कुळे : धारबांदोडा तालुक्यातील सध्या मूत्रपिंड निकामी होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. खासगी दवाखान्यात डायलेसिससाठी दामदुप्पट पैसे मोजावे लागतात. सर्वसामान्यांना हा दर परवडणारा नसल्याने सरकारने मूत्रपिंड रुग्णांना सरकारी इस्पितळात डायलेसिस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. धारबांदोडा तालुक्यातही अशा रूग्णांची संख्या वाढली असून पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दरमहा सरासरी १३० रुग्णांना डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.
वाढते मधूमेहाचे प्रमाण हे मूत्रपिंड निकामी होण्याला मुख्य कारण मानले जाते. परंतु जलशुद्धीकरण प्रकल्पात होणारा क्लोरीनचा वापरही मूत्रपिंड निकामी होण्यास कारणीभूत मानला जात आहे.
गेल्या काही वर्षापासून पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्याधुनिक डायलेसिस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यात एकाच वेळी ५ रुग्णावंर डायलेसिस करता येते. रुग्णांना तसेच त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांना येजा करण्यासाठी तसेच बसण्याची खास सोय करण्यात आली आहे.
धारबांदोडा तालुक्यात अंदाजे २५-३० रुग्णांचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे आढळून आले आहे. त्याच बरोबर पाळी, उसगाव, गांजे, खांडेपार भागातील रुग्ण येथे उपचारासाठी येतात. या आरोग्य केंद्रात डायलेसिससाठी खास डॉक्टर, कर्मचारी तैनात आहे.
पिळयेत डायलेसिसची उत्तम सोय !
पिळये प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. संदेश मडकईकर यांनी सांगितले,की आरोग्य केंद्रात अत्याधुनिक पद्धतीची डायलेसिसची यंत्रे रुग्णांसाठी अधिक उपयुक्त ठरत आहेत. सुमारे १३० रुग्ण दरमहा डायलेसिस सुविधेचा लाभ घेत आहेत. यात धारबांदोडा तालुक्यातील सुमारे २५-३० रुग्णांचा समावेश आहे.
रुग्णांची चांगली सोय प्राथमिक आरोग्य केंद्रात होत आहे. क्षयरूग्णांची टक्केवारी घटली आहे. क्षय रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य केंद्राचे कर्मचारी रुग्णाच्या घरी जाऊन सर्व कुटुंबीयांचीही तपासणी करतात. तसेच यासंबंधी महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून होणारी जाहिरात रुग्णांची संख्या घटण्यास सहाय्यभूत ठरल्याचेही मडकईकर यांनी सांगितले.
‘खाणी बंद’ मुळे क्षय रूग्णांत घट
धारबांदोडा तालुक्यात अधिक प्रमाणात खाणी सुरू होत्या, त्यावेळी पिळयेत काही वर्षांपूर्वी क्षयरुग्ण आढळत होते. त्यावेळी विद्यमान पिळये प्राथमिक आरोग्य केंद्राला केंद्रीय इस्पितळ म्हणून ओळखले जाते होते. त्यानंतर सरकारने प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून दर्जा दिला. खाणी बंद पडल्या तेव्हांपासून क्षय रुग्णांची संख्या बरीच घटली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.