Goa Politics: खरी कुजबुज; ते पोर्तुगीजकालीन अतृप्त आत्मे

Khari Kujbuj: महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर झाले. त्यात एक- दोन उमेदवार सोडले तर भाजप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना स्थान मिळणार का?
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

ते पोर्तुगीजकालीन अतृप्त आत्मे !

पोर्तुगीज गुलामगिरीमुळे स्वभावात व जीन्समध्ये गुलामगिरीचे थेंब राहिल्यामुळे आजही आपल्या गोव्यात अनेक पोर्तुगीज समर्थक जिवंत आहेत . पोर्तुगीज सत्तेच्या काळांत ज्यांचे पूर्वज पोर्तुगीजांचे किर्याद (नोकर) व मानाय ( कामगार) होते त्यांची पिलावळ आजही पोर्तुगीजांचे गुणगान करताना थकत नाहीत.ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक दाद उर्फ रघुनाथ देसाई यांनी ‘व्हिवा पोर्तुगीज’ म्हणणे हा स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान असल्याचे विधान केले होते, त्याच्यावरून काही पोर्तुगीज धार्जिणे ‘नेटिझन्स’ दाद देसाई यांना ट्रोल करताना हिंदूचांही अपमान करतात. या अशा अराष्ट्रीय प्रवृत्तीच्या लोकांना दाद देसाई यांनी योग्य संदेश दिला असून पोलिसांनीही अशा शक्तींचा वेळीच बीमोड करण्याची गरज आहे.गोव्यात राहून ‘व्हिवा पोर्तुगाल’ म्हणणारे हे लोक एका खास समुदायाचे आहेत हे विशेष! ∙∙∙

आरक्षणात ‘भाजप’ कुठे ?

महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर झाले. त्यात एक- दोन उमेदवार सोडले तर भाजप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना स्थान मिळणार का? त्यांच्यासाठी किंवा त्या जागी भाजपचाच उमेदवार दिला जाणार काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. उपमहापौर संजीव नाईक यांचा प्रभाग आरक्षित झाल्याने ते शेजारच्या प्रभागातून उमेदवारी मागणार का, की बंडखोरी करणार, हे आत्ताच सांगता येणार नाही. उमेदवार निश्‍चितीवेळी भाजपच्याच कार्यकर्त्यांना सत्ताधारी गटाकडून उमेदवारी मिळणार का? असे प्रश्न सध्या भाजपवाल्यांना सतावू लागले आहेत. ∙∙∙

धुंद सत्ताधारी अन् सुस्त विरोधक !

‘आई जेवायला वाढत नाही, आणि बाप भीक मागायला देत नाही’ अशी आपल्या राज्यातील आम जनतेची स्थिती झाली आहे. चाळीस पैकी ३३ आमदारांचे बळ असलेल्या सत्ताधारी भाजपकडे ‘ब्रुथ मॅजोरिटी’ असल्यामुळे धुंद सत्ताधारी सरकारकडे आम जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ नाही. जनता रस्त्यावर उतरली तरी सत्ताधाऱ्यांचा माज सरत नाही.दुसऱ्या बाजूने आम जनता रस्त्यावर उतरली आहे, त्या संधीचे सोने करण्याची धमक विरोधकांत नाही. सशक्त सरकार व अशक्त विरोधक यांच्यात आम जनता मात्र नाहक पिचत आहे. जनता रस्त्यावर उतरली तरी विरोधक आक्रमक होत नाहीत, आणि सरकार जनकल्याण सोडून स्व कल्याणात व्यग्र आहे, हीच खरी शोकांतिका! ∙∙∙

पुन्हा एकदा कोळसा!

वास्कोत सध्या कोळसा विषय चर्चेचा झाला आहे. कोळशामुळे प्रदूषण होते की नाही याविषयी चर्चा वर्षानुवर्षे सुरु आहे. विधानसभा निवडणूक जवळ आल्यावर हा विषय तापणार हे ठरून गेलेले आहे. आता माजी मंत्री मिलींद नाईक यांनी मंगळवारी कोळसा प्रदूषणाविरोधात दंड थोपटले आहेत. त्यांनी चिंबलवासियांच्या एकजुटीचे उदाहरण तेथे दिले आहे. यामुळे वास्कोतील राजकारण आता कोळसा या विषयाभोवती गरागरा फिरणार हे स्पष्ट झाले आहे. या कोळशाची भुकटी मात्र कोणाच्या नाका तोंडात जाईल त्याची वेगळीच चर्चा वास्को परिसरात ऐकू येऊ लागली आहे. ∙∙∙

रस्ते की प्रचाराचे रेड कार्पेट?

निवडणूक जवळ आली, की चमत्कार घडतात असे म्हणतात. यंदा तर ते उघड्या डोळ्यांनी दिसू लागलेत! चार वर्षे जे रस्ते खड्डेमय होते, ज्यावरून चालताना लोकांना ‘ऑफ-रोड’चा अनुभव मिळायचा, तेच रस्ते आता अचानक चकाचक झालेत. लोक म्हणतात, ‘हे रस्ते नव्हेत, हे तर प्रचाराचे रेड कार्पेट!’ स्थानिक आमदारांनाही आता अचानक लोक दिसू लागलेत. कालपर्यंत ‘फाईल’मध्ये असलेले प्रश्‍न आज थेट रस्त्यावर आलेत. उद्‍घाटनाचं श्रीफळही जागेवरच फुटतंय, नावाची पाटी आधी, काम नंतर...पण फोटो मात्र पक्का! मात्र मतदारसंघांतली चर्चा काही वेगळीच आहे ‘हे आमचं भलं करण्यासाठी आहे की, आम्हाला पुन्हा निवडून द्या, म्हणून सांगण्यासाठीचं नाटक?’ ‘चार वर्षे आम्ही सहन केलं, आता आठवण कशी काय आली?’ लोक शेवटी एवढंच म्हणतायत ‘आम्हाला मूर्ख बनवू नका. आधी झालो असू, पण यापुढे नाही!’ आता या सगळ्याचा निकाल काय लागणार, चकाचक रस्ते मतांत बदल घडवणार की, आठवणी मतपेटीत बोलणार? याची उत्सुकता मात्र सध्या सगळीकडेच दिसते. ∙∙∙

सिद्धेश खुश झाला!

यशस्वी होण्यासाठी साम, दाम, दंड ,भेद नीतीचा वापर करावाच लागतो, हे परमसत्य आपण विसरता कामा नये. सिद्धेश भगत हे तसे धडपडी व्यक्तिमत्व. मूळ काणकोणकर नावेली मतदार संघातील आके भागात राहून स्वतःची वेगळी छबी समाजात निर्माण करून सरपंचपद भूषविले.आम आदमी पक्षात उच्च पदावर पोहचले. तसे सामाजिक कामात हिरिरीने भाग घेतात. त्यांना ‘सोशल मीडिया टायगर’ म्हणून ‘ट्रोल’ही केले जाते.सिद्धेशाने आम आदमी पक्ष सोडल्याचे वाचून काँग्रेसचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी सिद्धेशचे तोंड भरून कौतुक केले. कॅप्टन विरियातो यांनी सिद्धेशची विविध विशेषणांनी व अलंकारांनी प्रशंसाही केली. याचा अर्थ आता सिद्धेश भगत येणाऱ्या काळात विरियातो यांचा हात धरून काँग्रेसची कास धरणार हे पक्के. आता काँग्रेसलाही कार्यकर्त्यांची गरज आहे आणि सिद्धेशला योग्य पक्षाचे ‘टॅग’ हवे म्हटल्यावर हा संगम जुळणार हे निश्चित. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: खरी कुजबुज; दामूंचे शक्‍तिप्रदर्शन?

मडकईकरांची तयारी!

उदय मडकईकर यांचा प्रभाग १४ हा आता राखीव झाला आहे, त्यामुळे त्यांना अन्य प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे. परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बाबूश मोन्सेरात यांनी त्यांना उमेदवारी दिली तर. उमेदवारी मिळालीच तर त्यांना प्रभाग १३ शिवाय पर्याय राहणार नाही. कारण १५ क्रमांकाचा प्रभागही ओबीसी राखीव झाला आहे. त्यामुळेच तर सटी मंदिर लगतचा परिसर असलेल्या १३ क्रमांकाच्या प्रभागातून ते उभे राहू शकतात. सध्या ते मुलाच्या विवाह आणि स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात सध्या व्यग्र आहेत. आरक्षण जाहीर झाले असले तरी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्व इच्छुकांचे पत्ते खुले होतील. मडकईकर यांना प्रभाग १३ मध्ये उमेदवारी दिली तर ते १४ मधील त्यांच्या गटाचा उमेदवार निवडून आणण्यास मदत करू शकतात. येथे मडकईकरांची मैत्री उपयोगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: खरी कुजबुज; मुख्‍यमंत्र्यांचा स्‍ट्रायकर

१४ दिवस अपुरे

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला पुढील महिन्यात ६ मार्च रोजी सुरवात होणार आहे. १४ कामकाजाचे दिवस या अधिवेशनाला लाभणार आहेत. आता ते अपुरे असल्याचा सूर विरोधी आमदारांनी लावला आहे. सरकार आठवडाभराचे अधिवेशन घेत सहा महिन्यांचे लेखानुदान गेले १० वर्ष घेत आले आहे. अर्थसंकल्प विस्मृतीत गेल्यावर पावसाळी अधिवेशनात त्यावर चर्चा घडवून आणली जात असे.निदान या खेपेला अर्थसंकल्प सादर केल्यावर त्याच्या स्मृती ताज्या असतानाच चर्चा घडवून आणण्याचा पायंडा सरकार पाडत आहे. तरीही १४ दिवस विरोधकांना अपुरे वाटत आहेत. आता टीव्हीवर अधिवेशन कामकाज दिसत असल्याने कोण शेवटपर्यंत कामकाजात सहभागी होत असतात हे जनतेला दिसणारच आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com