New Zuari Bridge: ‘सेल्फी विथ जुवारी’ ऑफर आहे का?

नवीन जुवारी पुलावर सेल्फी घेण्याचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिले आणि काय गोंधळ उडाला, हे आपण पाहिले आहे.
New Zuari Bridge
New Zuari BridgeDainik Gomantak

New Zuari Bridge: ‘ध’ चा ‘मा’ केल्याने काय अनर्थ घडतो, हे आपण पेशवाईच्या इतिहासात अनुभवले आहे. नवीन जुवारी पुलावर सेल्फी घेण्याचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिले आणि काय गोंधळ उडाला, हे आपण पाहिले आहे.

जुवारी पुलाच्या लोकार्पणाच्या पूर्वी पुलावर सेल्फी घेण्याची संधी मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी जनतेला दिली, लोकांनी सेल्फी घेऊन सोशल मीडियावर पोस्ट, डीपी, स्टेटस टाकले. मात्र आता पूल खुला झाल्यावरही सेल्फीची क्रेझ जात नाही.

गाड्या उभ्या करून लोक सेल्फी काढताना दिसतात. विचारल्यास आपण कोण? आम्हांला मुख्यमंत्र्यांनी आमंत्रित केल्याचे उत्तर देतात. साहेब जरा लक्ष द्या, अन्यथा अपघात होण्याचा धोका संभवतो, ती सेल्फीची ऑफर संपली, असे जाहीर करा, अन्यथा आणखी टीका होणार ती वेगळी.

कशा येणार तक्रारी

नाताळच्या पूर्वसंध्येला सुरू झालेल्या रजनींचे कर्णकर्कश संगीत संपूर्ण उत्तर गोव्यात जोमाने सुरू आहेत. त्या मानाने दक्षिण गोव्यात त्यांचे प्रमाण कमी आहे. कदाचित मोपा विमानतळामुळे आलेले नैराश्य, हे त्या मागील कारण असेल, पण मुद्दा तो नाही. उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी कडक निर्बंध घातलेले असले, तरी त्याच्या सर्रास उल्लंघनाच्या तक्रारी आहेत.

पण संबंधित अधिकारी अशा तक्रारी आल्या नसल्याचे तर लोक अधिकारी तक्रारी नोंदवून घेत नसल्याचे सांगत आहेत. त्या मागील कारण उघड आहे, ते म्हणजे सर्वांचे असलेले साटेलोटे म्हणून तर सनबर्न प्रकरणात न्यायालयाला पुढाकार घ्यावा लागला, आता या प्रकरणात काय होते पाहूया, असे तेथील कार्यकर्ते म्हणत आहेत. ∙∙∙

म्हादईबाबत आक्रमकता कधी?

केंद्र सरकारने कर्नाटकला म्हादई नदीच्या उपनद्या कळसा, भांडुरातील पाणी वळविण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे भाजपा राज्य सरकारवर चोहोबाजूने टीका होत आहे. सरकारने गोवेकारांचा विश्वासघात केल्याचा आरोप होत असून सरकार पक्षातील आमदारांनी राजीनामा देण्याची मागणी होत आहे! दुसरीकडे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी गोव्याच्या हितार्थ आपला राजीनामा देण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे.

मुळात म्हादईबाबत सुरुवातीपासून केंद्राचे कर्नाटकला झुकते माप मिळत आहे आणि आता कर्नाटकला जल आयोगाने दिलेली ही परवानगी याचे ज्वलंत उदाहरण! अशावेळी राज्य सरकारातील लोकप्रतिनिधींनी आपणहून राजीनामा देऊन गोव्याच्या हितार्थ आम्ही आहोत, हे केंद्राला कृतीद्वारे दाखविण्याची गरज होती!

मात्र तसे काही झालेले दिसत नाही आणि सरकार अजूनही शांतच आहे, असेच दिसते! आम्ही अवमान याचिका दाखल करू एवढेच सरकार दरवेळेस म्हणत आले आहे. मुळात आता सरकारने खरी आक्रमकता दाखविण्याची गरज आहे! अन्यथा राजीनामा देऊ वगैरे बोलणे हे सर्वकाही राजकीय विधानेच म्हणावी लागेल! ∙∙∙

भाड्याच्या जागेत किती दिवस

काणकोण पालिका भवन उभारण्यात येत आहे. पालिकेची जुनी इमारत मोडून त्याजागी अकरा कोटी खर्चून नवीन पालिका भवन उभारण्यात येणार आहे. मात्र ज्या गतीने भवनाचे बांधकाम सुरू आहे, ते पाहिल्यास किमान तीन वर्षाचा कालावधी भवन पूर्ण होण्यास लागणार आहे. पालिकेचा कारभार सध्या नगर्से येथील एका खासगी इमारतीत चालत आहे.

या इमारतीचे महिना भाडे 50 हजार रूपये आहे. त्यामुळे तीन वर्षांसाठी 18 लाख रुपये पालिकेला भाड्यापोटी इमारत मालकाला द्यावे लागणार आहेत. या इमारतीच्या जवळच उभारलेल्या आपत्ती व्यवस्थापन प्रकल्पाचे हल्लीच उद्‍घाटन करण्यात आहे.

या इमारतीचा ताबा जलस्रोत खात्याकडे आहे, ‘आज ना उद्या’ या इमारतीचा देखभालीसाठी ताबा पालिकेकडे येणार आहे. त्यासाठी भाड्यापोटी 18 लाख रुपये मोजण्या ऐवजी या इमारतीचा वापर पालिकेने पालिका प्रशासकीय संकुलासाठी करणे शक्य आहे. इमारतीचा वापरही होईल. पालिकेच्या निधीची बचतही होईल, अशी सूचना केल्यास त्यांत गैर ते काय? मात्र पाणी वेगळ्याच ठिकाणी मुरते आहे, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. ∙∙∙

...तो कारखाना सुरू झाला!

औट घटकेचे सुख काय असते, याचा अनुभव कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव आणि कुंकळळीकर सध्या घेत आहेत. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील एका लोह उत्पादक कारखान्याला प्रभाव मूल्यांकन दाखला नसल्यामुळे तो बंद करण्याची शिफारस पर्यावरण मूल्यांकन प्राधिकरणाने दिला होता.

कुंकळ्ळीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आपल्याच प्रयत्नांमुळे तो कारखाना बंद झाल्याचा दावा केला होता. ही तर सुरुवात आहे. आता कुंकळ्ळीतील प्रदूषण दूर होणार, असा दावाही युरींनी केला होता. पण कुठले काय, तो वादग्रस्त कारखाना सुरूच आहे. गोव्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती दिलेल्या कुंकळ्ळीकरांना प्रदूषणातून मुक्ती कधी? असा प्रश्न कुंकळ्ळीवासी विचारत आहेत. ∙∙∙

नेमकी वस्तुस्थिती कोणती

कोविडच्या दुसऱ्या लाटेवेळी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यासाठी ते खास कोविड इस्पितळ अधिसूचित केले गेले होते. नंतर महामारी नियंत्रणाखाली आली. दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू झाले, तरी अजून तेथे कोविड रुग्णासाठी वेगळी व्यवस्था तैनात केली आहे.

तर अशा या इस्पितळात गेल्या आठ महिन्यात विविध कारणावरून मृत्युमुखी पडलेल्या रुग्णसंख्येवरून सध्या विवाद खडा झाला आहे. कोणा एका आरटीआयवाल्याने मागितलेली माहिती व त्यानंतर इस्पितळ व्यवस्थापनाने दिलेले स्पष्टीकरण यामुळे नेमके खरे काय असे प्रश्न लोकांना पडत आहेत.

आजार गंभीर झाल्यानंतर रुग्णाला इस्पितळात आणले जाते, हे जरी खरे असले तरी अपुऱ्या कर्मचारी संख्येची सांगड मृत्यूशी घालणे उचित नव्हे, कारण आता एकंदरच आरोग्यव्यवस्थेत लक्षणीय सुधार झाल्याने या व्यवस्थेला मुद्दाम बदनाम तर करण्याचा हा डाव नाही ना? अशी शंका घेतली जात आहे. ∙∙∙

सावंत विरोधक टाळ्या पिटतात...

चार महिन्यांपूर्वी आठ काँग्रेस आमदार भाजपात आल्याने मुख्यमंत्री दोतोर सावंत यांचे स्थान बळकट झाले, असा राजकीय निरीक्षकांचा कयास होता. त्यानंतर मोपा विमानतळ व आता जुवारी पुलाच्या लोकार्पणामुळे त्यावर शिक्कामोर्तबच झाले होते.

राजकारण हे अळवाच्या पानावरील पाण्याप्रमाणे क्षणभंगुर असते हेच खरे. म्हादईचे पाणी पेटले व त्यामुळे भाजपमधील मुख्यमंत्री विरोधक टाळ्या पिटताना दिसत आहेत. वास्तविक कोणीही मुख्यमंत्री असता, तरी त्याने श्रेष्ठीसमोर हेच केले असते, पण ते पार्सेकर सरांना सांगणार कोण?

New Zuari Bridge
Mopa Airport: विमानतळावर टॅक्सी काउंटर सुरू करण्यासाठी टॅक्सीचालक करणार आंदोलन

पर्यावरणप्रेमी आनंदी

नव्या जुवारी पुलाच्या लोकार्पणासाठी गोव्यात आलेले केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी येथील पर्यावरणप्रेमीसाठी खरे तर दिलासा दिला असून त्यामुळे गडकरीप्रती या लोकांच्या आशा उंचावणे स्वाभाविक आहे.

गोव्यातून जात असलेल्या महामार्गाच्या दुतर्फा चांगली शोभेची व फुलांची झाडे लावण्याची सूचना एरवी कोणत्याही प्रस्तावाला विरोध करणारी ही मंडळी स्वीकारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मडगावचा पश्चिम बगल रस्ता तसेच चिंचोणे महामार्ग फांट्याबाबत दिलेल्या निवेदनाबाबत त्यांनी अभ्यास करण्याचे आश्वासन दिल्याने पर्यावरणप्रेमी आनंदीत झाले आहेत, हे खरे. ∙∙∙

उच्च शिक्षितांची बेकार फौज!

‘वाचाल तर वाचाल, नाही शिकाल तर नोकरीला मुकाल’ ही बोध वाक्ये आता कालबाह्य ठरायला लागली आहेत. एक काळ होता उच्च शिक्षण घेतलेल्यांना चांगली नोकरी मिळत होती, मात्र आज परिस्थिती बदलली आहे. दहा बीडीओच्या पदासाठी चार हजार उच्च शिक्षितांनी अर्ज केला आहे, तर 14 मामलेदार पदांसाठी एक हजार उच्च शिक्षितांनी अर्ज केले आहेत.

यावरून बेकारी केवढी आहे, याचा आपल्याला अंदाज येईल. म्हणूनच गोमंतकीय देश सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारत आहेत आणि आपण मात्र बिगरगोमंतकीयांच्या नावाने बोटे मोडत आहोत. दुःख म्हातारी मेल्याचे नाही, काळ सोकावतोय, हे आपल्या राजकारण्यांना कोण सांगणार? ∙∙∙

साहेब शुभ काम के लिए देर क्यों?

शुभ काम को देर क्यों? असे हिंदीत एक छान बोध वाक्य आहे. म्हादई नदीचा गळा घोटण्यासाठी केंद्र सरकारने कर्नाटक सरकारला खुली सूट दिल्याने गोव्यात सध्या रान पेटले आहे. म्हादई वाचविण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी सर्व आमदारांनी राजीनामे द्यावेत, अशी हाक विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आपण मंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी तयार असल्याचे म्हणतात. मात्र राजकारण्याच्या कथनीत आणि करणीत फरक असतो, याबाबत जनतेला माहिती आहे. म्हणून जनता म्हणते सायबांनो, उशीर का? नुसते ढोल काय बडवता? द्या राजीनामे. हिम्मत असेल तर द्या राजीनामा, असे आव्हान आरजीनेही दिले आहे. शुभ काम को देर क्यों? ∙∙∙

अपघाताला कारणीभूत कोण?

अल्पवयीनांमुळे अपघात होतात, हे बरोबर आहे; पण पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेही अपघात होतात, हे आधी ध्यानात घेतले पाहिजे. मोक्याच्या ठिकाणी दबा धरून अचानक रस्त्यावर येत दुचाकीस्वारांना पकडण्याचे कसब राज्यातील पोलिसांनी चांगलेच अवगत केले आहे.

अशावेळी अचानक पोलिसांना पाहिल्यावर काहीजण त्यांना चकवण्याचा प्रयत्न करतात, तर काहीजण अचानक ब्रेक लावतात. त्यामुळे वाहन घसरून दुचाकीस्वार जायबंदी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. फोंड्यात वरचा बाजार भागात ‘नो एंट्री’च्या रस्त्यावरून आलेल्या एका युवकाला पोलिसांनी असाच पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो घसरून पडला आणि जखमी झाला.

आता लोक म्हणतात, पोलिस अचानक पुढे आले आणि दुचाकी थांबवण्याचा प्रकार झाला. त्यामुळेच हा अपघात घडला. इथे पाहिले तर दोन्ही घटक दोषी दिसतात. कारण ‘नो एंट्री’तून वाहन नेणे आणि पोलिसांनी अचानक रस्त्यावर येऊन वाहन अडवणे, या दोन्ही घटना घडल्या आहेत. अखेर जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी इस्पितळात दाखल करावे लागले. केवळ दैव बलवत्तर म्हणून हा दुचाकीस्वार बचावला. अन्यथा हे प्रकरण पोलिसांवरच चांगलेच शेकले असते. ∙∙∙

हे कशाचे संकेत?

तीन दिवसांपूर्वी झुआरी नदीवरील केबल स्टेड पूल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वाहतुकीस खुला झाला. या समारंभाला भाजपमधील मानापमानाचे नाट्य समोर आले. खासदार श्रीपादभाऊ यांच्याविषयी घडलेला प्रकार अनेकांनी पाहिला. गडकरी यांनी मध्यस्थी केली म्हणून ते व्यासपीठावर पोहोचले.

विरोधकांनी म्हादईप्रकरणी नाईक यांना राजीनामा मागितला आणि तो देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. यामागे नाईक यांना काय सांगायचे आहे, ते पेल्यातील शुक्राचार्यांना नक्कीच समजले असणार. मात्र दुसरीकडे खासदार नाईक यांनी जो बाणा दाखवला, त्याचेही त्यांचे समर्थक कौतुक करीत आहेत. ‘समझनेवालोंको इशारा काफी होता है!’ हे उगाच म्हणत नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com