

पणजी: २०१७ मध्ये कोयत्याने झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात नावेली येथील यशवंत गावस याच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश डिचोली येथील प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी अनुषा कायसूवकर यांच्या न्यायालयाने दिले आहेत. तसेच, संशयिताच्या मानसिक अस्वस्थतेचा दावा या टप्प्यावर न्यायालयाने फेटाळून लावला.
ही घटना ६ मार्च २०१७ रोजी घडली होती. यशवंत गावस याने अचानक रघुवीर गावस या व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करून त्याला गंभीर दुखापत केल्याचा आरोप आहे. दरम्यान, मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या युसूफ बड्डिगर याला संशयिताने चावून दुखापत केल्याची नोंददेखील पोलिसांनी केली होती.
या प्रकरणात पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल केला होता. युक्तिवादादरम्यान बचाव पक्षाने संशयित मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचा मुद्दा मांडला. त्यांनी गोवा राज्य मानसिक आरोग्य पुनरवलोकन मंडळाचे प्रमाणपत्र सादर करून संशयिताला मुक्त करण्याची मागणी केली.
मात्र, न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, उपलब्ध कागदपत्रांवरून संशयिताला पूर्वी मानसिक आजाराचा इतिहास असून तो उपचार घेत होता हे दिसते; परंतु ही बाब प्रकरणाच्या प्राथमिक टप्प्यावर आहे. घटनेच्या वेळी संशयित वेडसर होता हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्याच्यावरच आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने विशेष उल्लेख केला की गोवा राज्य मानसिक आरोग्य पुनरावलोकन मंडळाने मार्च २०२४ मधील अहवालात संशयित आपले बचाव मांडण्यास सक्षम असल्याचे नमूद केले आहे. म्हणूनच न्यायालयाने नमूद केले की या प्रकरणात आरोप सिद्ध करण्यासाठी प्राथमिकदृष्ट्या पुरेसे कारण आहे आणि त्यानुसार आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.