
राज्यात जुनी पोलिस स्थानके मोडून त्याजागी नवीन पोलिस स्थानके बांधण्यात येत आहेत मात्र जुने गोवे येथील महत्वाच्या पोलिस स्थानकाला मुहूर्त मिळत नाही. गेल्या अनेक वर्षापासून हे पोलिस स्थानक एका घरावजा जागेत सुरू आहे. तेथे पोलिस स्थानक प्रमुखालाही बसण्याची जागा नाही. पावसाळ्यात या पोलिस स्थानकाच्या छप्परावर प्लास्टिक घालण्याची पाळी येते. पोलिस खात्याच्या तपासकामात बरीच सुधारणा झाली असली तरी या पोलिस स्थानकाला नवी संजीवनी देण्याबाबत अजूनही विचार होत नाही. देश-विदेशातून अनेक पर्यटक जुने गोवे येथील सेंट झेव्हियर शव प्रदर्शनासाठी उपस्थिती लावत आहेत व हे पोलिस स्थानक जगाच्या नकाशावर गेले आहे. पोलिस स्थानकात तक्रार देण्यास येणाऱ्या तक्रारदारांना बसण्याची सोय नाही. पोलिस निरीक्षकांच्या केबिनसाठी असलेली तसेच त्याच्या बाहेर असलेली ड्युटी मास्टर पोलिसाला बसण्यास असलेली जागा खूपच अडचणीची आहे. अनेकदा हा विषय स्थानिक आमदारांनी विधानसभेतही मांडला. त्यावेळी आश्वासने वेळोवेळी दिली जात आहेत. त्यामुळे हे पोलिस स्थानक नव्या बांधकामाच्या प्रतीक्षेत आहे. ∙∙∙
कामावर लैंगिक छळ, महिलांची सतावणूक झाल्यास त्याची दखल घेण्यासाठी नेमण्यात येणारी समिती मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी राज्याच्या मुख्य सचिवांना यासाठी परिपत्रक काढण्यास सांगू, असे म्हटल्यानंतर हा प्रश्न निर्माण झाला आहे. विमानतळावर अनेक कंपन्या कार्यरत आहेत. त्यात अनेक महिला काम करतात. त्यांच्या सुरक्षिततेचा आढावा कोण घेतो, अशी विचारणा आता होऊ लागली आहे. सरकारी कार्यालयांत नियम पाळले जात असतील पण कंत्राटी कामगार महिलांना किमान सुविधा तरी मिळतात का, याची पाहणी सरकारने करावी, असे पेडण्यात बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी विषयाला हात घातल्याने आता मोपावर काम करणाऱ्या महिलांना दाद मागण्यासाठी समित्यांचा मंच तरी उपलब्ध होणार आहे? ∙∙∙
महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात आणि पणजी भाजप मंडळाच्यावतीने उद्या, शनिवारी दुपारी ४ वाजता सम्राट थिएटरमध्ये ‘दी साबरमती रिपोर्ट'' हा चित्रपट दाखविला जाणार आहे. मोन्सेरात यांनी याविषयी व्हॉट्सॲप ग्रुपवरून जाहिरात केली होती. त्यासाठी तिकिटांसाठी संपर्क क्रमांक दिला होता. परंतु सर्वात जास्त तिकिटे म्हणे ताळगावातील मर्जीतील लोकांनीच अधिक घेतली. त्यामुळे पणजीतील आमदारांनी आयोजित केलेला शो पहायला पणजीकरांची संख्या कमी असणार अशी चर्चा सुरू झाली आहे. पणजी भाजप मंडळाच्या सदस्यांकडे या तिकिटांविषयी भाजपच्याच कार्यकर्त्यांनी विचारणा केली तर तिकीटे संपल्याचे सांगण्यात आल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. म्हणे आता पणजीतील बाबूश समर्थक पुन्हा एका शोचे आयोजन करण्यासाठी त्यांना गळ घालणार आहेत. ∙∙∙
सनबर्न धारगळ येथे होणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी या महोत्सवाला विरोध करण्यासाठी पेडण्याच्या जनतेला आपली गरज असल्यास आपण तेथे जाऊ, असे यापूर्वीच जाहीरपणे सांगितले आहे. आता आरोलकर यांनी हरमल येथे अन्न महोत्सव आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सनबर्न नको तर कशाचे आयोजन करता येईल, याचा आदर्श सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे. मोरजीतील कॅसिनोला विरोध करतानाच सकारात्मक विचार करून पर्यटनवृद्धीसाठी अन्न महोत्सवासारखे उपक्रम राबवता येऊ शकतात, असे आरोलकर यांना वाटते. हरमल येथे १२, १३ व १४ डिसेंबरला हा महोत्सव रंगणार आहे. पार्से खाजनगुंडो परिसरात दिवाळीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्यानंतर आरोलकर हे दुसरे पाऊल टाकत आहेत. त्यांची लोकप्रियता विरोधकांना धडकी भरवणारी ठरत आहे. ∙∙∙
धारगळ येथे सनबर्न व्हावा, अशी भाजपच्या राज्य सरकारची इच्छा आहे. केंद्र सरकारचीही तशीच इच्छा असावी. त्यामुळे सनबर्नला विरोध करणारे हे अराष्ट्रीय ठरतील, अशी खोचक टिप्पणी यानिमित्ताने समाज माध्यमावर केली जात आहे. या साऱ्यांत विदेशी शक्तींचा हात असावा, असा शोध कोणी लावला नाही मिळवली असेही मिश्कीलपणे नमूद करण्यात आले आहे. सनबर्न होणार असे पेडण्यात स्थानिकांना वाटू लागले आहे. विरोध करणारे का विरोध करत आहेत याची कारणे दडून राहिलेली नाहीत. विरोध करणाऱ्यांचे मनपरिवर्तन करण्याची खुबी गोव्यात अनेक वर्षे सनबर्नचे आयोजन करणाऱ्यांना निश्चितपणे माहीत आहे. त्यांनी तो हुकमी पत्ता फेकला की, सारेकाही शांत होईल, अशी चर्चा पेडण्यात सुरू झाली आहे. सोमवारी धारगळ पंचायत मंडळ तरी जनभावनांची कदर करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.∙∙∙
कुडचडे येथे सध्या तन्वी वस्त हिने केलेले फसवणूक कांड गाजत असतानाच कुडचडेचे माजी पोलिस निरीक्षक वैभव नाईक यांची केलेली बदलीही गाजत आहे. वैभव नाईक यांची बदली नेमकी कोणत्या कारणासाठी केली, असा प्रश्न लोक उपस्थित करत आहेत. याचे कारण म्हणजे, सुरुवातीला तक्रारदारच तक्रार करण्यास तयार नसल्याने ही तक्रार नोंदविण्यास दोन दिवस उशीर झाला ही जरी गोष्ट खरी असली तरी या प्रकरणात पहिली एफआयआर निरीक्षक वैभव नाईक यांनीच नोंदविली होती आणि तन्वीला अटकही त्यांनीच केली हाेती. म्हणजे वैभव नाईक यांनी आपल्या कर्तव्यात कुठलीही कसर ठेवली नव्हती, असे असताना त्यांची बदली करण्याचे कारण काय हा प्रश्र्न उपस्थित होतो. वैभवच्या बदलीमागे नेमके हेच कारण आहे की त्यांना या प्रकरणात बळीचा बकरा बनविण्यात आले आहे? ∙∙∙
कुचेली कोमुनिदाद जागेत बेकायदारित्या भूखंड पाडून परस्पर ते विकण्यात आले होते. यात पोलिसांनी काही संशयितांना अटक केली होती, ज्यामध्ये एका म्हापसा पालिका कर्मचाऱ्याचा देखील समावेश होता. या कर्मचाऱ्याला शुक्रवारी पालिका अधिकाऱ्यांनी निलंबित करण्याचा आदेश काढला. विशेष म्हणजे, ज्यांची घरे पाडण्यात आली, त्यांनी पालिकामधील काही लोकप्रतिनिधी यात असल्याचा दावा केला होता. मात्र ऑफिशियली त्या नावांचा तक्रारीत उल्लेख केला नव्हता. जर नावे लिहिली असती, ते या लोकप्रतिनिधींची प्रचंड नाच्चकी झाली असती. सुरुवातीला काही लोकप्रतिनिधी तर माध्यमांच्या प्रतिनिधींना फोन करून या प्रकरणात कुणाकुणाचा उल्लेख आहे, असे विचारणा करत होते. काहींनी तर भीतीने अटकपूर्व जामिनासाठी धाव घेण्याची देखील तयारी ठेवली होती! आता पोलिसांचा तपास कसे वळण घेते व भविष्यात इतर कुणाची नावे समोर येणार की, या प्रकरणाचा तपास हा केवळ फार्स बनेल हे वेळप्रसंगी समजेल. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.