Goa Politics: खरी कुजबुज; दामूंचे शक्तिप्रदर्शन?
दामूंचे शक्तिप्रदर्शन?
भाजपाचे प्रदेेशाध्यक्ष दामू नाईक यांनी हाऊसिंग बोर्ड येथील आपल्या घराशेजारी नवीन घर बांधले असून शुक्रवारी या वास्तूचा गृहप्रवेश सोहळा झाला. या गृहप्रवेशानिमित्त सतत दोन दिवस त्यांच्या घरी लोकांची ये-जा चालू होती. शुक्रवारी दामू नाईक यांचे अभिनंदन करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. नंतर दुसर्या दिवशी आमदार आणि मंत्र्यांना त्यांनी निमंत्रण दिले होते. दामू नाईक यांचे हे घर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या गृहप्रवेशाच्या निमित्ताने दामू नाईक यांनी आपले शक्तिप्रदर्शन घडवू्न आणले, असेही आता बोलले जात आहे. ∙∙∙
आताच का आठवण ?
पणजी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी उत्पल पर्रीकर यांच्यासमोर विचारसंकट उभे केले आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सुरवातीला पाठिंब्याचा विषय काढला. त्यानंतर पणजी वाचवण्यासाठी जो कोणी पाठिंबा देईल तो स्वीकारू, असे सांगत उत्पल यांनी विषय पुढे नेला. त्यानंतर आता विचारसरणीची ही लढाई सांगत पाटकर यांनी उत्पल हे भाजप विचारसरणी त्यागणार का, अशी विचारणा केली आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी आघाडी करण्यास लागलेला विलंब आणि आता विचारसरणीची आलेली आठवण याची सांगड घालत पाटकर यांना आताच याची आठवण का यावी, असा प्रश्न चर्चेत आला आहे. उत्पल आणि राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या बैठकीनंतर विषय पुढे सरकला तर पाटकर यांचा सवाल विरेल की ते त्यावर अडून बसतील याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष असल्याची चर्चा आहे.∙∙∙
फोंड्यात काँग्रेसची तयारी जोरदार
फोंडा मतदारसंघात होणाऱ्या पोट-निवडणुकीसाठी कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. सोमवारी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा, गटाध्यक्ष व्हिलीयम आगियार, सरचिटणीस मनीषा उसगांवकर व राजेश वेरेकर तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी फोंड्यात बैठक घेऊन रणनीतीवर चर्चा केली. बैठकीला कार्यकर्त्यांची उपस्थितीही चांगली होती. दिल्लीत ‘हायकंमाड’बरोबर बैठक झाल्यानंतर अमितराव चांगलेच सक्रिय झाले आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून ‘भिऊ नकोस आम्ही तुझ्या पाठिशी आहोत’ हा जणू असाच कानमंत्र त्यांनी दिल्यासारखे पाटकरांनी म्हणे २०२७ मध्ये २७ आमदार निवडून आणण्याचे ध्येय समोर ठेवले आहे आणि सुरूवात २०२६ मध्ये फोंड्यातून करण्याचे ठरविले आहे. सध्या तरी काँग्रेसपुढे पहिल्या यादीत वेरेकरच उमेदवार असल्याचे दिसते. ∙∙∙
नो ‘नॉन गोवन्स’ इन खोला पंचायत क्षेत्र!
भारत हा प्रजासत्ताक देश असून या देशातील घटनेने येथील नागरिकांना कुठल्याही राज्यांत आणि प्रांतात व्यापार ,व्यवसाय व नोकरी करण्याचा अधिकार दिला आहे हे आपले काही सरकारी अधिकारी व स्थानिक राजकारणी ही विसरतात हे या देशाचे व राज्याचे दुर्दैव.खोला पंचायतीच्या ग्रामसभेने एक विचित्र ठराव मंजूर केला आहे.खोला पंचायत क्षेत्रात बिगर गोमंतकीयाना व्यापार परवाना न देण्याचा ठराव ग्रामसभेने मंजूर केला आहे आणि पंचायत मंडळाने याला मान्यता ही दिली असल्याचे कळते. मात्र, असा ठराव ग्रामसभा घेऊ शकते का? पंचायत सचिवांनी कदाचित या बाबत ग्रामसभेला योग्य माहिती दिली नसावी. अशाच प्रकारे मुस्लिमांना घर बांधणीचा परवाना न देण्याचा ठराव बाळ्ळी पंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला होता, त्याचे परिणाम त्या पंचायत सचिवाला भोगावे लागले होते. कायदा सगळ्यांना समान असतो, याची जाणीव आपल्या लोकप्रतिनिधींना असायला नको का? ∙∙∙
दामूंची मास्तरकी
केंद्रीय अर्थसंकल्पावर विरोधक टीका करणार हे ठरूनच गेलेले असते. त्यात काहीच नाही, हे ठराविक साच्याचे वाक्य वर्षानुवर्षे ऐकू येते. तेच वाक्य कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी वापरत यात गोव्यासाठी काही नाही, असे नमूद केले. झाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी ते फार गांभीर्याने घेतले. त्यांनी अर्थसंकल्प म्हणजे काय तो, आधी समजून घ्या,असा सल्ला पाटकर यांना दिला. अर्थसंकल्पातील विविध तरतुदींचा फायदा राज्याला होत असतो याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पाटकर यांनी अद्याप विधानसभेत पाय ठेवायचा आहे, दामू यांनी तो अनुभव घेतला आहे. त्यामुळे त्या नात्याने त्यांनी केलेली ही मास्तरकी चर्चेची ठरली आहे. ∙∙∙
मिराबागकरही जागृत
सध्या गाेव्यात ‘इनफ इज इनफ’ हे आंदोलन चालू असताना आणि त्या आंदोलनाला आता राष्ट्रीय स्तरावरील न्यायाधीशांनीही पाठिंबा दिल्याने गोव्यात एक वेगळेच वातावरण तयार झालेले आहे. दुसर्या बाजूने उत्तर गोव्यात चिंबलचे आंदोलन तापत आहे. या पार्श्वभूमीवर आता मिराबाग-सावर्डे येथे बंधाऱ्याला विरोध करण्यासाठी लोक एकत्रित झाले आहेत. त्यामुळे आता सावर्डेतही वातावरण तापणार हे निश्चित झाले आहे. ही आंदोलने सध्या सत्तेवर असलेले भाजप सरकार कशातऱ्हेने हाताळणार, हा प्रश्न सध्या विचारला जात आहे. ∙∙∙
सरकारी जमीन लाटण्याचा प्रयत्न!
फोंड्यातील अग्निशामक दलाच्या जमिनीत चक्क पेट्रोलपंप थाटण्याचे घाटत असून त्यासंबंधीची सूचनाही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आहे. तसे पाहिले तर हा सरकारी जमीन लाटण्याचा प्रकार असून कुणाच्या लक्षात हा प्रकार सुरवातीला आला नाही, मात्र फोंड्यातील तीन आरटीआय कार्यकर्त्यांनी या प्रकाराला वाचा फोडली आणि आता फोंडेकर जागे झाले आहेत. सरकारी यंत्रणा आपल्याला हवी तशी वागते आणि सरकारी जमिनीचा कसा गैरवापर केला जातो, त्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे या आरटीआय कार्यकर्त्यांनी सांगितले. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

