Mormugao Port: मुरगाव बंदराने आता हरित बंदर होण्याच्या दिशेने पावले टाकणे सुरू केले आहे. पुढील वर्षाच्या जागतिक पर्यावरण दिनाआधी (5 जून 2024 पूर्वी) बंदराला लागणारी वीज ही सौरऊर्जेतून मिळवली जाणार आहे. यासाठी बंदरात उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून गोवा ऊर्जा विकास यंत्रणा (गेडा) काम पाहणार आहे.
अशा प्रकारचे काम ‘गेडा’ने करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘गेडा’ यापुढे खासगी प्रकल्पांसाठीही सल्लागाराचे काम करणार आहे, अशी घोषणा या यंत्रणेचे अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
मुरगाव बंदर प्राधिकऱण आणि ‘गेडा’ यांच्यात आज या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प स्थापण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान व कचरा व्यवस्थापनमंत्री बाबूश मोन्सेरात तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत
करार करण्यात आला.
प्रदूषणही कमी : बंदराला 2.4 ते 2.7 मेगावॅट वीज लागते. ती गरज भागवण्यासाठी ३ मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. बंदर परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. बंदरात येणाऱ्या जहाजांनाही ही ऊर्जा पुरवली जाणार आहे. यामुळे जहाजांवरील डिझेल जनित्रे सुरू ठेवून केली जाणारी ऊर्जानिर्मिती बंद राहून प्रदूषणही कमी होणार आहे.
राज्यात हरित ऊर्जा निर्मितीवर भर देण्याच्या सरकारच्या आवाहनाला बंदर प्रशासनाने प्रतिसाद दिला आहे. राज्यातील खासगी आस्थापने, औद्योगिक आस्थापनांनी सौरऊर्जा निर्मितीसाठी पुढे आले पाहिजे. ‘गेडा’ त्यांना सल्ला-सेवा पुरवण्यास तयार आहे. त्याचा उपयोग हरित ऊर्जेकडे वळणाऱ्यांनी करून घ्यावा.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
काही बंदरांनी हरित ऊर्जेचा वापर करणे सुरू केले आहे. मात्र, मुरगाव बंदराची ऊर्जाविषयक पूर्ण गरज हरित ऊर्जेतून भागवली जाणार आहे. असे करणारे मुरगाव हे देशातील पहिले बंदर ठरणार आहे. केंद्रीय मंत्रालयाकडे अनुदान मागितले आहे. जून 2024 पूर्वी हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा मानस आहे. -
विनोद कुमार, अध्यक्ष, एमपीए.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.