
विकास कांदोळकर
शिक्षण कला शैक्षणिक ज्ञानाच्या प्रसारापलीकडे जाऊन बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासाला चालना देणाऱ्या अर्थपूर्ण, आकर्षक अनुभवांच्या निर्मितीवर भर देते. शिक्षण कला भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचा आधारस्तंभ म्हणून फार पूर्वीपासून पूजनीय आहे. समग्र आणि समावेशक दृष्टिकोनाचे प्रतीक असलेल्या तक्षशिला आणि नालंदा यांसारख्या प्राचीन भारतीय शिक्षण संस्था ज्ञानाचे भांडार होत्या.
विभिन्न सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांचे संगोपन करत होत्या. गुरुकुलांमधील पारंपरिक भारतीय शिक्षणप्रणाली ‘शिक्षण दान’ यावर भर देत असे. शिक्षकांनी त्यांच्या शिष्यांना निःस्वार्थपणे शैक्षणिक ज्ञान देत, मूल्ये, चारित्र्य आणि निसर्गाशी प्रामाणिक संबंध जोपासला. परंतु नंतरच्या काळात या मूलभूत तत्त्वांचा हळूहळू र्हास होत गेला. वसाहतवादी राजवटीत, पूर्व-आधुनिक शिक्षण व्यवस्थेने समाजाच्या उन्नतीवर लक्ष केंद्रित केले. स्वातंत्र्यानंतर, साक्षरतेवर भर दिला.
पुढे भारताच्या शिक्षण व्यवस्थेसमोर आव्हाने निर्माण झाल्यामुळे तरुण मनांना प्रभावीपणे वाढवण्याच्या क्षमतेला अडथळा झाला. सर्वांत गंभीर समस्यांपैकी एक म्हणजे शिक्षण कलेचे व्यापारीकरण. एकेकाळी ‘ज्ञान दान’ देणारी शिक्षण कला एका उद्योगात रूपांतरित झाली. शिक्षण सार्वजनिक हित सोडून एका अत्यंत व्यावसायिक क्षेत्रात बदलले आहे. शाळा आणि महाविद्यालयांतील अफाट शुल्कामुळे कमी उत्पन्न-गटातील विद्यार्थी दर्जेदार शिक्षणाला मुकतात. खाजगी संस्था जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि शिक्षण देण्याचा दावा करून विद्यार्थ्यांच्या कल्याण आणि वाढीपेक्षा नफ्याला प्राधान्य देतात. दुसरीकडे, सार्वजनिक संस्था कमी निधी, कालबाह्य अभ्यासक्रम आणि संसाधनांच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत.
आमच्या काळात, ऐतिहासिकदृष्ट्या १९७०च्या दशकात गोव्यात शिक्षणाने कला, संगीत, नैतिकता आणि विज्ञान यांमधून विविध दृष्टिकोनाचे मूर्त स्वरूप दिले. आधुनिक स्पर्धात्मक परीक्षांच्या तीव्र दबावाशिवाय सुव्यवस्थित विकासाला चालना दिली. शिक्षक हे सामुदायिक व्यक्तिमत्त्व होते, जे वैयक्तिक सहभाग आणि मूल्य-आधारित शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरणा देत होते, शिक्षणासाठी कमी-तणावपूर्ण वातावरण तयार करत होते याची जाणीव पुढील उदाहरणाद्वारे येते.
गोव्यातील राजकारण्यांच्या दृष्टीने अजूनही मागास असलेल्या पेडण्यातील खेड्यात शिक्षण घेताना असे प्रेरणादायक शिक्षक लाभल्याने व सभोवतालच्या नैसर्गिक आणि आश्वासक वातावरणामुळे आमच्यासारखा विद्यार्थी पोहायला, शेती करायला, मासे पकडायला, झाडांवर-माडांवर चढायला, घरकाम- गवंडीकाम-सुतारकाम, शिवण-गायन-वादन-नर्तन-नाट्य-वक्तृत्व-लेखन यांसारख्या कला शिकला. तसेच इलेक्ट्रॉनिक्स-संगणक-सोलर-विंड यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रात विशेष ज्ञान मिळवून इतरांनाही वाटू शकला.
शिक्षकांनी विविध शिक्षणशैलींना सामावून घेत, धैर्य आणि आधुनिक युगातील नवनवीन विषय शिकण्याचे शहाणपण, यांसारख्या उदात्त गुणांना मूर्त रूप देताना, पुराव्यावर आधारित पद्धतींसह विद्यार्थ्यांच्या आजीवन शिकण्याच्या संशोधनात्मक, सर्जनशील स्वातंत्र्याचे संतुलन राखावे. आत्महत्यांचे प्रमाण वाढलेल्या भारतात शिक्षण कलाच विद्यार्थ्यांचा योग्य भावनिक आणि सामाजिक विकास करून, गंभीर विचारसरणी आणि समस्या सोडवण्यास सक्षम असलेला सुसंस्कृत समाज निर्माण करू शकते.
सध्या गोव्यात, शिक्षण कलेला महत्त्वपूर्ण आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मायबोलीतील माध्यमातील प्राथमिक शिक्षणाने मुलांचा सर्वांगीण विकास होतो हा जगन्मान्य सिद्धांतच तथाकथित शिक्षण तज्ज्ञांनी आणि राजकारण्यांनी स्वार्थासाठी दडपून टाकला. या लोकांनी ‘गोंयकारांनी’ आठवड्याच्या प्रत्येक दिवसासाठी सकाळच्या न्याहारीसाठी केलेल्या ‘खाप्रोळी’, ‘भाकरी’, ‘गवान’, ‘पोळे’, ‘कायलोळी’, ‘चपाती’ ‘पुरणपोळी’, या सात पदार्थांची नावे इंग्रजीतून सांगावीत. सरकारी कृपा असलेल्या संस्थांनी जागोजागी वारेमाप शाळा-कॉलेज उघडल्या.
पण नामांकित संस्थेत शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फुगत असताना, ग्रामीण शैक्षणिक संस्था टिकून राहण्यासाठी शिक्षकांद्वारे बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशमधील कामगारांची मुले आमिष दाखवून मिळवतात. शिक्षणाचा मूळ हेतूच बिघडून गेला आहे. काहीही करून परीक्षा पास होऊन सर्टिफिकेट मिळाले की बस! शहराकडे जाणारा ग्रामीण विद्यार्थ्यांचा लोंढा थोपविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शहरी आणि ग्रामीण शिक्षकांना लॉटरी पद्धतीने एका-एका आठवड्यासाठी विविध शाळांत पाठवणे.
अभ्यास आणि पगार समान असल्यामुळे कुणालाच त्रास होणार नाही. उलट ग्रामीण भागातील शाळा-कॉलेजात शहरी शिक्षकांच्या शिकवणीची संधी प्राप्त होऊन शहराकडे जाणारा ग्रामीण विद्यार्थ्यांचा ओढा कमी होईल. गएए आणि छएएढ सारख्या उच्चस्तरीय परीक्षांचे वर्चस्व वाढल्यामुळे गुणवत्तेपेक्षा नफ्याला प्राधान्य देणाऱ्या कोचिंग सेंटर्सचे प्रमाण गोव्यात भलतेच वाढून विद्यार्थ्यांना जीवन आनंदमय करण्याचे सर्वांगीण शिक्षण देण्याऐवजी विशिष्ट काम करण्याचे ‘रोबोट’ बनवले जात आहेत.
सरकारने शिक्षणावर अफाट खर्च करूनही कोचिंग घ्यावे लागते हे पाहिल्यास सरकार ‘येणाऱ्या काळात’ सरकारी कामांची कंत्राटे, सरकारी नोकर कंत्राटे, आदींप्रमाणे ‘गोंयकारांच्या’ शिक्षणाचे कंत्राट नफेखोर कोचिंग सेंटर्सना देईल की काय, अशी भीती वाटते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.