National Games 2023: महाराष्ट्राच्या दिपाली गुरसाले हिने ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राला विक्रमी कामगिरीसह सुवर्णपदक जिंकून दिले. तिने महिलांच्या ४५ किलो वजनगटात अव्वल कामगिरी नोंदवताना एकूण १६५ किलो वजन उचलले.
वेटलिफ्टिंग स्पर्धेला बुधवारपासून कांपाल येथील क्रीडानगरीत सुरवात झाली. पश्चिम बंगालच्या चंद्रिका तडफदार हिने १६२ किलो वजन उचवून रौप्य, तर तेलंगणाच्या टी. प्रियदर्शिनी हिने १६१ किलोसह ब्राँझपदक पटकावले.
सांगली जिल्ह्यातील दिपाली हिने स्नॅचमध्ये ७५ किलो वजन उचलून नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. रौप्यपदक विजेत्या चंद्रिकानेही राष्ट्रीय विक्रम नोंदविताना क्लीन अँड जर्कमध्ये ९५ किलो वजन उचलले.
पुरुषांच्या ५५ किलो वजन गटात सेनादलाच्या प्रशांत कोली याने राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक प्राप्त केले. त्याने एकूण २५३ किलो वजन उचलले. त्यापैकी स्नॅचमध्ये ११५ किलो वजन उचलून त्याने विक्रमाला गवसणी घातली. महाराष्ट्राच्या मुकुंद अहेर याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने २४९ किलो वजन उचलले. आंध्र प्रदेशचा एस. गुरू नायडू (२३० किलो) ब्राँझपदकाचा मानकरी ठरला.
महिलांच्या ४९ किलो वजनगटात छत्तीसगडच्या ज्ञानेश्वरी यादव हिने सुवर्णपदक जिंकताना एकूण १७७ किलो वजन उचलले. हरियानाच्या प्रीती हिने १७४ किलोंसह रौप्य, तर ओडिशाच्या झिल्ली दालाबेहेरा हिने १६७ किलोंसह ब्राँझपदक प्राप्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.