Karnataka Assembly Election 2023: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप भाजप नेते मणिकांत राठोड यांच्यावर करण्यात आहे.
याप्रकरणी गोवा प्रदेश काँग्रेसच्या वतीने आज कर्नाटकचे भाजप उमेदवार मणिकांत राठोड यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मणिकांत राठोड यांच्याविरोधात योग्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि त्यांच्या शिष्टमंडळाने आज पणजी पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल केला.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा कट रचला जात असून, याबाबत देशाचे पंतप्रधान आणि प्रमुख भाजप नेत्यांनी मौन बाळगले आहे.
समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपचे उमेदवार मणिकांत राठोड हत्येच्या कटाबाबत बोलत असल्याचे स्पष्ट ऐकू येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दखल घेऊन मणिकांत राठोड यांच्याविरोधात योग्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसने अर्जाद्वारे केली आहे.
दरम्यान, भाजपच्या वतीने हे आरोप फेटाळण्यात आले असून, आरोप साफ खोटे असल्याचे म्हटले आहे. तसेच, मणिकांत राठोड यांनी सोशल मीडियावर फिरत असलेली ऑडिओ क्लिप बनावट असून, निवडणूक हरण्याची भीती असल्याने हे आरोप केले जात आहेत. असे त्यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
भाजप मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा कट रचत असल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारी (6 मे) केला. याप्रकरणी काँग्रेसकडून एक ऑडिओ क्लिपही शेअर करण्यात आली होती.
या क्लिपमध्ये राठोड हे खर्गे यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरत, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्याबाबत बोलत आहेत. असा आरोप काँग्रेसने केला आहे.
मणिकांत राठोडच्या नावावर 40 गुन्हे
मणिकांत राठोड यांची पार्श्वभूमीही मोठी धक्कादायक आहे. राठोड यांच्यावर विविध 40 गुन्हे दाखल आहेत. चित्तापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी राठोड यांना कलबुर्गी येथून वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले होते.
मणिकांत राठोडवर खून, ड्रग्ज आणि अंमली पदार्थांची तस्करी, धमकावणे, अवैध शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. राठोडला एक वर्ष तुरुंगवासही भोगावा लागला. लोकांना मिळणाऱ्या फुकट तांदळाच्या घोटाळ्यातही त्यांचे नाव आले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.