Kala Academy Goa: चार वर्षांपूर्वी गाजावाजा करून सुरू झालेल्या आणि ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनू’ अशी टिमकी वाजवणाऱ्या कला अकादमीच्या ‘कॉलेज ऑफ थिएटर आर्ट’वर आपली पहिलीच पद भरती कोर्टात मागे घेण्याची नामुष्की का ओढवली, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
28 नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा न्यायालयासमोर नारायण खराडे यांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात खटला सुरू असताना राज्याच्या अॅडव्होकेट जनरलनी, या कॉलेजमध्ये साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम पाहणाऱ्या गंगाराम (सतीश) नार्वेकर यांची नेमणूक सरकार तत्काळ मागे घेत असल्याचे न्यायालयाला कळवले.
गंगाराम नार्वेकर यांची नेमणूक सारे नियम डावलून झाली आहे, असा याचिकादाराचा दावा होता. त्यांना नेमणाऱ्या सरकारनेच ही नेमणूक मागे घेतल्याने असा प्रश्न मात्र निर्माण झाला आहे की, सरकारनेच नेमणूक केल्यानंतर 15 महिन्यांनी आणि याचिका दाखल झाल्यावर 11 महिन्यांनी नार्वेकर यांची ‘कॉलेज ऑफ थिएटर आर्ट’मध्ये साहाय्यक प्राध्यापकपदी झालेली निवड खरीच अवैध होती, हे त्याच सरकारच्या लक्षात कसे बरे आले असेल?
स्वतः गोवा सरकारनेच त्यांना या पदावरून तत्काळ मुक्त करत आहोत, हे मान्य करून स्वतःची (निदान या खटल्यामधून) कशीबशी सुटका करून घेतली आहे. पण या खटल्यामधून जे प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यांचा दूरगामी परिणाम घडून ‘कॉलेज ऑफ थिएटर आर्ट’मध्ये याच धर्तीवर ज्या इतर अनेक नेमणुका झाल्या आहेत, त्याबद्दलही निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नार्वेकर यांच्याकडे त्या पदासाठी आवश्यक असलेली पात्रता नाही, हे याचिकादार नारायण खराडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यायचा प्रयत्न केला. त्याशिवाय या पदासाठी मुलाखत घेतेवेळीही बराच घोळ झाला होता, ही बाब देखील त्यांनी न्यायालयासमोर मांडली. ‘या साऱ्याचा सर्वसाधारणपणे विचार करून ही नेमणूक मागे घ्यावी, असा सल्ला मी सरकारला दिला’, अशी प्रतिक्रिया अॅडव्होकेट जनरलांनी यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.
शिवाजी विद्यापीठाच्या पदवीवर प्रश्नचिन्ह
उच्च न्यायालयाच्या भारत देशपांडे आणि एम. एस. सोनक या संयुक्त न्यायासनासमोर कला अकादमीच्या ‘कॉलेज ऑफ थिएटर आर्ट’ने जरी या खटल्यातून माघार घेऊन तात्पुरती मलमपट्टी केली असली तरी शिवाजी विद्यापीठाची हीच पदवी, अशाच अवैध प्रकारे मिळवून या कॉलेजमध्ये तसेच इतर ठिकाणी नोकरी मिळवलेल्यांसमोरही आता अडचणी निर्माण झाल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.