

मोरजी: ओंकार हत्तीने पुन्हा पेडणे तालुक्यातील उगवे, तोरसे भागात ठाण मांडले आहे. तो निगळे पोरस कडे या भागात आलटून पालटून प्रवास करीत आहे. हत्तीने शेतकऱ्यांचे नुकसान करण्यास सुरवात केली आहे. शिवाय, तो वाहनांनाही लक्ष्य करीत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शुक्रवारी रात्री शेट्ये वाडा, तोरसे या परिसरात हत्तीने आपला मोर्चा वळवला होता. त्या ठिकाणी केळी, कवाथे तसेच वाहनांचे नुकसान केले. ओंकार रात्रीच्या वेळी लोक वस्तीतही प्रवेश करतो. रात्रभर खाल्ल्यानंतर सकाळी पहाटे जंगलात जातो. जंगलात गेल्यानंतर ज्या ठिकाणी पूर्णपणे सावली आहे. त्या ठिकाणी तो बसून असतो.
काही प्रमाणात पाण्याची सोय कुठे आहे, त्या ठिकाणी जातो. थोड्या प्रमाणात अंगावर सोंडेद्वारे माती फेकून देतो. जशी सायंकाळ होते तेव्हा तो लोक वस्तीकडे आपला मोर्चा वळवतो. सध्या ऊन कडक असल्यामुळे दिवसभर तो सावलीत पडून असल्याचे दिसून येते.
सध्या वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडे कोणतीच यंत्रणा नसल्यामुळे ते केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. ओंकार लोक वस्तीत आल्यानंतर नागरिकच वन खात्याच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना माहिती देतात. त्यानंतर कर्मचारी हातात सुताचे गंडेल बॉम्ब, मशाली घेऊन येतात.
३० नोव्हेंबरला पत्रादेवी–फकीरफाटा मार्गे सीमाभागात प्रवेश केल्यानंतर हत्ती ‘ओंकार’ने तोरसे, तांबोसे, उगवे, निगळे, कासुले परिसरात कवाथे, केळी तसेच इतर बागायती पिकांची हानी करण्यास सुरुवात केली. स्थानिक नागरिकांनी त्याच्यावर हल्ला किंवा दगडफेक न करता संयम दाखवला.
या उलट, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात काही जणांनी हत्तीच्या अंगावर फटाके उडवण्याचा प्रकार घडला होता आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान, शुक्रवारी रात्री ओंकारने संजय शेट्ये व कृष्णकांत कोरगावकर यांच्या उस पिकांबरोबरच केळीच्या बागांची मोठी नासधूस केली. ही नासधूस अखेर कधी थांबणार? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.