Opposition Leader Yuri Alemao Says About Government Jobs: गोव्यातील कुशल युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारची उदासीनता मुख्यमंत्र्यांनीच विधानसभेत दिलेल्या उत्तरातून उघड झाली आहे.
कौशल्य विकास अभ्यासक्रम पूर्ण करून एप्रेंटीसशीप केलेल्या युवकांना कायमस्वरूपी सरकारी नोकरी वा रोजगार मिळवून देण्यासाठी सरकारकडे कोणतीही कृतियोजना नाही, असा दावा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.
कौशल्य विकास अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ८,२४२ प्रशिक्षणार्थींपैकी २०१८ पासून आजपर्यंत केवळ ९ गोमंतकीयांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या, हे विधानसभेतील उत्तरातून स्पष्ट होते.
कौशल्य विकास आणि प्रशिक्षणार्थी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या युवकांना नोकऱ्या देण्याबाबत सरकार उदासीन आहे, असा गंभीर आरोप युरी आलेमाव यांनी केला.
२५ जुलै २०२३ रोजी माझ्या अतारांकित प्रश्न क्रमांक १३९ ला दिलेल्या उत्तरात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील ८,२४२ कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींपैकी केवळ ३,२८० जणांना सरकारी आणि खासगी क्षेत्रात रोजगार मिळाल्याचे म्हटले आहे.
या ३,२८० जणांपैकी फक्त ९ प्रशिक्षणार्थींना सरकारी नोकरी देण्यात आली असून त्यात ४ नियमित, १ कंत्राटी आणि ४ प्रशिक्षणार्थी आधारावर काम करीत आहेत, असे आलेमाव यांनी नमूद केले.
अर्थसंकल्पात तरतूद नाही
मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी ७८ कोटींचा खर्च येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. परंतु अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद केली नसल्याने या योजनाच सरकार बासनात गुंडाळणार असे दिसते, असा टोला युरी आलेमाव यांनी शेवटी हाणला आहे.
"गोवा सरकार किमान ६० टक्के गोमंतकीयांना कायम तत्त्वावर रोजगार देणाऱ्या आस्थापनांना सबसिडी प्रदान करते. रोजगार अनुदान योजनेखाली फक्त ११ कंपन्यांनी केवळ ८९ गोमंतकीयांना मागील ५ वर्षांत रोजगार दिल्याची माहिती सरकारने विधानसभेत दिली आहे. यावरून ही योजना प्रभावीपणे राबविली जात नसल्याचे दिसून येते."
- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.