
पणजी: कसिनोंत ऑनलाईन गेमिंग चालते याची पोलखोल विधानसभेत झाल्यानंतर आता सरकारच्या कसिनोंवरील दुर्लक्षाची चर्चा समाज माध्यमांवर सुरू झाली आहे. गोव्यात बोटींवर ऑनलाईन गेमिंग चालू शकते अशी उपहासात्मक टीका समाज माध्यमांवर करण्यात आल्यानंतर त्यावर आलेल्या प्रतिक्रीया सरकारी कारभाराची पोलखोल करणाऱ्या ठरत आहेत.
देशभरात ऑनलाइन रिअल मनी गेमिंग ॲप्सवर बंदी आणल्यानंतरही गोव्याच्या मांडवी नदीवरील कॅसिनोंमध्ये रुलेटचे चक्र अजूनही फिरत आहे. आयआयएमचे माजी विद्यार्थी लोकेश आहुजा यांनी याला कायदेशीर विसंगती ठरवत धक्कादायक निरीक्षण नोंदवले आहे, जर तुम्ही हे खेळ गोव्यातील बोटीत खेळलंत तर ते कायदेशीर ठरतं, असे त्यांनी समाज माध्यमांवर म्हटले आहे.
ही विरोधाभासी परिस्थिती औपनिवेशिक काळातील एका जुन्या कायद्यामुळे उद्भवली आहे. १८६७ पासून भारतात रिअल मनी व नशिबावर आधारित जुगार खेळांवर बंदी आहे. मात्र, १९९९ मध्ये गोव्याने विशेष तरतूद करून पाचतारांकित हॉटेलांमध्ये व मांडवी नदीत नांगरण्यात आलेल्या जहाजांवर कसिनो सुरू करण्याची मुभा दिली. त्यानंतर या तरंगत्या कसिनोंची चर्चा देशभर झाली आणि मुंबईसह इतर राज्यांतून येणाऱ्या पर्यटकांचे ते आकर्षण बनले आहे.
दरम्यान, ऑनलाइन गेमिंग क्षेत्राने गेल्या काही वर्षांत प्रचंड झेप घेतली. देशात सुमारे १६ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल, लाखो खेळाडू आणि अब्जावधी रुपयांची गुंतवणूक या क्षेत्रात झाली होती, पण नुकतेच संसदेत पारित ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन व नियमन विधेयक २०२५ या कायद्याने या ॲप्सला थेट गुन्हेगारी स्वरूप दिले आहे.
आहुजा आपल्या लिंक्डइन पोस्टमध्ये म्हणतात, सरकारचा तर्क असा दिसतो – लोकांना खेळायला अडचण निर्माण करा. जर कोणी खरोखरच खेळायचे ठरवले, तर ते गोव्याला विमान पकडून जाऊ शकतात, पण भारताकडे सरस पर्याय आहेत.
एआयच्या युगात भारताने सर्वांसाठी बंदी हा सोपा पर्याय न स्वीकारता शहाणपणाचे नियम आखणे गरजेचे आहे, असे आहुजा म्हणतात. त्यांनी याची तुलना क्रिप्टोशी केली – वर्षानुवर्षे दुर्लक्ष आणि अचानक ३० टक्के कर व अस्पष्ट कायदेशीरता असे त्यांचे म्हणणे आहे.
तज्ज्ञांचे मत आहे, की बंदी मागणी संपवत नाही; उलट काळ्या बाजाराला खतपाणी घालते. क्रिकेटवरील सट्टेबाजी आजही बेकायदेशीर असूनही धुमाकूळ घालते.
चीनच्या कडक मर्यादांमुळे व्हीपीएन व भूमिगत व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे “दारू व सिगारेटप्रमाणे नियमबद्ध नियंत्रण हेच कायमचे उपाय असते,” असे आहुजा ठामपणे सांगतात. सध्या परिस्थिती अशी आहे – गोव्यातील बोटीवरील कसिनो सुरू आहेत. मात्र, मोबाईलवरील ॲप्स मात्र नाहीसे झाले आहेत.
आहुजा यांनी म्हटले आहे, की...
वयोमर्यादा : अमेरिकेत २१ वर्षांखालील व्यक्तींना कॅसिनोत प्रवेश नाही.
खर्च मर्यादा : ब्रिटनमध्ये ॲप्सना दररोज अथवा मासिक खर्च मर्यादा लावणे बंधनकारक आहे.
कूलिंग-ऑफ पिरेड : सिंगापूरमध्ये खेळाडू स्वतःस वर्ज्य करू शकतात, अगदी कुटुंबीयसुद्धा अशी मागणी करू शकतात.
करातून उद्देशपूर्ती : अमेरिकेत जुगार कराचा महसूल व्यसनमुक्ती व शिक्षणावर खर्च होतो.
अनिवार्य केवायसी : भारतात शेअर ट्रेडिंगप्रमाणेच आधारवर आधारित पडताळणी बंधनकारक करता येऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.