Goa Politics: खरी कुजबुज; पर्यटन खाते काय करते?

Khari Kujbuj Political Satire: राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे हे भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मोकळे झाल्यावर पुन्हा सक्रिय झाले आहेत.
Goa Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

नीळकंठना मंत्रिपद जाण्याची भीती?

गोव्याचे मच्छीमार व्यवस्थापन व पशुपालन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केटमध्ये बांधण्यात येत असलेल्या नूतन इमारतीचे बांधकाम पाहण्यास कधीही फिरकले नाहीत. त्याचप्रमाणे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी श्वान व मांजरासाठी आयोजित केलेल्या नसबंदी शिबिरालाही त्यांनी भेट दिली नाही. या दोन्ही गोष्टी आपल्या मतदारसंघात असल्याने त्याचप्रमाणे श्वान व मांजरासाठीचे नसबंदी शिबिर आपण आयोजित केल्याने कदाचित ते आले नसावेत. इथे आल्यास त्यांचे मंत्रिपद जाण्याची भीती त्यांना असावी अशी शक्यता स्वतः सरदेसाई यांनी व्यक्त केली. ते इथे आले किंवा न आले तरी त्यांचे केव्हा ना केव्हा मंत्रिपद जाणारच की अशी चर्चा लगेच सुरू झाली. ∙∙∙

तानावडे यांची सक्रियता

राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे हे भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मोकळे झाल्यावर पुन्हा सक्रिय झाले आहेत. केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांना त्यांनी भेटी देणे सुरू केले आहे. मुरगाव बंदर प्राधिकरणापाठोपाठ भारत संचार निगमच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली. जुने गोवे येथील किनारी कृषी संशोधन परिषदेला ते बुधवारी भेट देणार आहेत. केंद्रीय पातळीवरून येणारे नेते पर्यटन भवनातील कार्यालयात येऊन भेटतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तानावडे यांचे एक प्रस्थ तयार होताना सध्या दिसत असल्याचे बोलले जात आहे.∙∙∙

२०२७ पर्यंत इंडी आघाडी टिकेल?

लोकसभा निवडणुकीत इंडी आघाडीत काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आम आदमी हे पक्ष होते. आता आम आदमी पक्ष, काँग्रेस व गोवा फॉरवर्डपासून दूर होत असलेला दिसत आहे. बाणावलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आगामी जिल्हा पंचायत व विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याचा प्रयत्न चालविला आहे. हल्लीच भाऊसाहेब बांदोडकर यांच्यावरील वक्तव्यावरून गोवा फॉरवर्डचे विजयबाब व आम आदमी पक्षाचे व्हेंझी व्हिएगश यांच्यामधील वाद पाहता २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत ही आघाडी टिकेल असे दिसत नाही. त्यातच गोवा फॉरवर्ड व काँग्रेसमध्ये होत असलेली जवळीकसुद्धा काही तरी संकेत देऊन जात आहेत असे या दोन्ही पक्षातील कार्यकर्ते बोलताना दिसत आहेत. भविष्यात विजयबाब काँग्रेस पक्षात सामील होऊन त्याचे नेतृत्व करणार नाही ना? असेही संकेत मिळत असल्याची शंका कार्यकर्त्यांमध्ये पसरत असल्याचे जाणवते. ∙∙∙

पर्यटन खाते काय करते?

गोवा पर्यटनाबाबत सोशल माध्यमांवर सुरू झालेली नकारात्मक चर्चा आता देशपातळीवर पोहोचली आहे. निवृत्त लष्करी अधिकारी आणि इतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी व्यक्त केलेल्या अनुभवांमुळे गोवा पर्यटन विभागावर टीका होत आहे. या चर्चेमुळे गोव्याच्या पर्यटन विभागाकडून सुधारात्मक पावले उचलली जातील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा पोस्टमुळे गोमंतकीय संताप व्यक्त करू लागले आहेत अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत, तरी आमचे पर्यटन विभाग गप्प का? अशी चर्चा सुरू असून पर्यटन विभाग या गोष्टींना दुजोरा देत असल्याचे लोक बोलत आहेत. गोवा हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असूनही अशा नकारात्मक चर्चांमुळे राज्याची प्रतिमा धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारच्या पुढील हालचालींकडे संपूर्ण गोमंतकीयांचे लक्ष केंद्रित झाले आहे. ∙∙∙

कोठारे यांनी कौतुक केले ते जनतेचे!

कला अकादमीत शनिवारी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात चित्रपट निर्माते व दिग्दर्शक महेश कोठारे उपस्थित होते. कोठारे यांनी आपल्या भाषणात गोव्याचे तोंडभरून कौतुके केले. हे कौतुक करताना गोवा आणि आपले एक विशेष नाते आहे, अखंड भारतात एक सर्वात उत्कृष्ट राज्य हे गोवा आहे. १९८० मध्ये आपण प्रथम गोव्यात आलो होतो. त्यावेळी आपले नुकतेच लग्न जमले होते, पण मी माझ्या पत्नीला घेऊन येऊ शकत नव्हतो. त्यावेळी तिला आपण एक पत्र लिहिले होते. फोर्ट आग्वाद येथे त्यावेळी वास्तव्यास होतो. त्यावेळी गोवा पाहून इम्प्रेस झालो होतो. त्यावेळी पाहिलेल्या गोव्यापेक्षा शंभरपटीने आज आपण इम्प्रेस झालो. काय रस्ते, काय फ्लायओव्हर्स, येथील स्वच्छता, येथील इमारती पाहून आपण स्पेन किंवा पोर्तुगालमध्ये आलो आहोत, असे म्हणावे लागते. येथील महत्त्वाची स्वच्छता, त्याचे श्रेय येथील जनतेला जाते, असे कोठारेंनी नमूद केले. त्यामुळे कोठारेंनी केलेली कोटी कितीजणांना पटकन लक्षात आली, हे माहीत नाही. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: वीरेश बोरकर म्हणतात, 'मी विरोधी पक्षाचा भाग नाही', आलेमाव म्हणतात 'ते' आहेत; अधिवेशनापूर्वी विरोधक विस्कटले

सावईकर यांचा दौरा

वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा सध्या कुठे काय करतात असा कोणालाही प्रश्न पडू शकतो. माजी खासदार नरेंद्र सावईकर यांच्यासोबत एका ठिकाणी ते शुक्रवारी वास्कोत नजरेस पडले. तेथे ते निवांत बसले होते. काही चर्चा सुरू होती. तेथे पत्रकारांचे एक पथक पोचले. साहजिकपणे पत्रकारांच्या नजरा या दोघांवर रोखल्या गेल्या. कशाची चर्चा आहे यासाठी पत्रकारांनी कान टवकारण्याआधीच दोघांनीही तेथून निघून जाणे पसंत केले. ते का निघून गेले असावेत याचा अंदाज पत्रकारांनी नंतर वर्तवणे सुरू केले होते. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: विरोधी पक्षातून ‘आरजी’ बाहेर! भाजपला पूरक घेतली भूमिका; 2027 ला मोजक्याच जागा लढवणार

नाटकाच्या अंकाचा कालावधी

नाटकांच्या स्पर्धेत पहिला अंक पावणेदोन ते दोन तासांचा व दुसरा अंक वीस मिनिटांचा अशी नवी फॅशन काहींनी सुरू केली आहे. कालावधीच्या बाबतीत सुसुत्र प्रमाणबध्दता हवी. प्रेक्षकांना चहापाणी, वॉशरूम, पाय मोकळे करणे यासाठी दीड तासाच्या आत मध्यंतर हवं. आता कोकणी नाट्य स्पर्धा सुरू व्हायची आहे. कोकणी कलाकारांना सांगणं शक्य आहे का? शर्ट गुडघ्याएवढा आणि विजार पोटऱ्यांपर्यंत व पँट वरच्या बरगड्यांपर्यंत लांब असू शकत नाही का? संपूर्ण अंग झाकलं की नाही? अशा ‘शिनिफिक्यो’ हे कोकणीवीर विचारतील. अंग झाकणं आणि अंक प्रमाणबध्दपणे मंचीत करणं हा फरक, अंकाचा किमान-कमाल कालावधी नियमावलीत दिल्यावर कळेल. इमारतीची दुरुस्ती होत नाही तिथं या नियमांची होईल? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com