
पणजी: मुरगाव बंदरात मोठी जहाजे यावीत यासाठी बंदरातील पाण्याची खोली १९ मीटर करण्याचा मुरगाव बंदर प्राधिकरण पुन्हा प्रयत्न करणार आहे. सध्या बंदरातील पाणी साडेसोळा मीटर खोल आहे. यामुळे मोठ्या जहाजातील काही माल उतरवून ती बंदरात आणावी लागतात.
प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एन. विनोदकुमार यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्यासोबत उपाध्यक्ष विनायक राव आणि सचिव एम. संकर बाबू होते. तत्पूर्वी पत्रकारांना बंदरातील विविध उपक्रमांची माहिती त्या त्या ठिकाणी नेऊन देण्यात आली. या दौऱ्याचे संयोजन पत्र सूचना कार्यालयाचे संचालक नाना मेश्राम यांनी केले.
विनोदकुमार म्हणाले, गाळ उपसण्यासाठी आवश्यक ते परवाने घेण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया केली जाईल, मागील खेपेस जनसुनावणी घेतली नाही म्हणून राष्ट्रीय हरित लवादाने गाळ उपसण्यावर बंदी घातली होती. बंदरातून कंटेनरांची निर्यात एप्रिलपासून सुरू होईल. त्यासाठी लागणाऱ्या दोन क्रेन मार्चमध्ये उपलब्ध होणार आहेत. उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील मालही कंटेनरमधून निर्यात होणार आहे. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कार्गो हब म्हणून विकसित केला जाणार असला तरी हवाई माल वाहतूक आणि जलमार्गावरील माल वाहतूक वेगळी असल्याने त्याचा फटका मुरगाव बंदराला बसणार नाही.
मुरगाव ते दोनापावला असा ४.६० किलोमीटरचा रोप-वे बांधण्याचा प्रस्ताव आहे. पर्यटकांसाठी तो आकर्षण ठरेल. या मार्गाने १५ मिनिटांत दोनापावलाहून वास्को (Vasco) गाठता येईल, अशी माहिती देऊन त्यांनी सांगितले, की वास्को उपसागरात तटरक्षक दल, नौदलाच्या धक्क्यांसह विविध धक्के व इतर सुविधा विकसित करण्यासाठी राज्य सरकारचे सहकार्य हवे आहे. यासाठी काही जमीन लागणार आहे. ४० घरे स्थलांतरित करावी लागतील. या प्रकल्पासाठी लागणारा पर्यावरण दाखला मिळवण्यासाठी पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.
कंटेनर टर्मिनसची इमारत मार्चपर्यंत तयार झाली की येत्या पर्यटन हंगामात (Tourist Season) ८० आंतरराष्ट्रीय क्रुझ या टर्मिनलवर लागतील, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी सांगितले, की ३ मार्चपासून सिंगापूर येथील क्रुझ लायनर बोट मुरगाव बंदरात येणार आहे. पावसाळ्यापूर्वी १३ वेळा ती येईल. सिंगापूर-मुंबई प्रवासादरम्यान ती मुरगाव बंदरात थांबा घेणार आहे.
वास्कोतील प्रदूषणाला एकटे मुरगाव बंदर जबाबदार नाही, असे एका प्रश्नावर सांगून ते म्हणाले, शहरात सापडणाऱ्या भुकटीचे प्रयोगशाळेत परीक्षण केले असता त्यात केवळ कोळशाचा अंश सापडला नाही. त्या भुकटीत रस्त्यावरील धुळीचा सर्वाधिक समावेश असल्याचे आढळून आले आहे. गवत जाळणेही त्याला कारणीभूत असल्याचे शास्त्रीय कसोटीत दिसून आले आहे. असे असले तरी कोळशापासून प्रदूषण होऊ नये यासाठी उपाययोजना हाती घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
विनोदकुमार म्हणाले, कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकांची चाके उच्च दाबाने पाणी मारून धुतली जातात. रेल्वेच्या कोळसावाहू वाघिणी झाकल्या जातात. कन्व्हेयर बेल्टद्वारे भुकटीची हाताळणी होते. जहाजातूनही कोळसा यांत्रिकी पद्धतीने हाताळण्यात येतो. तो सारा परिसर आच्छादीत असावा यासाठी मोठा गोलार्धाकृती घुमट उभारण्यात येत आहे.
बंदर कोळसा आणत नाही. बंदर केवळ आयात निर्यातीसाठी सुविधा उपलब्ध करते, त्यामुळे कोळसा आणण्यासाठी बंदराला सरसकट जबाबदार धरणे चूक आहे. देशाचा कोळसा साठ्याच्या बाबतीत जागतिक पातळीवर पाचवा क्रमांक लागतो. विकसनशील देशांनी कोळशाचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करण्याचे ठरवले आहे. देशातील ७३ टक्के ऊर्जा कोळशापासून मिळते. यामुळे कोळसा नको, असे म्हणता येणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.