Goa Recruitment Scam : गोवा आरोग्य खात्यातील तब्बल 1245 जणांवर टांगती तलवार

नोकरभरती घोटाळाप्रकरणी बजावल्या नोटिसा, गोवा खंडपीठात 19 ऑक्टोबरला सुनावणी
Vishwajit Rane in GMC
Vishwajit Rane in GMCDainik Gomantak

Goa Recruitment Scam : आरोग्य खात्यातील नोकरभरती महाघोटाळाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलं होतं. याप्रकरणात प्रतिवादी तथा विविध पदासाठी निवड झालेल्या 1245 जणांना एकत्रित याचिदाराने नोटीस बजावली आहे. या याचिकेवरील सुनावणी येत्या 19 ऑक्टोबरला बुधवारी खंडपीठासमोर होणार आहे. त्यामुळे निवड झालेल्या या सर्व कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या याचिकेवरील निर्णयावर याचिकेत उल्लेख केलेल्या कर्मचाऱ्यांचं भवितव्य अवलंबून आहे.

शैलेंद्र वेलिंगकर यांनी ही याचिका सादर केली आहे. आरोग्य खात्यात तसेच गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील विविध पदांसाठी झालेल्या नोकरभरतीवेळी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. काही विशिष्ट भागातीलच उमेदवारांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे. प्रामाणिकपणे लेखी परीक्षा दिलेल्यांना वगळून गैरप्रकारे उत्तरपत्रिका तयार करून ही प्रक्रिया करण्यात आल्याचा संशय आहे. सत्तरी तालुक्यातीलच अर्ध्याहून अधिक उमेदवारांची वर्णी लावण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. निवड प्रक्रियेत काळेबेरे झाले असल्याने गोवा खंडपीठाने या नोकरभरती प्रक्रियेप्रकरणीचा सर्व दस्तावेज मागवून घेऊन त्याची चौकशी निःपक्षपाती करण्याचे निर्देश द्यावेत. ही नोकरभरती पूर्णपणे गैरप्रकारे झाली असल्याने ती रद्द करण्यात यावी अशी विनंती याचिकादाराने केली होती.

Vishwajit Rane in GMC
Yuri Alemao : राहुल गांधींचे भारतमातेशी रक्ताचे नाते; युरींनी ठणकावलं

या याचिकेवरील सुनावणीवेळी निवड झालेल्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यासाठी त्या सर्वांना याचिकेत प्रतिवादी करा, असे निर्देश गोवा खंडपीठाने दिले होते. याचिकेत प्रतिवादी केलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या पत्त्यावर नोटीस बजावणे शक्य नसल्याने खंडपीठाने याचिकादाराला एकत्रित एकच वृत्तपत्रातून नोटीस देण्याची मुभा दिली होती. त्यानुसार याचिकादाराने वृत्तपत्रात या सर्वांना नोटीस बजावली आहे.

आरोग्य खाते तसेच गोमेकॉ इस्पितळात विविध पदांसाठी नोकरभरती झाली आहे. या नोकरभरती महाघोटाळ्यामध्ये विद्यमान मंत्र्यांचा हात असल्याचा दावा याचिकेदाराने केला आहे या 1245 कर्मचाऱ्यांची निवड झाली आहे त्यामध्ये परिचारिका - 631, मल्टीटास्किंग स्टाफ (एमटीएस) - 314, कारकून - 104, वैद्यकीय नोंदणी कारकून - 18, स्टोअरकिपर - 5, कनिष्ठ टंकलेखक - 2, हलके वाहन चालक - 2, कनिष्ठ टेक्निशियन कर्मचारी - 41, डायलिसिस टेक्निशियन - 12, न्हावी - 2, ईसीजी टेक्निशियन - 7, प्रयोगशाळा सहाय्यक - 7, प्रयोगशाळा टेक्निशियन - 10, मेडिको सोशल वर्कर - 14, व्यावसायिक थेरापिस्टस् - 12, ऑर्थोपेडिक सहाय्यक - 5, फार्मासिस्ट कर्मचारी - 26, फिजिओथेरापिस्टस् - 12, रेडिओग्राफी टेक्निशियन्स - 11, वरिष्ठ टेक्निशियन्स - 9, स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट - 1 यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com