Goa Accidents: वेगाची नशा! कुर्टी, वास्को, सांगे, कुळेत अपघाताच्या घटना; थोडक्यात वाचले जीव

Goa Accident Cases: अपघात झाला, त्यावेळेला घरातील आगडयेकर कुटुंबातील काही सदस्य झोपले होते.
Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak

Goa Accident Cases

कुर्टी ते बेतोडा बगल रस्त्यावर म्हाळशी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या घरावर टेम्पो उलटून घराचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने घरातील लोक बचावले.

अपघात झाला, त्यावेळेला घरातील आगडयेकर कुटुंबातील काही सदस्य झोपले होते. मात्र, हा टेम्पो घराच्या एका बाजूला पडला. त्यात छताचे मोठे नुकसान झाले. हा अपघात बुधवारी (ता.२९) सकाळी ६ वा.च्या दरम्यान घडला. महाराष्ट्र राज्यातील एमएच ०९ जीजे ०१६५ या क्रमांकाच्या कोंबडीवाहू टेम्पोचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

कुर्टी ते बेतोडा-बोरी बगल मार्गावर दुभाजक बसवण्याचे काम सुरू आहे, त्यासाठी रस्त्याच्या मधोमध खोदकाम केले असून त्यात टेम्पोचे चाक गेल्याने पुन्हा रस्त्यावर गाडी आणण्याच्या नादात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि हा अपघात झाला.

दाबोळी येथील क्विक कार वॉश सेंटरजवळ चार वाहनांमध्ये अपघात झाला. टेम्पो चालकाच्या म्हणण्यानुसार, स्विफ्ट कार चालवणाऱ्या एका महिलेने रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

आल्तो-दाबोळी राष्ट्रीय महामार्गावर चार वाहनांच्या झालेल्या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार स्विफ्ट कार चालवणाऱ्या एका महिलेने रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागून येणाऱ्या इतर चार वाहनांना अंदाज आला नसल्याने त्यांनीही ब्रेक लावल्याने त्यांची एकमेकांना ठोकर बसली व अपघात झाला. यामुळे काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती. परंतु पोलिस व वाहतूक पोलिसांनी त्वरित वाहतुकीवर नियंत्रण आणले. चारही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, कोणालाही दुखापत झाली नाही.

अपघात झाल्याची माहिती वास्को पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस व वाहतूक पोलिसांनी दाबोळी विमानतळमार्गे जाणारी सर्व वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी अपघात झालेल्या चारही वाहनांचा पंचनामा केला.

Goa Accident
Night Clubs In Goa: आसगावकरांचा 'नाईट क्लब'ला विरोध; अपघात, तरुणांच्या भवितव्याची भीती

कुळे येथे चालत्या बसवर वीजखांब कोसळला. दैव बलवत्तर म्हणून कोणताही अनर्थ घडला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मोलेहून खासगी बस सावर्डे येथे जात होती. ही बस कुळे गणेश मंदिराच्या जवळ पोहोचली असता समोरून एक अवजड ट्रक मोले येथे जात होता. त्याचे छत वीजवाहिन्यांना अडकले व ट्रक पुढे गेला तेव्हा दुसरा एक वीजखांब बसवर येऊन कोसळला. सुदैवाने त्यावेळी वीजवाहिन्या विद्युतभारित नव्हत्या, नाहीतर कुळे गावात मोठा अनर्थ घडला असता. सुर्दैवाने कुणालाही इजा झाली नाही. बसच्या छतावरील काही

भागचे मात्र नुकसान काही प्रमाणात झाले. या दोन्ही वाहनांच्या मालकांनी आपसात हे प्रकरण मिटविले असल्याचे समजते.

दरम्यान, कुळे, शिगाव भागात रस्त्यावरून गेलेल्या सर्व विद्युतवाहिन्या लोंबकळत आहेत, त्यामुळे अशा ट्रकना त्या वाहिन्या अडकतात. अशीच स्थिती राहिल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तेव्हा संबंधित खात्याने याची दखल घ्यावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

सांगे येथील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या रेंट अ कारचा उतरणीवर ब्रेक फेल झाल्यामुळे स्वयंअपघात घडला. यामुळे गाडीतील पर्यटक किरकोळ जखमी झाले. जखमींना प्राथमिक उपचारासाठी सांगे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील पर्यटक उत्तर गोव्यातून सांगे येथील पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी रेंट अ कार घेऊन जात होते. सांगे न्यायालयाच्या समोरील उतरणीवर कारचे ब्रेक फेल झाले व सांगेच्या दिशेने जात होती ती कार कुडचडेच्या दिशेने रस्त्यावर वर्तुळकार फिरून रस्त्याच्या बाजूला धडकली. सुदैवाने टक्करीनंतर गाडीतील बलून फुलल्यामुळे पर्यटक सुरक्षित राहिले; पण काचा फुटल्यामुळे त्यांना किरकोळ जखमा झाल्या. एकूण चार महिला, एक पुरुष व एक लहान मूल या गाडीत होते. सांगे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com