Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाची सिंगल लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचे आश्वासन महाराष्ट्र सरकारचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून, महामार्गावरील कशेडी बोगदा लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
बोगदा खुला झाल्याचे वेळेची मोठी बचत होणार आहे. कशेडी बोगद्याची (Kashedi Ghat Tunnel) माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली आहे.
"कशेडी घाट म्हटलं की, सह्याद्रीचे उंच उंच कडे, त्यातून जाणारे नागमोडी रस्ते, हिरवी गर्द वनराई आणि धुक्याची चादर.. हेच आपल्याला आठवतं. पण कशेडी घाट पार करताना नागरिकांना घाम फुटत होता. वळणावळणाच्या रस्त्यामुळे वाहतुकीचा सामना करावा लागायचा. पण आता कोकणवासीयांचं हे टेंशन दूर झालंय. जो कशेडी घाट पार करायला एक तास लागायचा, तेच अंतर आता अवघ्या 10 मिनिटांत पार करता येणार आहे. आणि याचं कारण म्हणजे कशेडी बोगदा !"
"लवकरच हा कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला होईल. या भुयारी मार्गामुळे प्रवाशांची वेळेची आणि पैशांची दोन्हीची बचत होईल." अशी माहिती राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.
"सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा हाती घेतल्यापासूनच मुंबई-गोवा महामार्गाची सिंगल लेन गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करायचा ध्यास घेतला होता. याचाच एक भाग म्हणून कशेडी टनेल ही गणेशोत्सवापूर्वी कशी सुरू करता येईल या दिशेने गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. वारंवार भेट देऊन, पाहणी करून, अपडेट्स घेऊन युद्धपातळीवर ही काम कसे करता येईल यावर लक्ष ठेवून होतो. आता हे काम अंतिम टप्प्यात आहे." असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
"कोकणातील नागमोडी रस्ते वाहतुकीत अडथळे निर्माण करतात. त्यामुळे सरळ रस्ता उभारण्याच्या दृष्टिकोनातून पोलादपूरमधील भोगाव ते रत्नागिरीतील कशेडी पर्यंत टनेल उभारण्यात आले आहे. या टनेलमुळे पूर्वी जे अंतर गाठायला 1 तास लागायचा, तेच अंतर आता अवघ्या 10 मिनिटांत गाठता येणार आहे. यामुळे प्रवाशांची 45 मिनिटे वाचतील. टनेलमधील रस्त्याचे काम पूर्ण झाले असून सध्या नॉर्मनुसार तपासणी सुरू आहे. लवकरच कशेडी टनेल प्रवाशांच्या सेवेत खुला होईल." अशी माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.