मोरजी : जुनसवाडा मांद्रे येथील रिवा रिसोर्टमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या संगीत रजनींच्या ध्वनी प्रदूषणामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. मंगळवार 21 डिसेंबर रोजी अशाच एका संगीत रजनीबाबत पेडणे पोलिसांकडे तक्रार देऊनही कोणतीही कृती न केल्याने उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडे यासंबंधी तक्रार नोंदवण्यात आली आहे.
रिवा रिसोर्टमार्फत अधूनमधून संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. हे कार्यक्रम होतात तेव्हा सर्व नियमांना बगल देण्यात येते. हे हॉटेल ज्या परिसरात येते तो परिसर वन आणि पर्यावरण मंत्रालयाने कासव संवर्धनाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील घोषित केला आहे. असे असूनही रिवा रिसोर्ट नियमभंग करत रात्रभर प्रखर दिव्यांचा लखलखाट आणि कर्णकर्कश आवाजात संगीत रजनी आयोजित करते. यामुळे स्थानिकांची झोपमोड तर होतेच शिवाय आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना त्रास होत आहे. ध्वनिप्रदूषणामुळे स्थानिक हैराण झाले असून सरकारी यंत्रणा कारवाईकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
याविषयी रिसोर्ट जवळच राहत असलेल्या त्रस्त कुटुंबियांपैकी आग्नेलो फर्नांडिस यांनी संगीत रजनी सुरू असताना पेडणे पोलिसांकडे ती कर्णकर्कश संगीत रजनी बंद करण्याची विनंती केली परंतु पोलिसांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांनी उत्तर गोवा (goa) पोलिस अधीक्षक यांच्याकडे रीतसर तक्रार करून असे ध्वनी प्रदूषण (Noise Pollution) करणारे कार्यक्रम रोखण्यात यावेत अशी मागणी केली आहे. तसेच तक्रारीनंतर स्थानिक पोलिसही दुर्लक्ष करतात यामुळे स्थानिकांना त्रास होत असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. या प्रकारची तकार जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी पेडेणे, वन संरक्षक, रेंज फॉरेस्ट ऑफिसर यांच्याकडेही करण्यात येईल, अशी माहिती फर्नांडिस यांनी दिली.
गेली काही वर्षे या भागातील हॉटेलमुळे स्थानिकांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत आहे. यापूर्वी स्थानिकांनी अशा प्रकाराच्या निषेधार्थ आंदोलने, (Movement) मेणबत्ती मोर्चा काढले आहेत. यापुढे पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्यास पेडणे पोलिस स्थानकावर मोर्चा नेण्याचा तसेच हॉटेल परिसरातही आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत ध्वनी प्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्य अॅड. प्रसाद शहापुरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, 21 रोजी सुरू असलेल्या या संगीत रजनीसंबंधीची तक्रार स्वरूपातील माहिती पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांना प्रत्यक्ष दिली तसेच मेसेजही पाठवला आणि लोकांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत असल्याची कल्पना दिली होती. मात्र पोलिसांनी (police) दखल न घेतल्याने संगीतरजनी मध्यरात्री उशिरापर्यंंत सुरूच होती. यापूर्वीही अशा प्रकारच्या संगीत रजनींविरुद्ध अनेकदा तक्रार करूनही पोलिस कारवाई करण्यास कुचराई करतात याबद्दल अॅड. शहापुरकर यांनी खेद व्यक्त केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.