
पणजी: नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने यंदा पहिल्यांदाच इयत्ता सहावी ते बारावी (अकरावी वगळता) शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिलच्या ७ तारखेपासून सुरू करण्यात आले. एप्रिल महिन्यात सकाळी ८.३० ते ११.३० वाजेपर्यंत शाळा भरविल्या. आज शाळेचा शेवटचा दिवस असून उद्यापासून पाच आठवड्यांसाठी विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी सुरू होणार असून ४ जून रोजी पुन्हा शाळा सुरू होणार आहेत.
मागील महिन्याभरात सहावीच्या विद्यार्थ्यांना ‘एनईपी’च्या अनुषंगाने ब्रीज कोर्स अभ्यासक्रम घेण्यात आला तसेच यंदा दहावीला एनईपी अभ्यासक्रम लागू केल्याने शालान्त परीक्षा देणारी पहिली बॅच ठरणार असल्याने त्यांना देखील नव्या अभ्यासक्रमासोबतच, कला, व्होकेशनल आदी विषयांच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात आली.
एप्रिलमध्ये शाळा सुरू केल्यास विद्यार्थ्यांना उष्म्याचा त्रास होईल, असा आक्षेप घेतला जायचा; परंतु सर्व शाळांनी साधनसुविधा सुधारली. पिण्याच्या पाण्याची सोय, वर्गात पंखे आदी असल्याने विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास झाला अशी एकही घटना घडली नाही. मात्र, नवीन अभ्यासक्रम, कला आणि इतर अभ्यासक्रम कशा पद्धतीने शिकविणार याबाबत मात्र काही अंशी संभ्रम कायम आहे.
काही शाळांनी इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांचा निकाल २९ एप्रिल रोजी जाहीर केला, तर काही शाळा ३० रोजी शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करणार आहेत. इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा नियम आहे. परंतु यंदा जे विद्यार्थी नववीच्या वर्गात शिकत होते, त्यांचा निकाल नेमका कसा लागतो, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.