
डिचोली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ला भ्याड तेवढाच निर्दयी आहे. या हल्ल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी गंभीर दखल घेतली असून, हा हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना शोधून काढून त्यांचा खात्मा करण्याचा चंग बांधला आहे, असा विश्वास राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केला.
जम्मू-काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज गुरुवारी रात्री डिचोलीत मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. या दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप जीवांचे बळी गेले आहेत. मेणबती मोर्चाची सांगता करताना सदानंद शेट तानावडे बोलत होते. या हल्ल्याच्या त्यांनी कडाडून विरोध केला. डिचोली आणि मये भाजप युवा मोर्चातर्फे या मेणबत्ती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चात आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांच्यासह माजी सभापती राजेश पाटणेकर आदी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्कलकडून या मेणबती मोर्चाला सुरवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज मैदानमार्गे बसस्थानकाजवळ येताच या रॅलीची सांगता झाली. या मोर्चात उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष शंकर चोडणकर, नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर आणि नगरसेवक तसेच विविध भागातील सरपंच, पंचसदस्य सहभागी झाले होते.
मेणबत्ती मोर्चात महिला कार्यकर्त्यांची संख्या तर लक्षणीय होती. दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या आत्म्यास शांती लाभो. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना हा धक्का सहन करण्याची शक्ती प्राप्त होवो, अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून झालेला हल्ला हा अत्यंत भ्याड, निर्दयी तसेच मानवतेला काळिमा फासणारा आहे. अशा हल्ल्यास सरकारकडून कठोरपणे उत्तर देणे आवश्यक असल्याचे शिवोलीतील समर्थन संघटनेचे उपाध्यक्ष नितीन आगरवाडेकर यांनी सांगितले.
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ येथील स्वामी समर्थ मठ तसेच समर्थन संघटनेतर्फे आयोजित निषेध सभेत आगरवाडेकर बोलत होते. यावेळी समर्थनचे सचिव यदुवीर सीमेपुरुषकर, कांचन पेडणेकर, रितेश वारखंडकर, मांद्रेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
काश्मिरमधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या हिंदू बांधवांना आज गुरुवारी संध्याकाळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. फोंड्यातील क्रांती मैदानावर भारतीय जनता युवा मोर्चा फोंडा व सावर्डे मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी ही श्रद्धांजली वाहिली. यावेळी मेणबत्त्या प्रज्वलित करून दिवंगतांप्रकरणी आदरांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध करताना सरकारने याचा करारी जवाब द्यावा आणि दहशतवाद्यांचे मूळ खणून काढून त्यांना नेस्तनाबूत करावे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून आज (ता.२५) सायंकाळी वास्को भाजप मंडळातर्फे कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्ते हातात निषेधाचे बॅनर घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आमदार कृष्णा साळकर, वास्को मंडळ अध्यक्ष सिद्धार्थ कासकर, प्रवक्ता जयंत जाधव, नगरसेवक दीपक नाईक, यतीन कामुर्लेकर, उमेश साळगावकर, अरविंद शिंदे यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. हुतात्मा चौकासमोर जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन निरपराध हिंदू पर्यटकांचे हत्याकांड आता सहन करणार नाही, असे बॅनर आणि फलक घेऊन घोषणा देत परिसर दणाणून सोडला. पाकिस्तानला आता थेट उत्तर मिळायला हवे, अशा तीव्र शब्दांत आमदार कृष्णा साळकर यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी सिध्दार्थ कासकर, जयंत जाधव, दीपक नाईक यांचीही भाषणे झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.