प्रा. पौर्णिमा केरकर
काही दिवसांपूर्वी म्हापसा येथे घडलेली एक घटना वाचली होती. एक महाविद्यालयीन तरुणी तिची छेड काढू पाहणाऱ्या एका मध्यमवयीन गृहस्थाला चोप देत त्याच्या डोळ्यांत स्वसंरक्षणासाठी पेपर स्प्रे मारते; त्याला लथाबुक्यांनी तुडवते. अवती-भोवती बघ्यांची मोठी गर्दी जमलेली, तरीही त्यातील एखादीही व्यक्ती त्या तरुणीच्या मदतीसाठी पुढे येत नव्हती. मोबाईलद्वारे व्हिडिओ बनविण्यासाठी सारे जण व्यस्त.
तरुणीच्या धाडसाचे कौतुक सर्वत्र झाले. सदोदित घाबरत जीवन जगणाऱ्या व तोंड बंद करून आतल्या आत घुसमटून जाणाऱ्या तरुणींनी या प्रसंगातून बोध घ्यावा असेही वाटायला लावणारा हा प्रसंग होता. पेपर स्प्रे म्हणजे काय हे काही तेवढेसे माहिती करून घेतले नाही. मुलींनी स्वसंरक्षणासाठी वापरण्यासाठी एक चांगली वस्तू असा वरवरचा विचार केला. मात्र, डिचोली विद्यालयात घडलेल्या प्रसंगामुळे त्याचा दुरुपयोगही लक्षात आला.
प्रचंड अॅग्रेसिव्ह : अलीकडच्या मुलांची मानसिकता अशी कशी? ती प्रचंड अॅग्रेसिव्ह, काहीही सांगितले तर पटकन उलट उत्तरं देतात. वर्गात फारतर त्यांनी काही ऐकले तर दहा ते पंधरा मिनिटे, तुम्ही ‘अॅटीट्युड’ का दाखवता? असे विचारले तर ‘आम्हाला तुम्ही असे म्हटलेच कशासाठी?’ म्हणून ही पिढी अंगावर येते.
वर्गात येताना बॅगेत पुस्तकं नसतात. शिक्षक शिकविताना मुलं सपशेल बेंचवर आडवी तिडवी झोपत असतात. त्यासाठी अनेक कारणं देतात. वाचायला सांगितले तर ‘मला वाचता येत नाही, मी वाचणारच नाही’, असं बेधडक उत्तर दिलं जातं. अभ्यासाची पुस्तके सोडून त्यांच्या बॅगेत न चुकता असतो तो मोबाईल आणि त्याच्याच जोडीला ई-सिगारेट, मटक्याच्या स्लिप, गुटख्याची पाकिटे, त्याही पुढे जाऊन आता तर चक्क कॉन्डोमही सापडू लागले आहेत. दारू पिऊन वर्गात येऊन बसणारी मुले सुध्दा आठवी ते बारावीपर्यंतच्या वर्गात दिसू लागली आहेत. अर्थात ही उदाहरणे सरसकट लागू होणारी नसली तरी वरील उदाहरणे आढळण्याचे प्रमाण मोठे आहे.
शिक्षणाव्यतिरिक्त : किनारी भागात तर ड्रग्जच्या विळख्यात आपली पिढी कधीचीच सापडलेली आहे. त्याचे लोण आता गोव्याच्या दुर्गम भागातही पोहोचलेले आहे, हे आपले दुर्दैवच! एकापेक्षा एक भयानक घटना घडत आहेत. कुमारवयीन पिढी भरकटत असलेली समोर दिसते आणि समाज, शिक्षक, नागरिक, कुटुंब या नात्याने आम्ही हतबल होऊन घटना घडून गेल्यावर चर्चा झोडत राहतो. अलीकडे वर्तमानपत्र उघडले की अशाच बातम्या वाचनात येतात, ज्यात कुमारवयीन गुंतलेले आहेत. मग तो अपघात असो अथवा दारू पिऊन पोहायला जाऊन बुडून मरण्याची घटना. शिकण्यासाठी म्हणून येणारी पिढी शिक्षणा व्यतिरिक्त बॉय फ्रेन्ड आणि गर्ल फ्रेन्ड यांच्याच जोड्या जुळवण्यासाठी जास्त रस घेत असलेली दिसते. याला जबाबदार कोण? पालक, शिक्षक, समाज की स्वतः विद्यार्थी?
भावविश्वच बदलले : कोरोना कालावधीपूर्वीही अशा घटना सर्रास घडत होत्या; मात्र कोरोना नंतरच्या काळात शिक्षणाच्या निमित्ताने उघड उघड मुलांच्या हातात मोबाईल आला आणि शिक्षकांसमोरील विद्यार्थ्यांचे भावविश्वच पूर्ण बदलून गेले. मोबाईलच्या माध्यमातून चांगल्या कृतिशील गोष्टी करता येतात; मात्र त्याकडे लक्ष न देता अश्लील वेबसाईटवर तासन्तास घालवणे, मनावर भयानक परिणाम करणाऱ्या वेबसिरीज बघणे यामुळे मुलांची मानसिकता पार बिघडून गेलेली आहे. दहावीत टॉप करीत अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला मुलगा बारावीत पोहोचल्यावर ‘मी विद्यालयात जाणारच नाही’ असा हट्ट धरून दरवाजा बंद करून स्वतःला कोंडून घेत दिवसरात्र मोबाईल आणि लॅपटॉपवर व्हिडीओ गेम्स खेळत बसतो. अशा कितीतरी घटना त्याही सुशिक्षित, सधन कुटुंबात घडत आहेत. समाज काय म्हणेल, म्हणून प्रकरणे कोणालाही सांगितली जाते नाहीत. असंख्य गैरप्रकार घडतात; परंतु ते दडपून ठेवण्यात येतात. अशा प्रकरणाकडे बघताना ती मुलेच वाया गेलेली आहेत, असा शिक्का मारून गप्प नाही बसता येणार. त्यासाठी पालक आणि शिक्षक या दोन घटकांना महत्त्वाचे योगदान द्यावे लागेल.
पालकांची वीण सैल : पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे मूल्यांची रुजवण घरातून सहज मिळायची. स्वावलंबन, आत्मविश्वास, आदर, विश्वास, आपुलकी एकमेकांना समजून घेत, एकमेकांसाठी काही तडजोडी करत मुले चुलत, सख्या त्याचबरोबर शेजाऱ्यांच्या सहवासात वाढायची. शेतीच्या कामात वडिलांना मुलगा तर घर कामात आईला मुलगी मदत करायची. खाऊ आणला तर वाटून खायचा, आई घरी नसली तरी जेवण्याखाण्यासाठी काहीही अडत नसे. भरपूर संवाद आपापसात व्हायचे. मुले बोलायची, खेळायची भांडायची, रानोमाळ फिरायची, हातपाय धुऊन तिन्हीसांजेला घरात शांत होत आपापली कामे करायची. आज मुलाला जन्म देऊन पाळणाघरात वाढवले जाते. पालकांचे स्वतःच्या असंख्य समस्या असतात. घटस्फोटांची वाढती प्रकरणे मुलांच्या मनावर खोल परिणाम करतात. दोघेही पालक नोकरीला असणे, पालकांचे विवाहबाह्य संबंध, व्यसनाधीन पालक, एकल पालकत्व, घरचे दारिद्र्य, हट्टी पालक, अतिरेकी पालकत्व, पालकांना असलेले मोबाईलचे, दारूचे व्यसन, स्थलांतरित कुटुंबे या व अशा असंख्य कारणांमुळे त्यांचे मुलांकडे लक्ष जात नाही.
हात झटकणे : मुलांना पैसे, उंची कपडे दिले म्हणजे सुजाण पालकत्व निभावले, असे नाही म्हणता येणार. मोबाईल, मोटारसायकल, दागिने ह्या फक्त निर्जीव वस्तू आहेत. मुलांना पालकांशी संवाद साधायचा असतो. कुमार वयात त्यांना कोणीतरी समजून घ्यावे ही अपेक्षा असते. त्यासाठी वेळ देणे आणि सातत्यपूर्ण संवाद साधणे या गोष्टी व्हायला हव्यात; परंतु वेळ नाही ही सबब सांगितली जाते. पालक दिवसभर बाहेर आणि घरी आल्यावर काम आणि मोबाईल असे काहीसे समीकरण झालेले आहे. मुलं विकृतीकडे वळता कामा नयेत म्हणून आपण त्यांना काही पर्याय देत आहोत का? की शाळेत पाठवले... आता शिक्षक शिकवतील म्हणून हात झटकणे बरोबर आहे?
मुले सैरभैर : आता शिक्षण, हुशारी टक्केवारीवर ठरवली जाते. शंभर टक्के गुण घेतले की ते मूल हुशार, अशी धारणा शिक्षकांची तशीच पालकांची बनलेली आहे. ही टक्केवारी चौकटीतील उत्तरे पाठ करून, कॉपी करून, शिक्षकांची मदत घेऊन लिहिलेली ठरावीक साच्याची असली तरी चालतील. ९९ टक्के गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांना जीवन शिक्षण, जीवन कौशल्ये, आत्मविश्वास, स्वावलंबन, समस्यांवर मात करून जीवन मार्गक्रमणे, संकटाला निडरपणे भिडणे, प्रचंड सकारात्मकता अंगी बाळगणे हे कोणी शिकविलेलेच नसते. ट्युशन आणि पालक-शिक्षकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या पिढीची विचारक्षमता हरवलेली दिसत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता धारण करण्याच्या या प्रवाहात मुलांचा ‘भावनिक बुद्ध्यांक’ वाढीस लागत नाही आणि याचमुळे मुले सैरभैर होत आहेत. ज्यांच्या नसानसांत संगीत भिनलेले असते तो दहावीत जास्त गुण घेतो म्हणून त्याने डॉक्टर नाहीतर इंजिनिअरिंग करायला हवी अशी सक्ती केली जाते. मुलांच्या सगळ्याच लढाया पालकच लढतात आणि त्यांना परावलंबी करतात, हे कसे होते ते लक्षातही येत नाही.
मनोविकारांच्या गर्तेत : आज कुमारवय विविध मनोविकारांच्या गर्तेत सापडले आहे. प्रत्येक विद्यालयात एकेक समुपदेशक नेमून आपल्या प्रदेशाने एक चांगला आदर्श निर्माण केला होता. मात्र, व्यवस्थापनाची अनास्था, समुपदेशन आणि शिक्षण यांची योग्य सांगड न घातली गेल्याने समुपदेशकांचीच एक संभ्रमित अवस्था निर्माण झालेली आहे. समुपदेशनाच्या नावावर एक चौकट आणि पाठ केलेली प्रश्नावली जास्त असते. अनुभव, सेवाभावी वृत्तीचा, सकस वाचन आणि प्रत्यक्षातील अनुभव यांचा अभाव असल्याने इथेही तळमळ दिसत नाही. परिणामी प्रभावशाली समुपदेशन होत नाही. भर वर्गात विद्यार्थी शिवीगाळ करतात, वर्गात सुरी चाकू घेऊन येतात. हीच मुलं अगदी लहान असताना आईच त्यांची बॅग आवरायची, त्यांच्या वह्यांना कव्हर घालणं हे ठीक आहे; परंतु त्यापुढे जाऊन त्यांचा अभ्यास स्वतः करणे, टिकीन, पाण्याची बाटली यांची काळजी घेत त्यांच्या बॅगा स्वतःच्या खांद्यावर घेऊन वाटचाल करणारी आई, मम्मी मुलांनी कुमार वयात प्रवेश केल्यावर कोठे जाते? वाढलेल्या मुलाचे दप्तर तिला कधी बघावसे वाटत नाही का? मुलांचा मोबाईल तिला अनलॉक करून त्याच्या मित्रमंडळी विषयी जाणून घ्यावेसे का वाटत नाही? मोटारसायकल, मोबाईल, पार्टीसाठी पैसे देताना त्यांनी पालक म्हणून केलेल्या कष्टांची जाणीव करून द्यावीशी वाटत नाही का?
आव्हान ओळखा : मुलांना निसर्ग, ऐतिहासिक स्थळे, नातेवाइकांची घरे, साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रम दाखविण्यासाठी वेळ का मिळत नाही? अशा घटना घडतात तेव्हा शाळा आणि कुटुंब या दोन्ही जागा ही प्रकरणे गुपचूप मिटवून टाकण्याचा प्रयत्न करतात. इथं संस्थेची, कुटुंबाची प्रतिष्ठा आड येते. वरवरच्या प्रतिष्ठेपेक्षा मुलांचे भवितव्य महत्त्वाचे आहे. त्याकडे लक्ष देऊन या पिढीसाठी सर्व घटक मिळून आपण काय करू शकतो याचा गांभीर्याने विचार करायला हवा. गुन्हे घडवून आणले जातात त्यांना जरब बसविणारी पावले उचलायला हवीच, त्याशिवाय इतरांना भीती वाटणार नाही. पिढी वाया चालली आहे, असे म्हणून गप्प बसता येणार नाही. मूल जन्मते तेव्हाच पालकांचा ही जन्म होतो. एकविसाव्या शतकात पालक होणं जरी सोपं असलं तरीही पालकत्व निभावणं ही कठीण गोष्ट आहे. आजच्या समाज, शिक्षण आणि कुटुंब व्यवस्थेसमोरील मुलांना वाढविणे एक मोठेच आव्हान आहे!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.