पणजी: सर्वांत युवा सरपंच म्हणून बहुमान मिळवणारे नगरगाव-सत्तरी पंचायतीचे माजी सरपंच पराग खाडिलकर यांच्या सन 2017 ते 2018 या कार्यकाळात मोबाईल टॉवर करारविषयक आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात स्थानिक ग्रामस्थ अर्जुन गुरव यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
(Nagargaon, Sattari tower rental scam)
गुरव यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, माहिती अधिकारातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार पंचायत नोंदीप्रमाणे नगरगाव पंचायत कार्यक्षेत्रात सात टॉवर आहेत. त्यात भारत संचार निगमचे टॉवर, इंडस टॉवर, रिलायन्स, जिओ, इफॉकॉम लिमिटेडचा समावेश आहे. परंतु, पंचायतीने टॉवर मालक आणि ज्या जमीन मालकांच्या जागेत हे टॉवर आहेत त्यांच्याकडून कोणतेही भाडे अथवा कर घेतलेला नाही.
तत्कालीन सरपंच पराग आणि उपसरपंच समीक्षा सालेलकर यांनी पंचायतीच्यावतीने काही ग्रामस्थांशी मोबाईल टॉवरविषयी करार केला असून त्याद्वारे हजारो रुपयांचे वार्षिक भाडे घेण्यात आले. परंतु माहिती अधिकारातून असे कोणतेच भाडे अथवा कर घेतला नाही, असे समोर आले आहे.
त्यामुळे पंचायतीचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला असा दावा करत भ्रष्टाचाराची शक्यता तक्रारीत वर्तविण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी गुरव यांनी केली आहे. दरम्यान, आरोपाच्या अनुषंगाने माजी सरपंच पराग खाडिलकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.