

पणजी: देशातील प्रमुख बंदरांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एकत्रितपणे ९१५.१७ दशलक्ष टन मालाची हाताळणी केली आहे. या कामगिरीसह बंदरांनी ९०४ दशलक्ष टनांचे वार्षिक उद्दिष्ट यशस्वीपणे ओलांडले आहे. मालाच्या हाताळणीतील वाढीच्या दराचा विचार करता, मुरगाव बंदर प्राधिकरणाने १५.९१ टक्के ही सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. त्याखालोखाल कोलकाता डॉक सिस्टमने १४.२८ टक्के आणि ‘जेएनपीए‘ने १०.१७ टक्के वाढ नोंदवली असून, हे आकडे सुधारलेली कार्यक्षमता आणि मालाच्या वाढत्या प्रमाणाचे निदर्शक आहेत.
भारताच्या सागरी क्षेत्रांसाठी महत्त्वाची म्हणता येईल अशी कामगिरी बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयांतर्गत येणाऱ्या प्रमुख बंदरांनी केली आहे. या कामगिरीद्वारे गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.०६ टक्के वाढीची नोंद झाली असून, त्यामुळे या क्षेत्राची मजबूत सुधारणा, वाढलेली कार्यक्षमता आणि निरंतर प्रगतीची पुष्टी होत आहे.
हा टप्पा गाठण्यात भारत सरकारने ‘मेरिटाइम अमृत काल व्हिजन २०४७’ अंतर्गत बंदरांच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढवणे आणि भारताला एक अग्रगण्य सागरी राष्ट्र म्हणून बळकट करण्यासाठी केलेल्या धोरणात्मक गुंतवणुकीचा आणि परिवर्तनीय सुधारणांचा मोठा वाटा आहे.
दरम्यान, देशातील प्रमुख बंदरांद्वारे ९१५ दशलक्ष टनांहून अधिक मालाची विक्रमी हाताळणी हा देशाचे सागरी क्षेत्र बळकट करण्याप्रती सरकारच्या अढळ वचनबद्धतेचा दाखला आहे, असे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार, आम्ही जागतिक दर्जाच्या बंदरांच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करत आहोत, कार्यक्षमता सुधारत आहोत आणि देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी विनाअडथळा लॉजिस्टिक सेवा सक्षम करत आहोत. ही कामगिरी देशाला ''मेरिटाइम अमृत काल व्हिजन २०४७'' अंतर्गत जागतिक सागरी महासत्ता म्हणून प्रस्थापित करण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ करत आहे, असे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.