MP Francis Sardin on CM Pramod Sawant: गोव्यातील पोर्तुगीजकालीन खुणा नष्ट करण्याची भाषा बेतुल येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली, त्याचा कॉंग्रेस पक्ष निषेध करत आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपली संस्कृती दुसऱ्यांवर लादू नये, असा इशारा दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी दिला.
‘त्यांना’ मंत्रिमंडळातून काढा!
यावेळी दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष सावियो सिल्वा तसेच प्रदेश चिटणीस नितीन चोपडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. जर मुख्यमंत्र्यांना खरोखरच पोर्तुगीज संस्कृती नष्ट करायची असेल तर सर्वप्रथम मोन्सेरात, नीलेश काब्राल, माविन गुदिन्हो यांना मंत्रिमंडळातून काढून टाका व पक्षात घेतलेल्या आलेक्स सिक्वेरा, मायकल लोबो, दिलायला लोबो यांना पक्षातून काढून टाका, असे आव्हानही सिल्वा यांनी दिले.
राज्यातील मतदारसंघांमध्ये वाढ करावी
एससी, एसटी यांना राजकीय आरक्षण देणे गरजेचे आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये त्यांना आरक्षण आहे. केवळ गोव्यातच नाही. त्यांना आरक्षण देण्यासाठी गोव्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये वाढ करणे गरजेचे आहे.
त्यामुळे इतर समाजावर त्याचा परिणाम होणार नाही, असे मत सार्दिन यांनी मांडले. हा प्रश्र्न मी लोकसभेत मांडला. यापुढेही लोकसभेत या विषयावर चर्चा झाली तर त्यात भाग घेऊन एससी, एसटीच्या राजकीय आरक्षणाचा आग्रह धरू, असेही सार्दिन म्हणाले.
पोर्तुगिजांनी गोव्यावर ४५० वर्षे राज्य केले. त्यांनी काही वाईट गोष्टी केल्या व चांगल्याही केल्या. ज्या वाईट गोष्टी होत्या, त्या गोमंतकीय विसरले; पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या गोमंतकीय गोव्याची संस्कृती म्हणून जतन करत आहेत.
प्रत्येक गोमंतकीयाला आपली संस्कृती जपण्याचा हक्क आहे, असेही सार्दिन म्हणाले.
पोर्तुगीजकालीन खुणा नष्ट करण्यापेक्षा चांगले प्रशासन द्या. कमीत कमी भ्रष्टाचार होईल याकडे लक्ष द्या. रस्ते दुरुस्त करा, सरकारी इमारती व शाळा दुरुस्त करा, महागाई आटोक्यात आणा.
शेतकऱ्यांना अजून गतसालचे अनुदान दिलेले नाही, ते द्या. गोव्यात कृषी उत्पादन कमी होत आहे, त्याकडे लक्ष द्या, असेही सार्दिन यांनी सुचवले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.