पणजी: ‘गोव्यात 2017 मध्ये निवडून आलेल्या काँग्रेसच्या 17 आमदारांपैकी 15 विकले गेले आहेत, आणि फक्त दोनच शिल्लक आहेत. हा शेवटचा ‘स्टॉक’ आहे. या ‘स्टॉक’वर मोठी सवलत लागू आहे. त्यामुळे ज्याला शेवटचा ‘स्टॉक’ घ्यायचा असेल, तो घेवू शकतो. त्यामुळे पुढील वर्षी मार्चमध्ये निवडणुकीनंतर आमदारांची नवीन तुकडी येईल, असे प्रतिपादन दिल्लीतील आम आदमी पक्षाचे (AAP) कॅबिनेट मंत्री इम्रान हुसेन (Imran Hussain) यांनी केले.
‘आप’चे इम्रान हुसेन यांनी शिरोडा, कुंकळ्ळी आणि नावेली येथे रविवारी जाहीर सभा घेतल्या. यावेळी ते बोलत होते. हुसेन यांनी सांगितले की, गोव्याला (Goa) 1961मध्ये पोर्तुगीजांच्या (Portuguese) तावडीतून स्वातंत्र्य मिळाले. मात्र, नजीकच्या काळात गोमंतकीय जनता पुन्हा राजकारणातील भ्रष्टाचाराचे बळी ठरली. गोवा राज्य हे इतर पक्षांमध्ये उडी मारणाऱ्या राजकारण्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. तथापि, ‘आप’ हा राज्यातील एकमेव पक्ष आहे जो आपल्या नेता पक्षांतर करणार नाही, याची हमी देतो. ‘आप’चे उमेदवार पक्ष सोडणार नसल्याचे नमूद करून कायदेशीर शपथपत्रावर स्वाक्षरी करतील. पक्षांतर रोखण्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने हा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.
दिल्ली पॅटर्न राबवणार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे भारतातील एकमेव राजकारणी आहेत, जे प्रामाणिक राजकारण करतात. दिल्लीत त्यांनी सरकार स्थापनेपूर्वी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. यामुळे दिल्लीत जनतेने ‘आप’ला मतदान केले आणि सरकार बनवण्यात मदत केली. सध्या दिल्लीतील 34 लाख लोकांना शून्य वीज बिल येते. केजरीवाल सरकारने संपूर्ण दिल्लीत मोहल्ला क्लिनिक उपलब्ध केले आहेत. जिथे 250 प्रकारच्या आरोग्य चाचण्या मोफत केल्या जातात आणि महिलांच्या सुरक्षेसाठी 2 लाख 80 हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. महामारीच्या काळात ‘आप’ने संपूर्ण दिल्लीत वायफाय नेटवर्क सुविधा दिली आहे असे इम्रान हुसेन म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.