Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गाचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. गणपतीपूर्वी महामार्गाची एक लेन खुली करण्याचा सरकारचा मानस आहे. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आश्वासन दिले आहे.
महामार्गाच्या अवस्थेबाबत मनसे आक्रमक झाली असून, पक्षाच्या वतीने आंदोलन छेडले आहे. राज ठाकरे यांनी आंदोलनाला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराचे कार्यालय फोडले तसेच, वाहनांची देखील तोडफोड केली. दरम्यान, मनसेची ही भूमिका चुकीची असल्याचे बांधकामंत्री चव्हाण यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले रवींद्र चव्हाण?
"ज्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी घेतली, त्याच दिवशी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामातील अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्याच्या दिशेने पाऊलं उचलू लागलो. आता भूसंपादन, वन खात्याच्या परवानग्या अशा सर्व अडचणी सोडवण्यात 100 टक्के यश आले आहे."
"सध्या महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु असून झपाट्याने पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे. परंतु काही लोक या महामार्गाबाबत असणारी आपली भूमिका ही लोकशाही मार्गाने न मांडता तोडफोड, जाळपोळ अशा पद्धतीने मांडत आहेत. यामुळे दहशत पसरत असून युद्धपातळीवर सुरु असणाऱ्या कामात अडथळे निर्माण होत आहेत."
"गणेशोत्सवापूर्वी सिंगल लेन आणि डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महामार्ग लोकांच्या सेवेत खुला करणार हा आमचा शब्द आहे. यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन आहे."
मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन 'जागर पदयात्रा' काढणार आहे. 23 ते 30 ऑगस्ट या कालावधीत तीन टप्प्यात पदयात्रा पार पडणार आहे.
यात्रेचा पहिला टप्पा हा पळस्पे ते माणगाव, तर दुसरा टप्पा हा भरणी नाका ते राजापूर असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात राजापूर ते बांदापर्यंत गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याची मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम वेळेत व्हावं ह्यासाठी पक्ष म्हणून ताकदीने रस्त्यावर उतरा. असे राज ठाकरे यांनी 16 ऑगस्ट रोजी झालेल्या पनवेलच्या निर्धार मेळाव्यात भाषणात कार्यकर्त्यांना आवाहन केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.