अन्सोळे-भिरोंडा येथे सोमवारी (08 एप्रिल) रात्री 8.30 च्या सुमारास झालेल्या स्फोटाचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांचे (NSG) पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पथकाकडून घटनास्थळ व आजुबाजुच्या परिसराची पाहणी केली जात आहे.
राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या वतीने या स्फोटाची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. सोमवारी रात्री झालेल्या या स्फोटामुळे आसपासचा परिसर हादरला, तसेच अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी वाळपई पोलिसांनी नासीर हुसेन जमादार (वय 53 वर्षे, रा. नुहा कॉलनी, नागवे) याला अटक केली. नाझीर हुसेन जमादार यांच्या खाजगी मालमत्तेत हा स्फोट झाला होता. जमादार सध्या 5 दिवसांच्या पोलिस रिमांडमध्ये आहे.
स्फोटामुळे सुमारे 16 घरांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. मात्र, एकूण किती नुकसान झाले, याची माहिती मिळू शकली नाही. तसेच, एक किलोमीटरवरील घरांच्या भिंती, तावदाने, छप्परे, खिडक्या, दरवाजे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी सत्तरी तालुक्याला हादरा बसल्याने परिसरातील लोक भयभीत झाले आहेत.
अन्सोळेतील स्फोटाचा आवाज कुळे, शिगाव व दाभाळ परिसरात देखील जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
वाळपई ते शिगाव हे अंतर 40 कि.मी. आहे. दाभाळही 40 ते 50 कि.मी. अंतरावर आहे. तरीही एवढा मोठा आवाज आणि जमीन हादरणे म्हणजे हा मोठ्या बॉंबस्फोटासारखा प्रकार असावा, अशी चर्चा स्थानिकांमध्ये रंगली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.