

पणजी: राज्यातील मराठी आणि कोकणी पाठ्यपुस्तके तयार करताना प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेनुसार साहित्य आहे का? कोणताही आक्षेपार्ह मजकूर नसावा, याला प्राधान्य दिले असून या पुस्तकांमध्ये जर काही बदल करायचे असतील तर तो निर्णय ‘जीएससीईआरटी’ची फेररचना समितीद्वारे घेण्यात येतील;
परंतु तुर्तास मराठी किंवा कोकणी पाठ्यपुस्तकांमध्ये बदल होणार नसून हीच पुस्तके शैक्षणिक अभ्यासक्रमात कायम राहणार असल्याचे प्रतिपादन संचालक मेघना शेटगावकर यांनी केले. पर्वरी येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
यावेळी सरिता गाडगीळ, पाठ्यपुस्तक समितीचे प्रा. अनिल सामंत, प्रा. सुशांत नाईक, एनईपी समन्वयक रूपेश सावंत उपस्थित होते. शेटगावकर म्हणाल्या, की गेल्या वर्षी विविध विषयांची ४१ पुस्तके तयार केली; परंतु येत्या वर्षात इयत्ता नववी ते बारावीपर्यंतची पुस्तके गोवा शालान्त मंडळाशी संलग्न राहून तयार करण्यात येणार आहेत. या पुस्तकांमध्ये मोठ्या प्रमाणात गोमंतकीय लेखकांना स्थान देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमात प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या मूल्यांना प्राधान्य दिले आहे. मागील दोन वर्षे १५० शिक्षकांनी ४१ पाठ्यपुस्तके तयार केली आहेत.
या पुस्तकांत जर बदल करायचे असतील, तर त्यासाठी फेररचना समिती निर्णय घेणार आहे. या समितीचे गठन लवकरच करण्यात येणार आहेत. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पुस्तकात काय मजकूर असावा, कोणता गाळावा, यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे शेटगावकर यांनी सांगितले.
मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये गोमंतकीय साहित्यिकांना, येथील संस्कृती, गोमंतकीय जीवनाला प्राधान्य देण्यात आले आहे. ही पुस्तके विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असल्याचे मत प्रा. अनिल सामंत यांनी सांगितले. सुशांत नाईक म्हणाले, की कोकणी पाठ्यपुस्तकात ज्या काही चुका आहेत, त्या टंकलेखनाच्या असल्याने सुधारता येतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.