पणजी: गोव्यात पुन्हा एकदा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय आणि यामुळे राज्यातील नरकासुराचं दहन होईल की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता, मात्र गोव्यातली दिवाळी ही नरकासुराशिवाय अपूर्ण असल्याने राज्यातील युवकांनी यावर एक वेगळाच मार्ग शोधून काढलाय. यंदा राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे नरकासुरांना वॉटर प्रूफ रंग देण्यात आलाय आणि म्हणूनच नरकासुर दहनावर पावसाचा काहीही परिणाम होणार नाही.
राज्यात विविध भागांमध्ये सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर) रोजी मुसळधार पाऊस होता आणि यामुळे अनेक दिवस मेहनत घेऊन बनवलेले नरकासुर वाचवण्यासाठी तरुणांची बरीच धावपळ झाली. यानंतर यंदाच्या वर्षी नरकासुर दहन होणार नाही का? अशी भीती निर्माण झाली होती मात्र तरुणांनी हार न मानता काल (मंगळवार, दि. २९ ऑक्टोबर) रोजी पुन्हा नरकासुराला आकार देण्यास सुरुवात केली.
आत्तापर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये नरकासुराचे रंगकाम आणि इतर सर्व कामे पूर्ण झाली आहेत. साधारण गणपती विसर्जनानंतर राज्यात नरकासुर बनवायला सुरुवात होते. यंदा मात्र पाऊस काही मागे फिरण्याचं नाव घेत नसल्याने नरकासुर दहन ठप्प होऊ नये म्हणून स्थानिकांनी वॉटर प्रूफ रंगांची मदत घेतल्याची माहिती प्रिन्स ऑफ मळाचे प्रमुख सर्वेश शेट्टी यांनी गोव्यातील एका वर्तमानपत्राला दिली. "यंदाच्या वर्षी पावसाने काहीसा त्रास दिला मात्र आम्ही पुन्हा कमला लागलो" असं ते म्हणालेत.
काही स्थानिक लोकांच्या मते गोव्यात तयार होणाऱ्या नरकासुरवर अनेक रुपये खर्च केले जातात,एक मोठा नरकासुर बनवण्यासाठी किमान दीड लाख रुपयांचा खर्च होतो. मुलं यामधून त्यांची कला सादर करतात मात्र त्यांना याचा काहीच मोबदला मिळत नसल्याने सरकारने याबद्दल नक्कीच विचार केला पाहिजे.
यंदाच्या वर्षी नरकासुराच्या मिरवणुकीत तसेच दहनाच्यावेळी संगीताचे आवाज मर्यादेत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत आणि यावर पोलिसांची देखील कडक नजर असेल अशी माहिती समोर आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.