

पणजी : राष्ट्रीय महामार्ग ७४८ च्या विस्तारासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिलेले लिखित उत्तर “दिशाभूल” करणारे असल्याची टीका भोम ग्रामस्थांनी केली आहे. त्यांनी आझाद मैदानावर पत्रकारांशी बोलताना बगल मार्ग काढावा, ही जुनीच मागणी पुढे रेटली.
गडकरी यांनी दिलेल्या उत्तरामुळे प्रत्यक्ष परिस्थिती जनतेपासून दूर ठेवली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत, भोमच्या निवासी भागाला आणि वारसा हक्क असलेल्या धार्मिक-सांस्कृतिक ठिकाणांना वळसा घालणारा स्वतंत्र बगल मार्ग ही त्यांची मूळ मागणी कायम असल्याची पुनरुच्चार केला.
दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी सरकारने पर्यायी मार्गांचा प्रादेशिक योजना २०२१ मध्ये सुचवलेल्या मार्गासह तसेच खाजन भूमीतून जाणाऱ्या मार्गाचा विचार केला आहे का, अशी विचारणा केली होती. यावर गडकरी यांनी स्पष्ट होते केले की, “गोव्यातील एनएच-७४८ चे संपूर्ण संरेखन, भोम परिसरासह, प्रादेशिक योजना २०२१ सह सर्व व्यवहार्य पर्यायांचा विचार करून अंतिम करण्यात आले आहे.
धार्मिक वा वारसास्थळांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊनच मार्गरेषा ठरवली आहे. सविस्तर प्रकल्प अहवालानुसार विद्यमान महामार्गालगतची जमीन संपादन प्रक्रिया कमीत कमी ठेवण्यासाठी भोम गावातून उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन असून हा प्रकल्प ३१ मार्च २०२५ रोजी मंजूर झाल्याचेही त्यांनी नमूद केले होते.
मात्र, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, उड्डाणपूल हा या प्रश्नाचे उत्तर नसून त्यामुळे गावात वाहतूक, प्रदूषण आणि सुरक्षिततेची समस्या अधिकच वाढेल. धर्मस्थळे व वारसास्थळांचे संरक्षण करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे गावाबाहेरून जाणारा बगल मार्ग, असा त्यांचा ठाम आग्रह आहे. स्थानिकांच्या या भूमिकेमुळे भोम परिसरातील राष्ट्रीय महामार्ग विस्ताराचा वाद आणखी उग्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.