
मडगाव/पणजी: ‘हल्ल्यापूर्वी टेकडी उतरून खाली आलो म्हणून सुदैवाने वाचलो’ अशा शब्दांत पहलगाम (काश्मीर) येथून परतलेले दामोदर नाईक (मडगाव) यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना आपला थरारक अनुभव कथन केला.
दामोदर नाईक म्हणाले, अजूनही आमच्या अंगावर शहारा येतोय. आमचा मित्रांचा एक गट फिरण्यासाठी काश्मिरला गेलो होता. बुधवारी आम्ही परतणार होतो; पण पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यामुळे आज गुरुवारी परतलो. आमचे नशीब बलवत्तर म्हणून आम्ही गोव्यात सुखरूप परतलो, असे ते म्हणाले.
पहलगामला आम्ही अगोदरचं पोहोचणार होतो; पण दुसऱ्या दिवशी रात्री तेथे गेलो. तेथून सकाळी पहलगामच्या ‘त्या’ टेकडीवर पोहोचलो आणि खाली लवकर परतलो. म्हणजेच आम्ही जेवणासाठी खाली आलो. त्यावेळी मोठ्या संख्येने पर्यटक टेकडीवर होते. लहान मुलांचाही त्यात समावेश होता. हल्ल्याच्या अर्धा तास आम्ही खाली आलो होतो, असे नाईक यांनी सांगितले.
विशेष बाब म्हणजे टेकडीवर चालत वर जावे लागते. तेथे कोणत्याही सुविधा नाहीत. त्या टेकडीवर आम्ही भेळपुरी खाल्ली, फोटोही काढले. थोडेफार इकडे-तिकडे फिरलो. नंतर आम्ही खाली आल्यानंतर कमीत कमी अर्ध्या तासाने हल्ला झाला. गोळीबाराचा आवाज ऐकू येत होता. काही तरी घडतंय याचा अंदाज आला. अजूनही आमच्या डोळ्यांसमोर ते चित्र उभे राहत आहे. काही वेळ आम्ही तेथे होतो हे सत्य की भास असेच वाटते. आणखी अर्धा तास जर टेकडीवर राहिलो असतो तर काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही, असे सांगताना नाईक भावुक झाले.
श्रीनगर विमानतळावरून दररोज ३० विमाने देशभरात झेपावतात. मात्र आज गुरुवारी ५५ विमानांनी या विमानतळावरून उड्डाण केले.
काश्मिरात फिरण्यासाठी गेलेले शेकडो पर्यटक आपापल्या गावी परतत आहेत. स्थानिक प्रशासनाने त्यांच्यासाठी विमानतळावर खास मदतकक्ष सुरू केला आहे.
श्रीनगर हा लष्करी विमानतळ असल्याने एकाचवेळी जास्त नागरी विमाने तेथे थांबवून ठेवता येत नाहीत. त्यामुळे कोलकाता, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आदी ठिकाणांहून श्रीनगरला येणारी विमानेच परत प्रवाशांना घेऊन जातात.
श्रीनगरहून गोव्यात थेट विमानसेवा नसल्याने आज तेथून किती गोमंतकीय बाहेर निघाले याची निश्चित माहिती मिळाली नाही.
जम्मू काश्मीर प्रशासनातील मूळ गोमंतकीय अधिकारी संजीव गडकर यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, सुरक्षा यंत्रणांनी शहराला वेढा घातला आहे. काल परवापर्यंत मोकळे असलेले वातावरण आता तणावपूर्ण बनले आहे.
प्रत्येक फुटावर जवान तैनात आहेत. पर्यटक हॉटेलमध्ये बसून आहेत. ज्यांच्या तिकिटांची व्यवस्था झाली ते परत निघाले आहेत.
श्रीनगरहून पहलगाम, गुलमर्ग, सोनमर्ग पर्यटनस्थळांवर जाणारी खासगी वाहतूक बंद पडली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.