काणकोण: तामणे-लोलये येथील मायलेकीच्या मृत्यूचे कोडे अजूनही पोलिसांना उलगडलेले नाही. गीता आनंद पागी हिचा मृत्यू गळफास घेऊन झाल्याचे शवचिकित्सा अहवालात स्पष्ट झाले आहे. मात्र तिची सावत्र विवाहित मुलगी अंकिता प्रकाश पोळजी हिने आत्महत्या का केली, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. तिच्या मृतदेहाची चिकित्सा उद्या बुधवारी मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात करण्यात येणार आहे, अशी माहिती या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या महिला पोलिस उपनिरीक्षक रिफा बार्रेटो व उपनिरीक्षक रामचंद्र नाईक यांनी दिली. काणकोणचे पोलिस निरीक्षक प्रवीण गावस यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
या कुंटुंबाला घराशेजारी शौचालय नसल्याने नैसर्गिक विधीसाठी जवळच्या पाणवठ्याचा आधार घ्यावा लागत होता. अंकिताचा मृतदेह ज्या तळीजवळ सापडला, तेथे रिकामा प्लास्टिकचा तांब्याही सापडला आहे. त्यामुळे ती नैसर्गिक विधीसाठी तळ्यावर गेली असावी अशी चर्चा सुरू आहे. मात्र आई तेथे का गेली व नंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचे कारण काय, हे प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत. दरम्यान, यापूर्वी तामणे येथील एक महिला गालजीबाग नदीवर नैसर्गिक विधीसाठी गेली असता बुडून मरण पावली होती.
दुसरी गोष्ट म्हणजे आनंद पागी यांना अर्धांगवायूचा झटका आल्यापासून पत्नी गीता पागी हिची मानसिक स्थिती ठीक नव्हती. ती सैरभैर झाली होती. यातूनच काही दिवसांपूर्वी आजारी पडल्यामुळे तिला बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना तिने मोडतोड करण्याचा तसेच आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता, असे समजते.
संपत्तीवरून सावत्र आई व मुलांमध्ये होता वाद?
गीता पागी हिचा नवरा आनंद पागी हे सार्वजनिक बांधकाम खात्यात सुपरवायझर म्हणून काम करत होते. दोन वर्षांपूर्वीच ते निवृत्त झाले होते. पहिल्या पत्नीचा दीर्घआजाराने मृत्यू झाल्यानंतर त्यांनी कारवार येथील गीता या महिलेशी लग्न केले. पहिल्या बायकोला कन्या अंकिता व पुत्र अक्षय अशी दोन मुले आहेत. अंकिताचा विवाह तीन वर्षांपूर्वी एका सधन कुटुंबात झाला होता. आनंद पागी यांनी आपल्या निवृत्तीवेळी मिळालेली पुंजी मुलगा व मुलीच्या नावावर केली होती. कदाचित हेच शल्य त्यांच्या दुसऱ्या पत्नीला म्हणजे गीता हिला सतावत होते. या मुद्यावरून पती, मुले व त्यांची सावत्र आई यांच्यात वारंवार खटके उडायचे. त्यातूनच हा प्रकार घडला असावा अशीही चर्चा सुरू आहे.
रविवारी दुपारी जेवणावळ अन् संध्याकाळी रडारड
ज्या दिवशी दुर्घटना घडली, त्या दिवशी म्हणजे गेल्या रविवारी (१३ मार्च) पागी कुटुंब मजेत होते. त्यांच्या घरी दुपारी शिमगा मेळाला जेवणावळ होती. आई गीता व मुलगी अंकिता घरी आलेल्यांना जेवूखाऊ घालत होती. त्यांच्यात कोणताही तणाव नव्हता असे त्यांच्या घरी जेवणावळीला गेलेल्या काही लोकांनी सांगितले. मात्र त्याच दिवशी संध्याकाळी सातच्या सुमारास अंकिता व तिची आई घरात नसल्याने शोधाशोध सुरू झाली असता अंकिताचा मृतदेह जवळच असलेल्या तळ्यात तर तेथून जवळच आई गीता हिचा मृतदेह एका झुडपाला लटकलेल्या अवस्थेत संशयास्पदरित्या सापडला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.