

मुंबई: कोकण रेल्वेमार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पर्यटकांच्या पसंतीस उतरलेली आणि वेळेची बचत करणारी 'मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस' आता मान्सून कालावधीत दररोज धावणार नाही. पावसाळ्यामुळे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला असून, त्याचा थेट फटका या लोकप्रिय ट्रेनला बसला आहे.
दरवर्षी १५ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत कोकण रेल्वेमार्गावर मान्सून वेळापत्रक लागू केले जाते. पावसाळ्यात सुरक्षिततेच्या कारणास्तव रेल्वे गाड्यांचा वेग कमी केला जातो, ज्यामुळे अनेक एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करावा लागतो. यंदाही रेल्वे प्रशासनाने सुरक्षिततेला प्राधान्य देत, या मार्गावरील गाड्यांच्या फेऱ्यांचे नियोजन नव्याने केले आहे. या बदलांमुळे मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
आतापर्यंत ही वंदे भारत ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावत होती. मात्र, नव्या मान्सून वेळापत्रकानुसार, ही ट्रेन आता आठवड्यातून केवळ तीन दिवसच प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध असेल. यामुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांच्या आणि चाकरमान्यांच्या नियोजनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात कोकणातील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या ट्रेनचा वापर करतात, त्यांना आता पर्यायी गाड्यांचा विचार करावा लागणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांकडून मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनच्या कोचची संख्या वाढवण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे. कोकण मार्गावर नेहमीच तिकीट उपलब्ध नसल्याची तक्रार प्रवासी करत असतात. अशातच, ट्रेनच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे तिकीट मिळवणे अधिकच कठीण होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तातडीने अतिरिक्त सोयी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. कोकण रेल्वेने अद्याप याबद्दल अधिक स्पष्टीकरण दिले नसले तरी, पावसाळी प्रवासाचे नियोजन करताना प्रवाशांनी आता रेल्वेच्या अधिकृत ॲप किंवा संकेतस्थळावर जाऊन नव्या वेळापत्रकाची खात्री करून घेणे गरजेचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.