Priol: प्रियोळात तिसऱ्यांदा ‘मान’ कोणाला? गावडे, ढवळीकर चुरस की तिसऱ्याच व्यक्तीला लॉटरी?

Govind Gaude: प्रियोळ मतदारसंघाचे विद्यमान आमदार गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्‍यामुळे आता प्रियोळ मतदारसंघात पुढे कोण, यासंबंधीची जोरदार चर्चा ऐकू येत आहे.
Govind Gaude
Govind GaudeDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: प्रियोळ मतदारसंघाचे विद्यमान आमदार गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्‍यामुळे आता प्रियोळ मतदारसंघात पुढे कोण, यासंबंधीची जोरदार चर्चा ऐकू येत आहे. तसे पाहिले तर या मतदारसंघात दोनवेळा निवडून आल्यानंतर तिसऱ्यांदा आमदारकीचा मान अद्याप कुणालाही मिळालेला नाही.

डॉ. काशिनाथ जल्मी, त्यानंतर दीपक ढवळीकर आणि आता गोविंद गावडे अशी ही दोन खेपांची वारी आहे. त्यामुळे यावेळेला तिसऱ्यांदा आमदारकीचा मान गोविंद गावडे की मगो पक्षाचे अध्यक्ष आणि दोनवेळा प्रियोळ मतदारसंघाचे आमदार तसेच मंत्रिपदी निवड झालेले दीपक ढवळीकर यांना मिळतो की तिसऱ्याच व्यक्तीला लॉटरी लागते हे पाहावे लागेल.

प्रियोळ मतदारसंघात दीपक ढवळीकर यांनी २००७ आणि त्यानंतर २०१२च्या विधानसभा निवडणुकीत सलग दोनवेळा बाजी मारली. तसेच सहकार आणि इतर खात्यांचा मंत्री होण्याचा मान मिळविला.

मात्र, २०१७ आणि त्यानंतर गेल्या २०२२च्या विधानसभा निवडणुकीत गोविंद गावडे विजयी झाले. २०१७ मध्‍ये अपक्ष म्हणून तर २०२२च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर त्‍यांनी निवडणूक लढविली. सातत्याने चारवेळा प्रियोळ मतदारसंघाच्या आमदाराला मंत्रिपदी राहण्याचा मान मिळाल्याने साहजिकच अनेक विकासकामे या मतदारसंघात झाली.

पण का कोण जाणे, या मतदारसंघात आत्तापर्यंत एकही उमेदवार तिसऱ्या वेळी निवडून आलेला नाही. त्‍यामुळे आता हा विक्रम गोविंद गावडे की दीपक ढवळीकर यांच्याकडून मोडला जातो की तिसऱ्याच व्यक्तीला या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते, हे पाहावे लागेल.

चारवेळा मतदारसंघाबाहेरील व्‍यक्तीला मिळाले प्रतिनिधित्व!

प्रियोळ मतदारसंघात गेल्या चार विधानसभा निवडणुकांवेळी मतदारसंघाबाहेरील व्यक्तीला या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भूषवण्याची संधी मिळाली आहे. सुरुवातीला मगो पक्षाचे उमेदवार दीपक ढवळीकर यांनी दोनवेळा निवडून येण्याची किमया साधली. तर, त्यानंतर सुरवातीला अपक्ष आणि नंतर भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून येऊन गोविंद गावडे यांनी दोनवेळा प्रियोळ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भूषविले. विशेष म्हणजे दोन्ही आमदार हे मडकई मतदारसंघातील बांदोडा पंचायत क्षेत्रातील मतदार आहेत.

Govind Gaude
Goa Cabinet: गावडेंनंतर कुणाच्या डोक्यावर टांगती तलवार? मंत्रिमंडळ पुनर्रचनेकडे आमदार, मंत्र्यांच्‍या नजरा

ढवळीकर यांचा करिष्मा कायम!

मागच्या दोन निवडणुकांत विजय मिळवू न शकलेले मगो पक्षाचे उमेदवार दीपक ढवळीकर यांनी आपला करिष्मा कायम ठेवला आहे. २०१७च्या निवडणुकीत त्‍यांना १०,४६३ मते मिळाली होती. नंतरच्या २०२२च्या निवडणुकीत ढवळीकर यांना १०,८०६ मते मिळाली. सत्तेवर नसतानाही त्‍यांनी दुसऱ्या निवडणुकीत चारशे मते जास्त घेतली. यावरून साधारणतः साडेदहा हजार मतदार दीपक ढवळीकर अर्थातच मगोच्या पाठीशी आहेत, हे स्पष्ट झाले. म्हणूनच येत्‍या निवडणुकीत पक्षाला जास्तीत जास्त मते मिळावीत यासाठी मगोकडून प्रयत्न केले जातील, हे नक्की.

Govind Gaude
Goa Politics: गावडेंच्या अडचणी वाढल्या! प्रियोळातच आव्‍हान; बेतकी-खांडोळा सरपंचांवर अविश्‍‍वास; इतर ठिकाणी हालचाली सुरू

निगळ्‍ये, नाईक ‘नापास’

प्रियोळ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अपक्ष उमेदवार तथा उद्योजक संदीप निगळ्‍ये तर नव्यानेच स्थापन झालेल्या रिव्होल्युशनरी गोवन्स अर्थातच ‘आरजी’चे उमेदवार विश्‍वेश नाईक यांनी गेल्या २०२२च्या निवडणुकीत प्रयत्न केले, पण हे अयशस्वी ठरले.

संदीप निगळ्‍ये यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने तिकीट नाकारल्‍याने बंड करून अपक्ष उमेदवारी दाखल केली. तर, आंदोलनांतून वर आलेले विश्‍वेश नाईक यांनी ‘आरजी’तर्फे उमेदवारी दाखल करून आपले नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अडीच हजार मतांवर दोघांनाही समाधान मानावे लागले.

संदीप निगळ्‍ये यांना एकूण २६९७ तर विश्‍वेश नाईक यांना २५१७ मते मिळाली. सुमारे पाच हजार मते या दोघांनी मिळविली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com