

डिचोली: मुळगाव येथील खाणीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला असतानाच लोकवस्तीजवळ मशीनरीच्या साहाय्याने करण्यात येत असलेल्या माती परीक्षणाच्या कामावरून स्थानिकांमध्ये खळबळ उडाली. गुपचूप आणि बेकायदेशीररीत्या खनिज तपासणी सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले. तसेच घटनास्थळी आणलेली मशिनरी आणि अन्य यंत्रसामग्री अडवून ठेवण्यात आली.
गेल्या दोन वर्षांपासून मुळगाव परिसरातील खनिज खाणीचा विषय तापलेला आहे. प्रादेशिक आराखडा-२०२१नुसार ‘बफर झोन’ निश्चित करावा, रात्रपाळी बंद करावी तसेच पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा मागण्यांसाठी ग्रामस्थांचा संघर्ष सुरू आहे. रविवारी झालेल्या ग्रामसभेतही खाणीचा मुद्दा पुन्हा जोरदारपणे मांडण्यात आला होता.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, लोकवस्तीच्या अगदी जवळ परवानगीशिवाय मशीनरी आणून माती परीक्षण सुरू करण्यात आले. याबाबत कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे हा प्रकार संशयास्पद असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.
लोकवस्तीजवळ बोअर मशीनद्वारे पाण्याची पातळी तपासण्याचे काम करण्यात येत होते. हा कंपनीचा दावा दिशाभूल करणारा होता. जमिनीत खनिज दडलेय की नाही, त्याचे परीक्षण करण्याचे काम गुपचूप आणि बेकायदेशीरपणे सुरु होते. स्थानिक पंचायतीलाही अंधारात ठेवून हे काम करण्यात येत होते, असा आरोप महेश्वर परब, वसंत गाड, मनोज गाड आदी स्थानिकांनी केला आहे.
रविवारची ग्रामसभा संपल्यानंतर सायंकाळी स्थानिकांचा एक गट मुळगाव येथील खाणीवरील कामकाजाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी लोकवस्तीपासून काही अंतरावर धार्मिक स्थळाजवळ बोअर मशीनरीद्वारे माती परीक्षण करण्यात येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लागलीच स्थानिकांच्या या गटाने हे काम बंद पाडले. या प्रकारानंतर घटनास्थळी पोलिसही दाखल झाले. मात्र, स्थानिक आपल्या भूमिकेशी ठाम राहिले.
सोमवारी सकाळी स्थानिकांच्या गटाने बोलाविल्यानंतर खाण कंपनीचा अधिकारी घटनास्थळी हजर झाला. पाण्याची पातळी तपासण्यात येत आहे, असे या अधिकाऱ्यांने स्थानिकांच्या गटाला सांगून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक भुमिकेशी ठाम होते. यावेळी प्रभारी सरपंच विशालसेन गाड यांच्यासह कोमुनिदादचे अध्यक्ष महेश्वर परब, मुळगावचे माजी सरपंच वसंत गाड, केशव परब वासुदेव (बिरजू) राऊत, मनोज गाड आदी स्थानिक उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.