पणजी: पिसुर्ले येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसानभरपाई उभारलेल्या आंदोलनावेळी पोलिसांकडून मारहाण झाली होती. याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर यांच्यासह प्रकरणात गुंतलेल्या पोलिसांविरुद्ध खात्यांतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलिस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांनी आज सोमवारी दिली.
ही चौकशी महासंचालकांनी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्याकडे दिली आहे. या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल असे शुक्ला म्हणाले.
या मारहाणीप्रकरणी आंदोलनावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांच्या तसेच शेतकऱ्यांच्या जबान्या नोंदवण्यात येणार आहेत. यावेळी तेथील घटनेबाबतची माहिती मिळवण्यासाठी चित्रफितीचाही आधार घेण्यात येणार आहे असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
पिसुर्ले येथे समाजकार्यकर्ते हनुमंत परब तसेच इतर शेतकरी त्या भागातील खनिज व्यवसायामुळे त्यांच्या शेतजमिनींची तसेच पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या हानीपोटी सरकारने संबंधित कंपन्यांकडून नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली होती.
या आंदोलनावेळी शेतकऱ्यांना खाणींकडे जाणारे रस्ते अडविले होते. उपअधीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करून आंदोलकांना बाजूला काढण्यात येत असताना पोलिस व आंदोलनकर्त्यांत झटापट झाली होती.यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना लाठीहल्ला केला.
या हल्ल्यात हनुमंत परब हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यासह इतरांना ताब्यात घेऊन अटक केली व गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पुन्हा कोठडीतही त्यांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणाची तातडीने चौकशीची मागणी शेतकऱ्यांनी पोलिस महासंचालकांकडे केली होती.
वादग्रस्त कारकीर्द
पोलिस निरीक्षक असताना सागर एकोस्कर हे नेहमीच वादग्रस्त पोलिस अधिकारी म्हणून समोर आले आहेत. 2011 मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बेशिस्त वागल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले होते. सांगे येथे पोलिस स्थानक प्रमुख असताना 2018 मध्ये जानू झोरे या पंचसदस्याला कोठडीत त्यांनी मारहाण केल्याने झोरे याला इस्पितळात उपचारासाठी दाखल करावे लागले. 2020 मध्ये आयआयटी प्रकल्पविरोधात आवाज उठवणाऱ्या चार आदिवासी व्यक्तींना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले होते.
त्याच वर्षी लोक खाणविरोधात आंदोलन करत होते तेव्हा त्यांनी सरपंच सुरेश माडकर यांना मारहाण केली होती. गुळवली येथे झालेल्या आयआयटी प्रकल्प आंदोलनावेळी जमिनीच्या संरक्षणासाठी जमिनीवर झोपलेल्या महिलांवर पाय ठेवून गेल्याचा आरोप झाला होता. आता पुन्हा पिसुर्ले येथील आंदोलनात ते अडचणीत आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.