
म्हापसा: ग्रंथालयाशिवाय एखादे शहर असू शकते? गेली ५ वर्षे गोव्यातील म्हापसा शहर अशा शहरांपैकी एक बनून आहे. मात्र या शहरातील ५ वर्षांपूर्वी बंद झालेले व गोव्यातील सर्वात जुन्या सार्वजनिक ग्रंथालयांपैकी एक असलेले प्रतिष्ठित अथाईड वाचनालय २३ एप्रिल रोजी पुन्हा सुरू होत आहे अशी सुवार्ता आहे. २०१९च्या सप्टेंबरमध्ये शहरातील हे एकमेव सार्वजनिक ग्रंथालय जिर्णोद्धारासाठी बंद केले गेले होते.
पोर्तुगीज राजवटीच्या काळात, १८८३ या वर्षी म्हापसा शहरात स्थापन झालेल्या या ग्रंथालयामध्ये दुर्मिळ पोर्तुगीज तसेच इतर भाषांमधील २५,००० पेक्षा अधिक पुस्तके आहेत. त्याशिवाय १८५७ पासूनच्या वर्तमानपत्रांचा आणि गॅझेट्सचा समृद्ध संग्रह त्यात आहे. या ग्रंथालयाच्या झालेल्या जिर्णोद्धारानंतर आता या ग्रंथालयात सुधारित सुविधा असतील आणि बार्देश तालुक्यातील ते पुन्हा एकदा ज्ञानकेंद्र बनेल अशी अपेक्षा आहे.
हे ग्रंथालय १२ नोव्हेंबर १८८३ रोजी डॉ. जोस जोकिम बोर्जेस आझावेदो यांनी स्थापन केले. ग्रंथालयाचे नाव फा. फ्रान्सिस अथाईड यांच्या नावावरून त्याला देण्यात आले होते. बार्देश तालुक्यातील हजारो तरुणांना शिक्षित करण्याच्या फा. फ्रान्सिस यांच्या उत्कृष्ट कार्याला ती मानवंदना होती. १९६१ मध्ये गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त झाल्यानंतर, १९६८ मध्ये गोव्यात नगरपालिका कायद्याची अंमलबजावणी झाली आणि ग्रंथालय म्हापसा नगरपालिकेच्या ताब्यात आले.
अथाइड ग्रंथालयाच्या ताब्यात असलेल्या २५,१२९ पुस्तकांपैकी सुमारे ५००० पुस्तके पोर्तुगीज भाषेत आहेत. त्या व्यतिरिक्त हिंदी, मराठी, कोकणी, फ्रेंच आणि इंग्रजी भाषेतील वाचन साहित्यही या ग्रंथालयात उपलब्ध आहे. जिर्णोद्धारासाठी बंद होण्यापूर्वी या ग्रंथालयामध्ये २४ भाषांमधील दैनिके आणि ५६ मासिके वाचकांसाठी उपलब्ध असायची. हे राज्यातील एकमेव ग्रंथालय होते ज्यात १८५७ पासून प्रकाशित झालेल्या अधिकृत राजपत्रांचा (गॅझेट) संग्रह होता. हे ग्रंथालय २०१९मध्ये बंद होईपर्यंत या ग्रंथालयाचे ६५९८ सदस्य होते.
१९१९ मध्ये, ग्रंथालयाच्या इमारतीच्या जिर्ण अवस्थेमुळे ग्रंथालय बंद करण्यात आले. २०२२ मध्ये, सहा महिन्याच्या मुदतीत पूर्ण होण्याच्या अपेक्षेने सुरू झालेले हे काम तीन वर्षे लांबले. गोवा राज्य नागरी विकास संस्थेने (सुडा) हे काम हाती घेतले होते. ३.८ कोटी रुपयांचा हा प्रकल्प शेवटी इमारतीचा जिर्णोद्धार होऊन आता पूर्ण झाला आहे. या नवीन ग्रंथालयात किशोरवयीन मुलांचा विभाग देखील सुरू करण्यात येणार आहे व त्यासाठी निधीदेखील मंजूर झाला आहे. त्याशिवाय या ग्रंथालयात डिजिटल विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव देखील विचाराधीन आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.