच्या वेळी निर्माण होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोणत्या ठिकाणी ‘नो पार्किंग’ क्षेत्रे निश्चित करावीत आणि कुठे ‘झेब्रा क्रॉसिंग’ उभारावीत, याचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश वाहतूक पोलिसांना दिले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.