

पणजी: विधानसभेच्या तीन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एनडीझेड संबंधित प्रश्न नाकारल्यावरून विरोधकांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्टा, वीरेश बोरकर, व्हेंझी व्हिएगश आणि क्रुझ सिल्वा या सहा आमदारांनी सभापतींसमोरील हौदात धाव घेत सरकारविरोधी घोषणाबाजी केली.
त्यामुळे सभापती गणेश गावकर यांनी पहिल्या सत्रातील कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतरही आक्रमक झालेल्या युरी आलेमाव आणि वीरेश बोरकर यांना मार्शल्समार्फत सभागृहाबाहेर काढण्यात आले. प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात होताच युरी आलेमाव यांनी ‘टीसीपी’च्या कलम ३९ ‘अ’ आणि प्रादेशिक आराखडा २०२१ अंतर्गत येणाऱ्या नो डेव्हलपमेंट झोन्सची (एनडीझेड) माहिती मागविणारा प्रश्न उपस्थित केला.
‘‘आम्ही सहा विरोधी आमदारांनी हा प्रश्न विचारत विविध तालुक्यांमध्ये घोषित करण्यात आलेल्या ‘एनडीझेड’ क्षेत्रांचा तपशील, तसेच गेल्या तीन वर्षांत देण्यात आलेले सर्व्हे क्रमांक, विकास परवानग्या आणि तांत्रिक मंजुरींची माहिती मागवली होती. मात्र, सरकार त्याचे उत्तर देत नाही’’, असा दावा त्यांनी केला.
‘पॉइंट ऑफ ऑर्डर’ उपस्थित करून या निर्णयाला आपण आव्हान दिले. तरीही हा प्रश्न का नाकारला, असा सवालही त्यांनी केला. मात्र, हा प्रश्न विधानसभेच्या नियम ९-बी आणि १६-बीच्या कक्षेत येतो. मागितलेली माहिती उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांशी संबंधित आहे, असे स्पष्टीकरण सभापती गावकर यांनी दिले.
त्यावर युरी आलेमाव, कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्टा, वीरेश बोरकर, व्हेंझी व्हिएगश आणि क्रुझ सिल्वा यांनी सभापतींसमोरील हौदात धाव घेतली. ‘आम्ही सरकारला गोवा विकू देणार नाही’, अशी घोषणाबाजी त्यांनी सुरू केली. त्यामुळे काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर सभापतींनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर सहाही आमदारांनी हौदात जाऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
लागू असलेल्या नियमांनुसार हा प्रश्न स्वीकारला जाऊ शकत नाही. त्यामुळे विरोधक विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव मांडून हा विषय पुढे नेऊ शकतात, असा सल्ला सभापतींनी दिला. तरीही युरी आलेमाव आणि वीरेश बोरकर अधिकच आक्रमक झाल्याने त्या दोघांना सभागृहाबाहेर काढण्याचे निर्देश सभापतींनी मार्शल्सना दिले. त्यानुसार मार्शल्सनी दोघांनाही बाहेर काढले. नंतर शून्य प्रहराला त्यांना सभागृहात येण्याची परवानगी देण्यात आली.
विजय बसूनच
विधानसभा अधिवेशनात सातही विरोधी आमदार सरकारला संघटितपणे घेरतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, पहिल्या सत्रातील गदारोळादरम्यान आमदार विजय सरदेसाई यांनी इतर सहा आमदारांसोबत हौदात न जाता जागेवरच बसून राहणे पसंत केले. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत सभागृहात अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.